नासिक कर्फ्यू डायरी : दिवस पहिला : गुढीपाडवा... अन् युद्धाचा दिवस!

नासिक कर्फ्यू डायरी : दिवस पहिला

गुढीपाडवा... अन् युद्धाचा दिवस!
स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आम्ही आतापर्यंत असंख्य युद्ध लढली आहेत. नासिकच्या इतिहासात दोन हजार वर्षांपूर्वी लढलेल्या एका युद्धाचा आजच्या सणाशी आणि आज आपण लढत असलेल्या लढ्याशी एक अनोखा संबंध आहे. आजचा गुढीपाडवा कायम स्मरणात राहिलं, अशी लढार्इ आपण लढत आहोत, आपलं शहर लढत आहे आपला देश लढत आहे, आपलं जग लढत आहे. आपण यापूर्वीच्या लढाया कधी हरलो नाहीत. मात्र, फितूरी होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. काय संबंध आहे गुढीपाडव्याचा आणि नासिकच्या त्या लढार्इचा.. ‘नासिक कर्फ्यू डायरी’त कर्फ्यूच्या पहिल्या दिवसाची कहाणी!
----
काय योगायोग आहे ना? मराठी माणसासाठी हा नववर्षाचा पहिला दिवस. नवीन काही संकल्प करण्याचा आणि तो तडीस घेऊन जाण्यासाठी निश्चय करण्याचा हा दिवस. या दिवसापासून आपल्याला आपल्या जीवावर बेतलेल्या करोना व्हायरस विरोधात युद्धात उतरावं लागत आहे. हे युद्ध रणांगणात नाही तर घराच्या चार भिंतीत राहून आपल्याला लढायचंय. हेही या युद्धाचं वेगळंपण. आणखी एक वेगळपण म्हणजे या युद्धासाठी तलवारी, भाले, मशीनगन, बाँम्ब, एके४७ वगैरे नको आहेत. तर हवे आहेत स्वच्छ हात ठेवण्यासाठी सॅनिटायझर, तोंडावर मास्क आणि गर्दी न करता, अंतर ठेऊन घरा बाहेरील लोकांशी संवाद. एकत्र न येता आपापल्या कुटुंबाची काळजी घेणं आणि करोनाच्या व्हायरसचा प्रसार न होऊ देणं हेच या लढार्इत विजयाकडे घेऊन जाण्याची एक उत्तम रणनिती. काळानुसार युद्धांचा आकार, प्रकार आणि पसारा बदलतो आहे. चीन पासून सुरू झालेलं वादळ भारतात येर्इल, असं कधीही न वाटलेल्या भारतीयांनाच नाही तर जगातील कानाकोपर्यात हे मृत्यूवादळ घोंगावतं आहे. आपण युद्धाला घाबरणार आहोत का? प्रश्नच नाही. कारण, युद्धाला सुरूवात झाली आहे गुढीपाडव्याला. या दिवशी एखाद्यानं हिनवलं तर आम्ही काय करून दाखवितो हे दोन हजार वर्षांपूर्वी नासिकमध्ये झालेल्या एका युद्धाने दाखवून दिलं आहे. दोन हजार वर्षानंतर पुन्हा परकीयांच्या या आक्रमणाला आपल्या प्रत्येकाला तोंड द्यायचं आहे. दोन हजार वर्षांपूर्वी नमके कोणात झालं होत युद्ध? या युद्धाचा आपल्या प्रत्येकाशी काय संबंध आहे अन् आपण गुढीपाडवा का साजरा करतो? याचं उत्तर आहे आजही नासिक कर्फ्यू डायरीतून मिळणार आहे.
