काळाराम मंदिर सत्याग्रह : २ मार्च, काळाराम अन् रमेशायण!


काळाराम मंदिर सत्याग्रह : २ मार्च, काळाराम अन् रमेशायण!

काळाराम मंदिर सत्याग्रह २ मार्च १९३० रोजी सुरू झालं अन् पाच वर्षांनी हा सत्याग्रह संपला. यश की, अपयश हा गंभीर प्रश्न आहे. कारण, माझ्यामते माणसांना माणूस न माननं अन् त्यांना आपल्या रामाला भेटू न देणं हे नाशिकच्या इतिहासातील काळीकुट घटना आहे. आजच्या राजकारणात रामाची भूमिका महत्त्वाची झाली असताना तेव्हाच्या राजकारणात रामालाच कसं बंद करून ठेवलं गेलं होतं हे पाहणं गरजेच आहे. काय घडलं होत, का घडलं होतं. त्याचे परिणाम सध्या काय दिसतायेत हे पाहणही गरजेचं आहे. रमेशायण त्या काळात जाऊन काय अनुभवतो आहे
-        रमेशायण / ८३८००९८१०७
 

मी रमेशायण आज माझं वय आहे १०८ वर्षे आहे. म्हणजे मी आहे पस्तीशीतलाच पण, २ मार्च (२ मार्च १९३०च्या त्या प्रसंगामुळे) ही तारीख आली की, मी त्या काळात जातो अन् हजारो वेळा त्या दिवशी काय काय घडलं असेल याचं प्रत्येक इतिहासाचं पान उलगडण्याचा प्रयत्न करतो. काहींना हा इतिहास नको आहे, त्या जखमा नको आहेत पण, आपलं भविष्य या इतिहासाच्या पानात दडलं आहे हे का त्यांना समजू नये. इतिहासातील चुका आपण भविष्यातही करणार आहोत का? या चुका टाळायच्या असतील तर इतिहासाची पानं एक त्रयस्त होऊ पहायलाच हवीत.. नाही तर आपल्या हातून घडलेल्या चुका कशा सुधारता येतील. हा! चुका स्वीकारायच्याच नसतील अन् त्या दुरूस्तच करायच्या नसतील तर वेगळी गोष्ट. पण, असं करून चालणार नाही. इतिहास शोधावाही लागेल अन् त्यातून शिकावही लागेल. सोर्इस्कर भूमिका घेऊन चालणार नाही. आता तुम्ही म्हणालं, ‘तु कोण?’ मी रमेशायण.. इतिहासाकडे इतिहास म्हणून पाहणारा त्यातून शिकणारा.. मला ना कोणती जात आहे ना धर्म मी आहे फक्त वास्तवावर बोट ठेवणारा रमेशायण.. म्हणूनच २ मार्च आला की, माझं काळीज अस्वस्थ होतं, ह्दय वेगान धडधडतं अन् अचानक बंद होतं, डोळे लाल होतात अन् माणुस असूनही माणसासारखे आपण का वागलो नाही? हा प्रश्न झोप उडवतो. म्हणूनच पस्तीशीचा असूनही मी आज ८८ वर्षांचा झाल्याचा मला भास होतो अन् हे सगळं लिहीताना माझे हात थरथरायला लागतात. हे लिहिलं पाहिजे का? असे विचारणार् यांना सांगाव वाटतं की, हे वाचलंच पाहिजे तरच नाशिककरांसाठी हा काळादिवस का झाला हेही लक्षात येर्इल. एकाच शहरात राहणार् या अन् दाराला दार खेटून असलेल्या माणसाला आपल्याच माणसाविरूद्ध का लढावं लागलं हेही लक्षात येर्इल. २ मार्च १९३० रोजी काय घडलं होतं.. अस्वस्थ होणार असाल तर यापुढे वाचू नका.. इतिहासातून काही शिकायचं असेल आपला (आजच्या दिवस तरी) धर्म ‘माणूस’ असेल तरच पुढे वाचा, अशी विनंती करेल. कारण, माणूस हा धर्म तेव्हाही नव्हता अन् आताही नाही. त्यामुळे ८८ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेत जावून रमेशायणने अनुभवलेला ह प्रसंग आपल्याला त्रासदायक ठरू शकतो किंवा आपल्यात मानवतेला पाझर फोडू शकतो, हे दोन्ही आपल्यासाठी धोकायक ठरू शकतं. असो.
      नाशिक हे प्राचीन शहर आहे. सिंहस्थामुळे हे शहर धार्मिक शहर म्हणून ओळखलं जात असलं तरी या शहराचा इतिहास कोणत्या एका धर्माला वाहिलेला नव्हता. हे आणखी एक या शहराचं वैशिष्ट्य. माझा (रमेशायणचा) जन्मही याच नाशिकच्या विचारांच्या एका गल्लीत नुकताच झाला. मात्र मी प्रत्येक घटनेत जाऊन तो प्रसंग अनुभवण्यात अशी रस ठेवतो. नाशिकहून महाडला बरीच लोक जात असल्याच मला कळालं अन् मीही त्या लोकांबरोबर महाडला गेलो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मी पहिल्यांदा तेथे पाहिलं. नाशिकचे दादासाहेब गायकवाड नसते तर महाडचा सत्याग्रह झालाच नसता असं महाडहून पुन्हा नाशिकला परतताना मला सारखं वाटत होतं. मी दादासाहेब गायकवाडांनाही त्याबद्दल विचारलं ते म्हणाले, ‘ही लढार्इ विचारांची आहे. आपल्याला हातात काठी किंवा दगड घ्यायचा नाही. आणि आपण कोणाविरूद्ध लढत आहोत. आपण आणि ते या अक्षरांच्या संख्येतला तर फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात. ते आपल्याशिवाय जगू शकत नाहीत आणि आपण त्यांच्याशिवाय. मग कशाला एकमेकांची डोकी फोडायची. जो काही संघर्ष होर्इल तो विचारांचा तो विचारांनीच सोडवायचा.’ त्यांच्या मानवतावादी भूमिकेनं मी हरखून गेलो होतो. पण त्यांच्या डोळ्यात महाडच्या सत्याग्रहाने तेज भरलं होतं. क्रांतीची ज्योत त्यांच्या देहात प्रखर झाली होती. बाबासाहेबांनीही महाडच्या सत्याग्रहात त्यांची पाठ थोपटली होती. हे पाठ थोपटणं म्हणून दादासाहेबांसाठी रसदच ठरली.
