लकडी की काठी, काठी का घोडा!



लकडी की काठी, काठी का घोडा!

आकर्षण हा शब्द जरा भलताच वाटत असला तरी त्या आकर्षणात खूप काही दडलेलं असतं. प्रत्येकाच आकर्षण वेगळं असून शकतं. त्या आकर्षणाला कसलही वय नसतं असतात ती फक्त स्वप्न. घोड्यासारखं उधळलेली… पांढरी शुभ्र… अन् वेगवान! हे उधळणं मनाचा ठाव घेतं… मनाला वेगवेगळ्या अंशांमध्ये फिरवतं… कधी ते वजनकाट्यावर त्याचं वजन मोजण्यासाठी नेतं तर कधी खोल पाण्यामध्ये समुद्राचा तळ पाहण्यासाठी… मनातील ते आकर्षण एखाद्या घोडासारखं रूबाबदार झालेलं असतं. घोडा ही उमपा मनाला देताना मन कधी बालपणात जातं तर कधी चेतक नावाच्या इतिहासात… कोण आहे हा घोडा? कोठून आला? कुठे कुठे हा भेटत राहतो आपल्याला? का भेटतो? असे अनेक प्रश्न मनाचा पिंगा घेतात. आपल्या अख्यायिकांशी अन् संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या घोडा या प्राण्याच्या विश्वात डोकावताना… रमेशायणही हरखून जातो.. वाचा  