दिवस नेहमीसारखाच उजाडला. घरात इडियट बॉक्स नसल्याने जगात नेमकं काय सुरू आहे, हे मोबाइलवरच लार्इव्ह न्यूजमधून एक आढावा घेतला. पण, आज उत्साह नव्हता. एक भीती आणि धास्ती मागे पुढे सावलीसारखी वाटत होती. पण, तरीही प्रत्येक गोष्ट नेहमीसारखी सुरू ठेवण्याचा प्रयत्न ती करत होती. किचनच्या खिडकीतून बायकोशी बोलता बोलता म्हणालो,‘ही पांडवलेणी नसती तर आज आपण नसतो. ना हा गुढीपाडवा असता.’ गेल्या दहा वर्षांपासून मी मुलांना गुढीपाडव्याला ठरलेली गोष्ट सांगतो. आजही मुलं पुड्यात बसून म्हणाली,‘त्या गौतमीपुत्र सातकर्णीचं काय झालं.’ तो लढला, तो जिंकला! असं म्हणतं, चला आता गुढी उभारूयात, असं म्हणत आम्ही बाल्कनीत पोहचलो. तिनं सगळी तयारी केली होती. विजयाची गुढी उभारली अन् सातकर्णीची गोष्ट सुरू झाली. एक होता गौतमीपुत्र सातकर्णी... या सातवाहनराजा सातकर्णीच्या पराक्रमाचा दोन हजार वर्षांपूर्वीचा ब्राह्मी शिलालेख नासिकच्या पांडवलेणीत कोरलेला आहे. या राजानं महाराष्ट्राला सर्वप्रथम स्वातंत्र्य मिळवून दिलं. क्षत्रप राजा नहापानाबरोबर त्यानं मोठं युद्ध केलं. या युद्धात लाख सैनिक मारले गेले अन् सातकर्णींनं नहापानाचा वंश नष्ट केला. हे युद्ध ७८ व्या वर्षी नासिकमध्ये झालं होतं. या युद्धात विजय मिळाला म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. ही परंपरा नासिकमधील सातपूर गावात जल्लोषात साजरी केली जाते. याच दिवशी या गावाची यात्राही असते. पण, आज ही यात्रा होणार नव्हती. पण, सातकर्णीच्या पराक्रमाची ही गोष्ट मात्र, मी मुलांना सांगत होता. त्यावेळी काय घडलं, असेही हे या पांडवलेणीकडे पाहत अनुभवायला मला प्रचंड सुख मिळतं आणि मुलांच्या मनात एक रोमांच उभा राहतं. हा आहे गुढीपाडवा आणि नासिकचा अनोखा ऋणानुबंध! ना सातकर्णी हरला ना आम्ही हरणार होतो. लढार्इ सुरू झाली आहे. सावध व्हा! (सकाळ सत्र)
दुपारपासून पावसानं हजेरी लावतं पोलिसांचं ओझं थोडं हलकं केलं. चौकाचौकात थांबलेल्या पोलिसांना मोकाट भटकनाऱ्यांना आवरावं लागत होतं. मात्र, पाऊस आला आणि प्रत्येकजण गुमान आपापल्या घरी परतला. पोलिसांनाही जीव आहे, त्यांनाही आराम हवा म्हणून की काय तो स्वत: आल्यासारखं वाटलं. रस्ते चिंब झाले होते. शहरात कुठे काय होतयं (पत्रकार असल्यानं उगाच नाही) हे पाहण्यासाठी म्हणून फेरफटका मारला. सर्वकाही शांत आहे. नासिकमध्ये अजूनतरी करोनाचा रूग्ण आढळला नसल्यानं स्थिती नियंत्रणात आहे असं म्हणून चालणार नाही. पुढील २१ दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. अशोकस्तंभावर पोहचलो तेव्हा एका पोलिसानं हटकलं. ‘गालात हसलो,’ तसं त्यांच्याही लक्षात आलं. विचारपुस केल्यावर लक्षात आलं की सुटी रद्द आणि कर्फ्यूमुळे रस्ताचं घर झालेली कर्तव्यावरील ही माणसं आपल्यासाठी करोनाशी लढतायेत. पोलिस असे, पोलिस तसे’, असे म्हणणाऱ्यांनी आज त्यांची ड्युटीला सलामच केला पाहिजे. गाडी सुरू केली अन् गंगापूर रस्ता पालथा घालतं कार्यालयात परतलो. रस्त्यात भाजीवाले दिसले. भाजी सुरक्षित घेता यावी, दूध, किराणा, औषधे घेता यावीत म्हणून तेही सज्ज दिसले. प्रशासनाने त्यांच्या अंगणात चौकटी आखून सोशल डिस्टंगशिंग केलं आहे. हे पाळून नासिककर आपले जनजीवन सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करीत होता. नासिककर प्रशासनाने दिलेल्या सूचना पाळतोय, हेही काही कमी नाही, स्वागतार्यच म्हणावे लागेल.