दादासाहेब कोण? हा प्रश्न आताच्या पिढीला पडणं स्वाभाविक आहे. कारण दादासाहेब गायकवाड सभागृह या पलीकडे त्यांना काही माहित नसावं. त्यातही आजच्याच लोकांची चूक आहे. सभागृहात एका फलकावर दादासाहेबांबद्दल माहिती दिली तर नव्या पिढीलाही थोडफार दादासाहेब कळतील, असो. दादासाहेबांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील आंबे (दिंडोरी) या गावात १५ ऑक्टोबर १९०२ रोजी झाला. त्या काळात अस्पृश्याच्या मुलाबद्दल समाजमन काय होते हे शाळेतील त्यांच्या नावाची नोंद ‘भावड्या किसन महार’ या नोंदीवरून दिसते. मात्र, नंतर ही नोंद एका शिक्षकांने बदलून ‘भाऊराव कृष्णराव गायकवाड’ अशी केली. पुढे त्यांना दादासाहेब म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने अन् त्यांनी एकदा बाबासाहेबांचा जीव वाचविल्याने ते बाबासाहेबांचे जवळचे स्नेही झाले. दादासाहेब विधानसभा, लोकसभा व राज्यसभेचेही सदस्य राहिले आहेत. यावरून नाशिकचा हा माणूस किती मोठा होता हे लक्षात येर्इल. महाडच्या सत्याग्रहाहून परतलेल्या दादासाहेबांनी माणसाच्या हक्कासाठी नाशिक जिल्ह्यात लढे सुरू केले. पेठ रस्त्यावरील उमराळे येथील विहीर सर्वांसाठी खुली करण्यासाठी १८ मे १९२८ रोजी सत्याग्रह करण्यात केला. त्यानंतर दादासाहेब गायकवाड यांनी सार्वजनिक विहिरी खुल्या करण्यासाठी जिल्हा पालथा घातला. हे सर्व प्रसंग मी जवळून पाहत होतो. एकाच गावात राहणारा माणूस त्या गावातील माणसाला प्यायला पाणी देण्याचेही कस नाकारत होता, हे अनुभवताना माझ्या अंगावर शहारे उमटत होते अन् हे शहारे दोन-तीन वर्ष कायम होते. नाशिक तालुक्यातील मुळेगाव, चांदवड तालुक्यातील सोनगाव व उर्धूळ येथील विहिरी खुल्या करण्यात आल्या. शाळांमध्ये त्या मुलांना प्रवेश दिला जात नव्हता. दुगाव व मोहाडीतील शाळा खुल्या करण्यासाठी आंदोलने उभी राहिली. दादासाहेबांच्या सुधारणावादी वृत्तीला काही लोकांचा अन् काही माणसांचाही तीव्र विरोध होता. दादासाहेबांना त्यांच्याच लोकांनी वाळीत टाकलं होतं जसं सावरकरांना टाकलं होतं तसचं. दिंडोरीतील सभेत यावरून वाद झाला अन्‌ तोडगाही निघाला. हा पहिला यशस्वी संघर्ष दादासाहेबांना स्वत:च्याच जातीत करावा लागला होता. पुढचा लढा हा गूळ रांध्याचा होता. आपल्या लोकांना गूळ मिळत नाही म्हणून दादासाहेबांनी गूळ बनविण्याचा निर्णय घेतला पण, या गुळाला बाजारात कोणीही हात लावला नाही. माणसांनीच बनविलेल्या गुळावर नाशिक आणि घोटीच्या बाजारात बहिष्कार घालण्यात आला. तेव्हा दादासाहेबांनी हा गूळ आपल्या माणसांना फुकट वाटला. या चळवळींसाठी डॉ. बाबासाहेबांनी दादासाहेबांना बरीच मदत केली. अनेकदा ते नाशिकला त्यांच्यासाठी आले. हा सर्व संघर्ष हळूहळू मोठा झाला होता. १७ नोव्हेंबर १९२९ रोजी देवळाली येथे सभा घेण्यात आली. संभाजी रोकडे या सभेचे अध्यक्ष होते व दादासाहेबर गायकवाड हे चिटणीस होते. नाशिकच्या सत्याग्रहाची पहिली रूपरेषा येथे ठरली. सत्याग्रहाची सिद्धता कशी करावी, निधी कसा गोळा करावा इथपासून सत्याग्रहाची एकूण रूपरेषा येथेच ठरविण्यात आली. २५ जानेवारी १९३० रोजी त्र्यंबकेश्वरच्या निवृत्तिनाथांच्या यात्रेतही जंगी सभा झाली. यातूनच डॉ. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली लढ्याचे सरसेनापती दादासाहेब गायकवाड यांनी काळाराम मंदिर प्रवेशासाठी रणशिंग फुंकले. हा लढा माणसा-माणसात होता. मानवनिर्मित भेदभावात होता. महायुद्ध पेटावे असे महायुद्ध होते. धर्मसंग्राम होता. मनामनांच्या कोंडीत साठलेल्या सुप्त क्रौर्याचा मुक्त विस्फोट करणारा रोमांचक खेळ नाशिककरांनी अनुभवला. कोण जिंकल अन् कोण हारलं याला येथे महत्त्व नव्हतं युद्ध एका देहाच्या दोन हातात झालं अन् आपल मन समाजविकलांग झालं हे या युद्धाचं दु:ख होतं.  
विहिरीमुक्त लढ्यातून काळाराम मंदिरात प्रवेश करावा आणि सत्याग्रह करावा, असे दादासाहेब गायकवाड, पतितपावन दास, टी. बी. काळे, अमृतराव रणखांबे, सावळीराव दाणी, नानाजी चंद्रमोरे, संभाजी रोकडे, ठेंगे, जाधव, पगारे, भालेराव आदी मंडळींनी ठरविले. याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी त्यांनी १९२९ च्या ऑक्टोबरमध्ये मुंबईला जाऊन विचारविनिमय केला. मात्र, महाडचे प्रकरण कोर्टात असल्यामुळे उतावीळपणा करू नये, असा सल्ला डॉ. बाबासाहेबांनी मंडळींना दिला. मात्र, दादासाहेब गायकवाड व मंडळींनी हट्ट लावून धरला. विहितगावी वर्ध्याचे पतितपावन बुवा यांच्या अध्यक्षतेखाली सत्याग्रह समितीची स्थापना करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष केशव नारायण देव तथा पतीतपावन दास, उपाध्यक्ष पांडुरंग जिवाजी सबनीस, तर सेक्रेटरी भाऊराव कृष्णराव गायकवाड हे होते. समितीच्या स्थापनेनंतर जून १९२९ मध्ये दादासाहेब गायकवाड यांनी काळाराम मंदिराचे पुजारी गणेश रामचंद्र पुजारी यांना नोटीस दिली की, आम्ही लोक मंदिरात प्रवेश करून श्रीरामचंद्रांचे दर्शन घेणार आहोत आणि याबाबत तुम्ही अगर हिंदू म्हणून घेणार् यांनी विरोध केला तर आम्ही मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह करू. याबाबत तुमचे काय म्हणणे आहे ते आम्हाला कळवावे. मंदिराचे पुजारी गणेश रामचंद्र पुजारी यांनी या नोटिशीला पाच महिन्यांनी म्हणजे ९-११-१९२९ रोजी उत्तर दिले. ते उत्तर सत्याग्रह समितीचे सेक्रेटरी दादासाहेब गायकवाड यांना न देता त्यांनी ते ९-११-१९२९ च्या कोहिनूर वृत्तपत्रात प्रसिद्ध केले. हे मंदिर सार्वजनिक नाही. त्यामुळे असे केल्यास प्रतिकार केला जाईल, अशा आशयाचे उत्तर दिले. त्यानंतर २९-१२-१९२९ रोजी विहितगावी सभा झाली. सभेत पुजाऱ्याच्या उत्तराबद्दल विचारविनिमय झाल्यावर २ मार्च १९३० रोजी सत्याग्रह करण्याचा निर्णय झाला आणि बिगुल वाजले ते काळाराम सत्याग्रहाचे. माझे मन थरथरलो. थेट काळाराम मंदिर गाठलं. रामाच्या पुढं उभं राहून टाहो फोडून मी ओरडलो. अरे, आपण नाशिककर आहोत ना? का एकमेकांविरूद्ध भांडतो आहोत. बोल ना रे तू काही तरी. हे फक्त आंदोलन अथवा सत्याग्रह नाही. हे समाजमनाच विभाजन आहे. तु कधी म्हणालास कारे की, हा नको मला तो नको मला. मग का घडतयं हे. तु दोघांचाही आहेस ना रे! माझे अश्रू काळारामाला नाही दिसले. मी एक अदृश्य रमेशायण होतो ना? पण, अचानक काळराम म्हणाला, ‘रमेशायण, मी कोणालाच कळालो नाही रे! मी ही टाहो फोडून सांगतोय, पण माझा आवाज कोणीच ऐकत नाही रे.. मी एक काळा दगड होऊन बसलो आहे. माझं दु:ख कोण समजून घेणार?’ मी समजून गेलो की, काळारामही हतबल झाला आहे. जे घडणार आहे ते मला पहाव लागणार आहे.    
दरम्यान, मंदिराच्या पुजाऱ्यांनी इंग्रज गव्हर्नरला ‘हा सत्याग्रह बेकायदा असून, त्याला मनाई करावी’, अशी मागणी केली होती, तर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व्ही. बी. आकूत वकील यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. या बैठकीत श्रीधर अण्णा शास्त्री आणि गोपाळ शास्त्री यांनी मंदिरात प्रवेश करण्यास माणसांना हक्क नाही, अशी भाषणे केली. नीलकंठ पाटणकरांनी माणसांची बाजू उचलून धरली आणि त्यांना मंदिर प्रवेश दिला पाहिजे अशी ठाम भूमिका घेतली. आकूत मात्र तटस्थ राहिले. रघुनाथ हरी गद्रे हे एक मंदिराचे विश्वस्त होते. त्यांनी मंदिराच्या पुजाऱ्यांना प्रखर विरोध केला. देव सर्वांचा आहे त्यामुळे प्रवेश द्यायला हवा अशी भूमिका त्यांनी मांडली. पण, काही लोक स्वत:च देव होऊन निर्णय घेत होते पुढे त्याचा अनर्थ होणार आहे याची कल्पना त्यांना नव्हती किंवा त्यांना हा माणूसच आपल्यात नको होता. हे सगळं घडताना पाहताना मी अस्वस्थ झालो होतो. काय होणार आहे या विचारात पोटात घास जात नव्हता. तर बाबासाहेबांचं आणि दादासाहेबांची स्थिती काय असेल या विचारानं मला गरगरायला लागलं. काळाराम मंदिरात प्रवेश हवाच, हा आमचा अन् संपूर्ण मानवजातीचा अधिकार आहे.. हक्क आहे हा आवाज बुलंद झाला होता. मीही मध्येच उटून ‘काळाराम आमचाही आहे’ अशी आरोळी देत होतो.