नासिकनं पाडव्याचा असा दिवस कधी पाहिला नसणार, असं आपल्याला वाटत असेल मात्र, असं नाही. नासिकनं दर शंभर वर्षांनी महामारीचा प्रसंग अनुभवला आहे. त्याचा सामनाही केला आहे. १८२५-२६ मध्ये कॉलराच्या साथीने नासिकला छळलं होतं. यावेळी दररोज दोनशे लोक नासिकमध्ये मरत होते. असाचं प्रसंग १९०९-१० ला प्लेगच्या साथीमुळे नासिकवर ओढवला होता. मृत्यूचा आकडा तेव्हाही भयान होता. आता साधारण शंभर वर्षांनी पुन्हा असाच काहीशी शांतता नासिक अनुभवत आहे. नासिकचे जिल्हाधिकारी व पोलिसांनी योग्यवेळी लॉकडालाऊन केलं. खरतरं राज्यात सर्वप्रथम नासिक प्रशासनानं चेकपोस्ट सुरू करून करोनाला रोखण्यासाठी कडक पावले उचलल्यानं सध्यातरी नासिकमध्ये करोनाग्रस्त नाही. पुढेही नको असेल तर योग्य ती काळजी घेणं हाच उपाय आपल्या हाती आहे. प्रशासनाला सहकार्य करीत ही दक्षता आपण सर्वांनीच घ्यायला हवी.
आपल्या संस्कृतीची पकड आपल्यावर पक्की आहे त्यामुळे किमान जीवनावश्यक गोष्टींसाठी म्हणून आपण किराणा दुकानांमध्ये ठरवून दिलेल्या अंतर राखत खरेदी करीत आहोत. अमेरिकेतही अशीच गर्दी होते आहे. मात्र, ही गर्दी पिस्तुल खरेदीसाठी होत आहे. करोनामुळे सामाजिक उद्रेक होण्याची त्यांना भीती आहे. करोना छळत नाही तेवढं त्यांना एकमेकांपासून असलेला धोका छळायला लागला आहे. ही धास्ती आपल्याला नाही कारण, आपण २१ दिवस घरात बंदिस्त होऊन करोनाशी लढण्यास तयार आहोत. शहर शांत आहे. स्तब्ध आहे. शहराचा प्रत्येक रस्ता आपली वाट पाहतो आहे, प्रत्येक बाजार आपल्या पावलांनी सजावा असं त्याला वाटतं आहे. मात्र, सध्या तो काळजी घ्या, घरी रहा.. आपण तर भेटतचं राहणार आहोत, असंही तो आवर्जून सांगतो आहे.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
सुरक्षित रहा.. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.
- रमेश पडवळ, महाराष्ट्र टाइम्स, नासिक
8380098107 / rameshpadwal@gmail.com
००००००००००००००
महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र आपल्या दारात काही दिवस येऊ शकणार नसला तरी मटाची ई-आवृत्ती आपल्या मोबाइलवर नक्कीच हजर राहणार आहे. खालील माझ्या मोबाइल क्रमांकावर ई-आवृत्तीची मागणी करू शकता. https://epaper.timesgroup.com/TOI/TimesOfIndia/index.html… या लिंकवर क्लिक करून लॉगइन करून ‘मटा’सह टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपच्या देशभरातील आवृत्त्या पाहू शकता. अथवा Marathi News Maharashtra Times हा अॅप डाऊनलोड करून वेळोवेळी घडणाऱ्या घटनांचा ऑनलाइन आढावा घेऊ शकता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकमध्येही हवं ‘मूर्तीचं वरकुटे’!

लकडी की काठी, काठी का घोडा!

काळाराम मंदिर सत्याग्रह : २ मार्च, काळाराम अन् रमेशायण!