लढार्इ रणांगणात आली होती. १ मार्च १९३० रोजी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सत्याग्रही नाशिकमध्ये धडकू लागली. गुजरात कर्नाटक व इतर राज्यातूनही माणूस नाशिकमध्ये दाखल झाला होता. रात्री आठच्या नागपूर मेलने बाबासाहेबही नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. नाशिकमध्ये सिंहस्थाचा योग जुळून आला की काय, अशी चर्चाही रंगली होती. २ मार्च हा सत्याग्रहाचा नियोजित दिवस उजाडला. त्या दिवशी रामनवमी होती. काळाराम मंदिराच्या बाहेर गर्दी जमू लागली. सकाळी दहा वाजता जल्लोषात वस्तीवर मोठ्या सभेला सुरवात झाली. दुपारी एकच्या सुमारास सभा संपली व सत्याग्रहींचा विराट मोर्चा काळाराम मंदिराच्या दिशेने निघाला. मोर्चाची आघाडी मोठ्या त्या वस्तीच्या पश्चिमेकडून बाहेर पडली होती. मोर्चा मशिदीवरून पुढे चालला होता. फाळके फिल्म कंपनी, घास बाजार, त्र्यंबक दरवाजावरून मोर्चा मेन रोडवरून काळाराम मंदिराबाहेर धडकला. मंदिराचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते. त्यामुळे मिरवणूक शांतपणे दक्षिण दरवाजावरून गोदावरी घाटावर गेली. तेथे भाजी मार्केटच्या पटांगणात शेट तेरसी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. नंतर रात्री सातला सत्याग्रहासाठी आलेली मंडळी जेवणासाठी पाथर्डी गावात गेली. भोजनानंतर पुन्हा वस्तीवर रात्री अकराला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. २ मार्चचा हा दिवस तसा शांततेत गेला असला तरी या दिवसाने नव्या क्रांतीकडे झेप घेतली होती. इंग्रजही अस्वस्त झाले होते अन् स्वत: देव समजणार समाजही खोटा खोटा उद्विग्न झाला होता. ३ मार्चपासून काळाराम मंदिराच्या बाहेर सत्याग्रह करायचे ठरले. ३ मार्च १९३० रोजी डॉ. बाबासाहेबांच्या आदेशाने सत्याग्रहाची सुरुवात झाली. सत्याग्रहाच्या चार तुकड्या पाडण्यात आल्या. प्रत्येक तुकडीत १२५ पुरुष व २५ महिला अशी दीडशे सत्याग्रहींची संख्या होती. या तुकड्या मंदिराच्या चारी दरवाजांवर सकाळपासून ठाण मांडून बसल्या. पतितपावन दास (उत्तर दरवाजा), कचरू साळवे (पूर्व दरवाजा), पांडुरंग राजभोज (दक्षिण दरवाजा) व शंकरदास नारायणदास (पश्चिम दरवाजा) असे चार खंदे कार्यकर्ते मंदिराच्या चारी दिशांवर आपापल्या आघाड्या सांभाळत होते. सत्याग्रह सुरू झाला त्या दिवसापासून स्वत:ला देव म्हणून घेणार् यांनी माणसांवर बहिष्कार टाकला होता. त्यांना गावात येण्यास बंदी घातली गेली. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरू झाल्या दिवसापासून माणसांचा प्रचंड छळ सोसावा लागला. गावोगावी बाजारात नित्य निर्वाहाच्या जिनसा मिळेनाशा झाल्या. मुलांच्या शाळा बंद झाल्या, रस्ते बंद झाले. ‘तुम्ही माजला आहात. तुम्हाला बरोबरीने हक्क पाहिजेत ना? भोगा त्याची ही फळं !’ अशी दमदाटी त्यांना सनातनी हिंदू देऊ लागले. ही दु:खे भोगूनही दादाबाहेब गायकवाड यांच्या सहकाऱ्यांनी नाशिकचा सत्याग्रह चालूच ठेवला. मी कधी काळाराम मंदिरात तर कधी काळाराम मंदिराबाहेरील सत्याग्रहींच्या सोबत आतला अन् बाहेरची अस्वस्थता पाहत होतो. आत द्वेष माजला होता तर बाहेर एकमेकांचे हात हातात घेऊन तुम्हीही माणूस व्हा, अस विनवलं जात होतं. एक माणूस निष्ठूर होऊ दुसर् या माणसांच्या हक्कावर गदा आणत होता.  
८ मार्च १९३० रोजी आयुक्त जे. घोषाळ (रवींद्रनाथ टागोरांचे मेहुणे) नाशिकला आले. जिल्हाधिकारी आर. जी. गार्डनकडून वारंवार येथील माणसांच्या सत्याग्रहाबद्दल तक्रारी गेल्यामुळे आयुक्त स्वत: येथे हजर होते. त्यांनी आधी बाबासाहेबांचे मत जाणून घेतले. बाबासाहेब म्हणाले, `मी माझ्या लोकांना हक्क मिळवून देण्यासाठी लढा उभारला आहे, वाजवी तडजोड होत असल्यास आम्ही सत्याग्रह तहकूब करायला तयार आहोत.’ बाबासाहेबांच्या एकंदरीत रवैय्यानी घोषाळ खूश झाले. नंतर त्यांनी सनातन्यांशी बोलणी केली. सनातन्यांनी मंदिर खाजगी असल्याची नवीन टुम काढली. मंदिराला दर वर्षी १०००/- रुपये सरकारी अनुदान मिळत असल्याचे लगोलगसिद्ध करून हा डाव हाणून पाडण्यात आला. एकीकडे सरकारी अनुदान घ्यायचे अन् मंदिर खासगीही म्हणायचे हा कसला न्याय.. हिंदू सनातन्यांच्या मुजोरीमुळे काहीच तडजोड होत ना­­­­­ही व घोषाळसाहेब निराशपणे परत जातात. पण परत गेल्यावर त्यांनी आपला कावा दाखवला. आयुक्त घोषाळांनी हॉटसन साहेबांना एक पत्र लिहिले, `मी आताच नाशिकहून परतलो. मला आधी वाटत होते त्यापेक्षा हे प्रकरण खूपच गंभीर आहे. देवळाला सरळ सरळ वेढा घालण्यात आला आहे. सकाळी मला तेथे डॉ. आंबेडकर भेटले. शंभर माणस तेथे गीत गात होते. अधूनमधून उंच आवाजात युद्धघोषणा देत होते. तेथे ब-याच स्त्रीयाही होत्या. खाकी पोशाख केलेले व हातात काठ्या घेतलेले लोक ­­पहारा देत होते. सत्याग्रहींचा वेष खादी व डोक्यावर गांधी टोप्या होत्या. त्या त्यांना नुकत्याच देण्यात आल्या होत्या. दर पाचदहा मिनटांनी सत्याग्रह्यानी भरलेल्या गाड्या नाशिकामध्ये येत होत्या. सत्याग्रहात अडथळा आणणारा कुठलाही हुकूम पाळला जाणार नाही, असे आंबेडकरांनी सांगितले आहे. श्री. गार्डन, श्री. रेनाल्डस (पोलिस अधीक्षक) व मी सकाळी जेव्हा तेथे गेलो तेव्हा धरणे धरुन बसलेल्या माणसांपैकी कोणीच उठून उभे राहिले नाही. त्यापैकी बरेच जण खेड्यातुन आलेले वतनदार माणसं आहेत. मी त्यांच्याशी बोलत असतानासुद्धा ते उठून उभे राहिले नाह‌ीत; परंतु आंबेडकर येताक्षणीच ते उठून आनंदाने उडया मारू लागले. त्यांना सलाम करू लागले. ‘गांधीजी की जय’ अशा घोषणा दिल्या. सत्याग्रहींची मोहीम कोणालाच आवडली नाही. नाशिक परिसरातील माणसांवर तेथील स्वत:ला देव मानणार्या काही माणसांनी बहिष्कार घातला आहे. अशा परिस्थ‌ितीत उत्तेजन देणे म्हणजे त्यांची खरी सेवा करण्यासारखे नाही. या चळवळीचे स्वरूप धार्मिक असण्यापेक्षा सामाज‌िक व राजकीय आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या १४७ व्या कलमानुसार गार्डनने ताबडतोब कारवाई करावी, असे मला वाटते. खेड्यातील वतनदार माणसंही आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांना घाबरत नव्हते.
१४७ व्या कलमाखाली माणसांवर कारवाई करण्याची घोषाळांची सूचना मुंबई सरकारने फेटाळली. टागोरांचे मेहुणे असे कसे वागले. इंग्रजाळलेले घोषाळ असे कसे आहारी गेले असे मला वाटून गेले. घोषाळ नाशिकला आले तेव्हा नाशिकच्या काही लोकांची यांची बडदास्त ज्या पद्धतीने राखली त्याचा तो परिणाम होता. नाशिक सत्याग्रहाबद्दल त्यांच्या पत्रातून ओझरणारा दुराग्रह अचूक हेरल्यावर वरिष्ठांनी घोषाळांवर नाराजी व्यक्त केली व २६ मार्च १९३० रोजी तडकाफडकी बदली केली. त्यांच्या जागी मध्य विभागाचे आयुक्त ए. डब्ल्यू. मॅकाय काम पाहू लागले. यांनी सूत्रेहाती घेताच मंदिराच्या पुजाऱ्यांना बजावले की, उत्तर दरवाजाच्या बाजूने एक लहानसा दरवाजा होता जो पुजाऱ्याच्या घरात जात असे. त्या दरवाजातून पुजाऱ्यानी लोकांना आत सोडल्याची तक्रार आली व तसे न करण्याची ताकीद दिली गेली. आता मात्र सर्व सनातनी चवताळून उठले. इकडे माणसही दंड थोपटून उभे ठाकली होती. पुजाऱ्यांनी नियम तोडल्यास त्यांच्या खाजगी दरवाज्याजवळ सत्याग्रह करण्याची मागणी होऊ लागली. काळाराम हे सर्वकाही डोळे बंद करून पाहत होता. सीता अस्वस्थ झाली होती. रामाला दुसणे देत होती. लक्ष्मण परत अयोध्येला जाण्याचा इशारा रामाला देऊन बसला होता. ‘रामा, अरे न्यायप्रिय आहेस म्हणून मी तुझ्याबरोबर वनवासाला आलो आहे. तुच असं वागलास तर या मानसांना वनवास होर्इल. वनवासातील दु:ख माहित असताना तु असं कसं वागू शकतो,’ असं लक्ष्मणानं रामाला सुनावल्यावर रामाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. सीतेनेही या अश्रूंकडे दुर्लक्ष केलं अन् मूर्तीतून बाहेर येत मंदिराच्या दरवाज्या समोर बसलेल्या सत्याग्रहींच्या गर्दीत सामील झाली. लक्ष्मणही उठला अन् मागच्या दरवाज्याबाहेर बसलेल्या सत्याग्रहींमध्ये सामील झाला. आता राम एकटा होता. बहुतेक एकटाच राहणार होता. कारण त्याच्यात सत्याग्रहींमध्ये बसण्याची शक्ती काही लोकांनी काढून घेतली होती. राम हतबल झाला होता.
१९३१ मध्ये विनायक दामोदर सावरकरांनीही नाशिककरांना पत्र लिहून ‘हे तुमचे बंधू आहेत. आपण सारे एकाच धर्मात जन्म घेतलेले लोक आहोत, तेव्हा त्यांना आता मंदिरात घेतल्याशिवाय तुम्हाला तरणोपाय नाही’ असे म्हटले असले तरीही सनातन्यांच्या पाषाणाला पाझर फुटला नव्हता. त्यांनी रामालाही हेरले होते तेथे सावरकरांची काय तमा. नाशिकचे कलेक्टर जी. गार्डन यांनी १४४ कलम लावून सत्याग्रहींना हटविले होते. मात्र, सत्याग्रह सुरूच होता. २३ सप्टेंबर १९३१ रोजी येवल्यातील मुखेडची घटनेनेही चळवळीला बळ दिले. तेथे काय घडलं हे नंतर सांगेनच. याचा आक्रोश लंडनच्या गोलमेज परिषदेत उमटला. याचे वार्तांकन ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने सुरेख केले आहे.
५ नोव्हेंबर १९३१ रोजी सत्याग्रहाचे दुसरे पर्व सुरू झाले. या वर्षी सिंहस्थ पर्वणी संपल्यावर तहकूब झाला. हिंदू महासभेचे डॉ. कृष्णराव मुंजे यांनीही दादासाहेबांना पत्र लिहून पाठिंबा दर्शवला. मुंजेंनी काळाराम सत्याग्रहाला पाठींबा दिला होता. मात्र नाशिकच्या स्वत:ला देव मानणार् यांनी मुंजेंनाही दुर्लक्षित केले. ३ डिसेंबर १९३१ रोजी नाशिक कारंजावर सत्याग्रह प्रतिबंधक समितीच्या जाहीर सभेत गोविंदराव देशपांडे यांना सनातन्यांनी मारहाण केली. ही रात्रीची सभा संपल्यानंतर सत्याग्रहींनी वाकडी बारवालगत एक बस अडविली आणि पुरुषोत्तम विश्वनाथ दीक्षित यांना भोसकले. यानंतर उसळलेल्या दंगलीत एका वृद्धाला वाचविताना कॉलेज विद्यार्थी असलेले वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रजही जखमी झाले होते, असे वृत्त त्या वेळच्या `स्वातंत्र्य' या नाशिकमधील वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. १३ डिसेंबर १९३१ पासून रामकुंड सत्याग्रह पेटला. हा वाद १४ मे १९३२ रोजी कलेक्टर ब्राऊन यांच्या कोर्टात गेला. ब्राऊन यांनी सत्याग्रहींना यापूर्वी कधीही रामकुंडात स्नान केले नसल्याचा पुरावा नसल्याने आताही ती परवानगी देता येणार नाही असा निकाल दिला. ब्राऊन यांनी दिलेला निकाल हास्यास्पद होता. रामकुंडावर माणसांना स्नान करताना जात पहावी लागते का? असा प्रश्न उभा राहिला.  नोव्हेंबर १९३२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात रामकुंड प्रवेशाबाबत याचिका दाखल करण्यात आली. मात्र, तीही फेटाळण्यात आली.
५ नोव्हेंबर १९३२ रोजी महात्मा गांधींनी मंदिर प्रवेशासाठी उपोषण करण्याची तयारी दर्शविली, तर ३ मार्च १९३३ रोजी बाबासाहेबांनी दादासाहेब गायकवाडांना पत्र पाठवून कळविले की, ‘सत्याग्रहाची भूमिका मला पसंत नाही.’ हा सल्ला ऐकून दादासाहेबांनी १९३४ च्या रामनवमीला सत्याग्रह केला नाही. पण २३ ऑगस्ट १९३४ रोजी रंगा अय्यर यांनी मध्यवर्ती कायदेमंडळात मांडलेले मंदिर प्रवेशाबद्दलचे विधेयक मागे घेतले, तर नोव्हेंबर १९३४ मध्ये डॉ. आंबेडकरांनी सत्याग्रह करण्याची आवश्यकता नाही, असे विंचूरला जाहीर सभेत स्पष्ट केले. मात्र, माणसांच्या युवक संघाने सत्याग्रह करण्याची आपली भूमिका कायम ठेवली. दरम्यान, रथयात्रेवरून बराच गोंधळ सुरू झाला. बाबासाहेबांची भूमिका माझ्या लक्षात येत नव्हती. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला लढा ते का रोखत होते हे समजत नव्हतं. मात्र बाबासाहेबर दूरदृष्टीकोन असलेले होते. या लढ्यातून भलतच काही घडेल ही भीती त्यांच्या मनात असावी. म्हणून त्यांची भूमिका सावध होती. मात्र दादासाहेब पेटले होते. पाच वर्ष काळाराम मंदिराच्या बाहेर सत्याग्रह सुरू होता. पाच वर्ष मी त्या घटना आतून आणि बाहेरून पाहत होतो. माझा देह काळारामासारखा काळा पडू लागला होता. मी हिंदू का आहे, मी माणूस का नाही, माझा धर्म कोणी ठरवला त्यांचा धर्म कोणी ठरवला, असे लाखो प्रश्न माझ्या मनात ठिणगीसारखे पेटत अन् विझत होते. मला रामाचं दर्शन का घ्यायचं आहे? राम आमच्यासाठी का महत्त्वाचा आहे? रामचं आमचं जीवन आहे का? माझे प्रश्न रामाभवती फिरताना आता राम राहिला नाही तोही मूर्ती सोडून गेल्याचा भास मला होऊ लागला होता. रामा अरे रामा आहेस कुठे रे.. तुच लावली भांडण ही सोडव आता.. नाही तर काही तरी भलतच होर्इल रे! पण, त्यानं आता मला प्रतिसादही दिला नाही.. मलाच रामान सोडलं होतं.. रामा असा नको रे जावू सोडून रमेशायण अस्वस्थेच्या टोकावर होता.
काळाराम मंदिर प्रवेशासाठी दादासाहेब गायकवाडांनी मोठा झगडा केला, पण त्या हिंदूंनी आपल्या बुद्धीची आणि मनाची कवाडे उघडली नाहीत ती नाहीतच. ते हिंदू हे पूर्वीप्रमाणेच कर्मठ आणि अनुतापशून्य राहिले. यापूर्वीच्या दहा वर्षांतील तसेच राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बाबासाहेबांनी दादासाहेबांच्या सल्ल्याने १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला परिषद बोलावली. या परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अतिशय भावनोत्कट भाषण झाले. माणूस नावाच्या वर्गाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात जी दुर्दशा झाली, तिचे त्यांनी वर्णन केले. माणूस वर्गीय हिंदुधर्मीयांचे रक्ताचे बांधव असूनही त्यांना किती दारुण हालअपेष्टा नि दु:खे सहन करावी लागली, हे त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. काळाराम मंदिर प्रवेशाच्या चळवळीत गेली पाच वर्षे त्यांचा अमानुष छळ झाला होता. त्या चळवळीला निर्देश करून ते म्हणाले, ‘‘आपले माणुसकीचे साधे अधिकार मिळवण्यासाठी आणि हिंदू समाजामध्ये समान दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी ही चळवळ निष्फळ ठरली आहे. त्या चळवळीसाठी व्यतीत केलेला वेळ, काळ आणि पैसाही वाया गेलेला आहे. म्हणून या गोष्टीसंबंधी अखेरचा निर्णय घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आपली ही दुर्बलतेची आणि अवनतीची स्थिती आपण हिंदू समाजाचे घटक आहोत, म्हणून आपल्यावर ओढवली आहे. म्हणून जो धर्म आपल्याला समान दर्जा देईल, समान हक्क देईल आणि योग्य तऱ्हेने वागवील, अशा एखाद्या दुसऱ्या धर्मात जावं, असं तुम्हाला वाटत नाही का?’’ आवाज चढवून ते पुढे म्हणाले, ‘‘हिंदू धर्माशी असलेला संबंध तोडा. स्वाभिमान आणि शांतता मिळेल अशा दुसऱ्या धर्मात जा. परंतु, लक्षात ठेवा, जो धर्म तुम्ही निवडाल, त्यात समान दर्जा, समान संधी आणि समान वागणूक मिळाली पाहिजे.’ आपल्या स्वत:विषयी ते म्हणाले की, ‘दुर्दैवाने मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो, हा काही माझा अपराध नाही. परंतु मरताना मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाही.’’ (रमेशायण बोलू लागला. बाबासाहेब काय झालं हे रामा काय केलस रे तोडल माणसाला माणसापासून. तुला हेच हवं होत का? रमेशायण येवल्याची सभा फक्त हे देह बनून पाहत होता.)  
येवला येथे झालेल्या या परिषदेत एकमताने ठराव संपत करण्यात आला तो असा : ‘‘हिंदूंची मनधरणी करण्याच्या प्रयत्नांना काहीही उपयोग होत नसल्याने त्याबाबतीत अस्पृश्य वर्गाने आपले सामर्थ्य आता विनाकारण खर्च करू नये व सत्याग्रहाची मोहीम यापुढे बंद करावी आणि स्पृश्य मानलेल्या वर्गापासून आपला समाज स्वतंत्र करावा व हिंदुस्थानातील अन्य समाजामध्ये आपल्या समाजाला मानाचे व समतेचे स्थान मिळविण्याकरिता अस्पृश्य वर्गाने एकनिष्ठेने प्रयत्न करावा, असे या परिषदेचे मत आहे.
येवल्याला धर्मांतर करण्याचा निर्णय बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केला आणि त्याच वेळी काळाराम मंदिर प्रवेशासाठी पाच वर्षे चाललेली चळवळ मागे घेण्यात आली. पण सबंध महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मांतराच्या प्रचाराच्या शेकडो सभा झाल्या. नाशिकचे सनातनी हिंदू धर्मातून अस्पृश्यांचे उच्चाटन होणार म्हणून सुखावले, तर संतप्त सिंधी हिंदूने २ नोव्हेंबर १९३५ रोजी आपल्या रक्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहून ‘तुम्ही हिंदू धर्माचा त्याग केलात तर तुम्हाला जीवे मारू’, अशी धमकी दिली. असाच एक अनर्थ डॉ. कुर्तकोटींमुळे टळला. अन्यथा अजूनही भलतच काही घडणार होतं. (रमेशायण : तेव्हा मी तेथेच होतो. हे सगळ पाहताना माझ्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू वाहत होते.) ती घटना समजून घ्यायची असेल तर (पद्मश्री दादासाहेब गायकवाड - लेखिका भावना भार्गवे व दादासाहेब गायकवाड जीवन व कार्य - हरिभाऊ पगारे ही पुस्तक वाचायलाच हवीत. अथवा या घटेननंतर आचार्य अत्रे यांनी या घटनेचे वर्णन ‘नवयुग’मध्ये सविस्तरपणे केले आहे. हा लेखही बोलका आहे.
१३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतराच्या घोषणेनंतर तब्बल २१ वर्षांनंतर १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. या वेळी ते म्हणाले, ‘‘मी आज स्वतंत्र झालो आहे. १९३५ साली मी येवल्याला धर्मांतरांची घोषणा करताना म्हणालो होतो की, दुर्दैवाने मी हिंदू धर्मात जन्मलो तो काही माझा दोष नाही. पण मी हिंदू म्हणून मरणार नाही, ही माझी प्रतिज्ञा मी आज पुरी केली आहे.’’ त्यानंतर मुंबई, नाशिक व भिवंडीत दीक्षेचे कार्यक्रम होणार होते. मात्र, ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेबांचे महानिर्वाण झाले. काळाराम मंदिराचा लढा जगभर गाजला अन्‌ परिवर्तनाची मोठी लाट घेऊन आला. सत्याग्रहींना काळाराम मंदिर हिंदूंनी कधीही खुले करून देण्याची गरज पडली नाही. कारण काळारामालाच माणसांनी सत्याग्रह करून आणि हिंदू धर्म नाकारून त्यागले होते, असे रमेशायणला वाटू लागले.  
काळाराम मंदिराचा लढ्याची अस्वस्थता लक्षात आल्यानंतर अगतिक होऊन बाबासाहेबांनी सत्याग्रह स्थगित केला असला तरी या लढ्यातून बाबासाहेबांनी नवयुगाची सुरूवात केली. या लढ्यामुळे भारतात सातवाहन युगानंतर पहिल्यांदा नव्याने बौद्ध धर्माची पायाभरणी झाली. कारण काळाराम मंदिर लढा यशस्वी झाला असता तर बाबासाहेबांना हिंदू धर्मातून बाहेर पडण्याची व बौद्ध धर्म स्वीकारण्याची गरज पडली नसती. बाबासाहेबांनी हिंदू धर्मात राहणार नसल्याची घोषणा केल्यानंतर कोणत्या धर्मात आपल्या समाजाला स्थान मिळेल याचा अभ्यास केला होता. शीख, मुस्लिम, दक्षिणेकडील धर्मांबाबतही बाबासाहेबांनी विचार केलेला दिसतो. तसे आमंत्रणही या धर्मगुरूंकडून त्यांना मिळाले होते. मुस्लिम धर्मात सामील होण्याचे निमंत्रण आल्यावर हिंदूंकडून याला तीव्र विरोध झाला. हिंदू धर्म स्वीकारेना आणि इतर धर्मात जाऊही देईना, अशी अवस्था झाल्याचेही दिसते. शंकराचार्यांनीही बाबासाहेबांनी शीख धर्म स्वीकारला तर आपणही त्यांच्यासोबत शीख धर्म स्वीकारू असे कळविलं मात्र हिंदू धर्मातून जाऊ नका असं म्हणण्याची त्यांची स्थिती अन् परिस्थिती त्यांच्या हातात राहिली नव्हती. मात्र बाबासाहेबांचा ओढा बौद्ध धर्माकडे होता आणि काळाराम लढा सोडून द्यावा लागल्याने बाबासाहेबांनी भारतात नव्याने बौद्ध धर्माची मुहूर्तमेढ रोवली. हा क्षण नाशिकसाठी नेमका कसा होता हे वर्णन करणे अवघड आहे. मात्र, नाशिकने पुन्हा एकदा बौद्ध धर्माला नव्याने जन्म दिला, असे म्हणता येईल. काळाराम लढ्यावर सविस्तर विचारमंथनाची अन् या लढ्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे, असे रमेशायणला नेहमी वाटते. कारण बौद्ध धर्म आणि काळाराम मंदिर या दृष्टीने या लढ्‌याकडे पाहिले गेलेले नाही. दोन हजार वर्षांपूर्वी नाशिकवर बौद्ध धर्माचा मोठा पगडा होता हे सातवाहन युगावरूनही स्पष्ट होतं. पुन्हा त्याच भूमीतून बौद्ध धर्माची नव्याने सुरूवात होणे हा मोठा योगायोग आहे. ११ व्या शतकानंतर बौध्द धर्म भारतातून पूर्णपणे बाहेर पडला होता. तो १९३५च्या काळाराम मंदिरर सत्याग्रहामुळे पुन्हा पुर्नजीवित झाला त्याला नव्याने बळ मिळालं. काळाराम मंदिराचे हे यश की, अपयश या प्रश्नात न अडकता नाशिकने आपण धार्मिक शहर असलो तरी निधर्मीत्वपणाची भूमिका येथे पारपाडल्याचे दिसते. पण तरीही माणूस माणसाविरूद्ध उभा राहिला नसता तर आजचे भारताचे राजकारण कसे असते, याचाही विचार करायला हवा. जे घडले ते घडले, यापुढे असेच घडायला हवे का? याचाही विचार करायला हवा. नाशिकमध्येच आणखी एक घटना घडली होती. ती म्हणजे महाराजा तुकोजराव होळकर (तिसरे) यांना अमेरिकन तरूणी नॅन्सी यांच्याशी लग्न करायचे होते. मात्र नॅन्सी ख्रिश्चन असल्याने त्यांना लग्नाला परवानगी मिळत नव्हती. म्हणून नॅन्सी यांच धर्मपरिवर्तन म्हणजे ख्रिश्चन धर्मातून हिंदू धर्मात करण्यात आलं. शंकराचार्यांनी नाशिकमध्ये घडविलं. मग आपल्याच हाडामासाच्या माणसांना का काळारामापासून वेगळं केलं गेलं? म्हणजेचे जात, धर्म हा फक्त विचारांची लढार्इ नाही तर आर्थित समृद्धी अन् सुबताही या राजकारणाचा एक भाग आहे हे आता सुज्ञ समाजानं लक्षात घेतलं पाहिजे. कोणताही भेदभाव समोरचा माणूस किती श्रीमंत अथवा गरीब हे पाहुणच सोर्इस्करपणे आपली भूमिका ठरवितो. म्हणजे श्रीमंत माणसाने कोणत्याही धर्मातील व्यक्तीशी लग्न केलं तर चालतं. मात्र गरीब माणसानं तसं केलं तर धर्म बुडविण्याचा भाग म्हटला जातो. हे समजून घ्यायला नको का? काळाराम मंदिरात प्रवेशासाठी सत्याग्रह करणारी माणस श्रीमंत गटातील असती तर हा लढा लढावा लागला असता का? ही मनातील जात अजूनही जात नाही. जातीला जात हवी असते ती श्रीमंत आणि गरीबाकडे एकाच नजरेने पाहते की पाहत नाही. याचाही विचार करायला हवा. आजकाल कोणी जातपात पाळत नाही. मला माझ्या मित्रांच्या जाती, धर्म अजूनही माहित नाही कारण गरजच पडली नाही. पण, मोर्चे निघू लागल्यापासून तो त्या मोर्च्यात अन् मी या मोर्चात दिसू लागलो आहोत. हा संघर्ष आला कोठून? काळाराम मंदिरातून आला की, स्वत:ला देव मानणार्या तेव्हाच्या प्रवृत्तीतून आला, याचा विचार करून आता नव्याने राज्यघटनेला बांधिल राहून समाज रचना करायला हवी. आपण सगळे भारतीय आहोत. आपल्याला ‘ना जात आहे ना धर्म’ यासाठी कधीतरी मनातील काळारामासमोर सत्याग्रह करणार आहोत का? याचाही विचार करायला हवा. नाही का? रमेशायण आजही काळाराम मंदिरासमोर त्या सत्याग्रहस्मृती स्मारकासमोर अस्वस्थ होऊन उभा राहिलेला दिसतो. रमेशायणला अनेक प्रश्न पडले आहेत. तो भविष्याकडे आजही काही राजकीय धर्मवेड्यांकडे एक सत्याग्रही म्हणूनच पाहतो आहे. म्हणूनच रमेशायण ही सर्वसामान्य जनतेची भूमिका आहे. माणसांच्या मनातील काळारामाच्या हक्कासाठी २ मार्चच्या लढ्यात उतरलेल्या सर्व मानवांना अभिवादन!
-        रमेशायण / 8380098107
-        ब्लॉग : http://rameshaayannashik.blogspot.in/

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकमध्येही हवं ‘मूर्तीचं वरकुटे’!

लकडी की काठी, काठी का घोडा!