  • रमेशायण

‘लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा दौड़ा दौड़ा दौड़ा घोड़ा दुम उठा के दौड़ा,’ हे गाणं आवडलं नाही, असं म्हणणारा कोणी सापडणार नाही. 1960 च्या दशकातील आर. डी. बर्मन यांनी गायलेलं हे गाण आहे मासूम चित्रपटातील. या गाण्यातील गौरी बापट, विनीता मिश्रा व गुरपीत कौर या कलाकारांनी इतकं फुलवलं आहे की, ना कधी गाण विसरणं शक्य आहे ना तो घोडा. बालपणी घोडा पाहिला असेल तर या गाण्यातून तोही लाकडी घोडा. खराखूरा घोडा पाहताना हा तोच घोडा असणार, असं सहज वाटूनही गेलं होतं. घोडा… भारतीय नसला तरी तो नंतर आपल्या संस्कृतीत समरस झाला. हा प्राणी कोणत्या ना कोणत्या निमित्तानं आपल्याशी संवाद साधत राहिला. सिंधू-सरस्वती संस्कृतीमध्ये घोडा आपल्याबरोबर नव्हता. घोडा भारतात कधी आला, याचा ठोस पुरावा नाही. मात्र, सिंधू संस्कृतीनंतरच्या काळात तो आला असावा. जातक कथांमध्ये अन् वेदांमध्ये घोड्याची उदाहरणे मात्र मिळतात. आपण घोडा अश्व म्हणून स्वीकारला. ब्रूझहोम या कश्मीरमधील सिंधू संस्कृतीच्या समकालीन संस्कृतीने नंतरच्या काळात व्यापारासाठी घोडा स्वीकारल्याचे दिसत. त्यांना घोडा इतका काही आवडला की, त्यांनी घोड्याचे शव आपल्या घरातच पुरल्याचे उत्खननात समोर आलं. अशा पद्धतीने कुत्र्यानंतर घोडा माणसाचा पाळीव प्राणी झाला. रामायण, महाभारतही घोडा आपल्याला भेटत राहतो. रामाच्या अश्वमेध यज्ञात मोठी भूमिका निभावतो. लव व कूश हा अश्वमेध अडवितात तेव्हा तो घोडात बापाला व मुलांना भेटवितो. येथे घोडा नात्यांची वीण वेगवान करताना आपले वेगळेपण दाखवितो. हे झालं दैवी इतिहासातलं अथवा पुराणांमधलं. घोडा आपल्या अख्यायिकांमध्येही राज्य करताना दिसतो.
बोधिसत्त्वातही घोडा आपल्या खूप काही शिकवतो. या घोड्याला ‘महाविद्वान घोडा’ म्हटले जातं. बनारसच्या राजाने या घोड्याला हे नाव ठेवलं होतं. कारण काय तर या घोड्यावर बसलेल्या व्यक्ती काय विचार करतो आहे हे या घोड्याला कळायचं. एकदा या राज्यावर आक्रमण झालं. राजा घोड्यावर बसून युद्धात उतरला मात्र घोडा त्या राजाला म्हणाला, मी एक गोष्ट सुचवितो, तुम्ही शत्रूच्या राजाची हत्या करायची नाही. त्याला जीवंत पकडायचं. त्यासाठी मी आपली मदत करेल. मग त्या घोड्यानं काय केलं हे वाचण्यासारख, समजून घेण्यासारखं आणि कृतीत आणण्यासारखं आहे. ते मात्र तुम्हाला शोधायचं आहे. घोडा आपल्यात कसा असतो, हे आपणच पहायला हवं नाही का? घोडा आपल्याला कोठे दिसतो यावरूनही त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. म्हणजेच आपल्या स्वप्नात कोणता घोडा दिसतो यावरही आपले शुभ-अशुभ सांगितले जाते. हा अंधश्रद्धेचा भाग असला तरी घोडा स्वप्नात दिसणं हे आपल्यावर परिणाम करताना असतं. म्हणजे स्वप्नात सजलेला घोडा दिसला तर आपल्या कार्यात हानी सहन करावी लागू शकते. स्वप्नात काळा घोडा दिसला तर आपला मान सन्मान वाढतो. स्वप्नात आपण घोड्यावर स्वार झालो आहोत असे दिसले तर आपली उन्नत्ती होते. असे वेगवेगळे कयास स्वप्नातील घोड्यावरून लावले जातात. मला तर असा काही अनुभव नाही. मात्र स्वप्नात घोडा दिसला तर माझा उत्साह वाढतो एवढं नक्की. कारण हा प्राणी नेहमी ताजा तवाना आणि स्पर्धेला तयार असतो. आपल्या जीवनातही यशस्वी व्हायचं असेल तर घोड्यासारखं तेज तर्रार रहायला हा घोडा मला शिकवतो. दरियाई घोडा (Hippopotamus) म्हणजे या घोड्याला घोडा हा शब्द प्रयोग लावला असला तरी हा आक्रमक प्राणी घोडा नाही. हा पाण्यात राहणारा पानघोडा आहे. त्याचा घोड्याशी संबंध नाही. मात्र ‘दरयाई घोडा’ असे ऐकताना त्याचे पूर्ण समुद्रावर राज्य असेल म्हणून त्याला दरयाई घोडा म्हटले गेले असावे, असे वाटायला लागते. असा घोडा आपल्याकडे असेल तर किती मजा येईल नाही. असो. आपल्याकडे नसला तरी नाशिकच्या पांडवलेणी कोरणाऱ्या सातवाहन राजा सातकर्णीकडे असा घोडा होता. असे त्याने येथील ब्राह्मी शिलालेखावर नमूद करून ठेवले आहे. या सातवाहन राजाचा घोडा दोन समुद्रांचे पाणी पिलेला होता. खरं तर समुद्राचे पाणी कोणी पित नाही. त्यात घोड्याने समुद्राचे पाणी पिणे तर शक्यच नाही. मात्र येथे या सातवाहन राजाला आपल्या सत्तेचा विस्तार इतका होता की, पूर्व-पश्चिमेकडील सम्रुद्रापर्यंत आपण पोहचलो आहोत हे सांगण्यासाठी दोन्ही समुद्राचे पाणी आपले घोडे पिल्याचे सांगितले आहे. सातवाहनांच्या दृष्टीने घोडा महत्त्वाचा होता. कारण दोन हजार वर्षापूर्वीच्या युद्धात वेगाने हालचाली करण्यासाठी घोडा हे महत्त्वाचे साधन होतं. त्यामुळे आपल्या कीर्तीबद्दल शिलालेखात लिहिताना त्याने आवर्जून घोड्याचा उल्लेख केलेला दिसतो. घोड्याचा आवर्जून केलेला असा उल्लेख इतरत्र आढळत नाही.
राजसत्तेत महत्त्वाची भूमिका पार पाडत असलेला हा घोडा फक्त लढायांमध्ये दिसत नाही तर बुद्धिबळातील पटावरही आपली महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसतो. याच प्रमुख कारण आहे, ते म्हणजे त्याची चाल करण्याची पद्धत. बुद्धिबळाच्या पटावर घोड्याला अडीच घरांचा राजाही म्हटले जातं. पटावरील शत्रू राजालाही हा घोडा आपल्या चालीने जेरीस आणतो म्हणून तोही राजाच ठरतो. एकाच ठिकाणी उभं राहून तीन स्थरांवर हा घोडा आपली नजर रोखून धरतो अन् समोरच्याला पुढं यायच धाडस गळून पडतं. शत्रू पक्षाकडेही घोडा असतो; मात्र जिंकणाऱ्याचा घोडा शहीद झाला तरी तो जिंकण्यासाठी मेलेल्यानं त्याचं हे शहीद होणं हुकमी ठरतं. समोरच्याला चकविण्यासाठी कधी कधी आपल्या घोड्याचा चारा करावा लागतो. त्यालाही तो घोडा सामोरे जातो हे बुद्धिबळातील घोड्याच सामर्थ्यच म्हणावं लागेल. बुद्धिबळातील राजकारणातच नाही तर खऱ्याखुऱ्या राजकारणातही घोड्याची भूमिका भलतीच आकर्षक आहे. नुकतेच इस्त्राईलचे दिवंगत पंतप्रधान शिमोन पेरीज यांच्या नावाने मुंबईतील एक चौक करण्याचा विचार मोदी सरकारने केला होता. मात्र मुंबईकरांनी हा विचार हाणून पाडला. कारण काय तर फोर्टमधील काला घोडा चौकाला पेरीज यांचे नाव देण्यात येणार होते. मात्र घोड्यावरील प्रेमासाठी मुंबईकरांनी हे होऊ दिले नाही. काळा घोडा स्वप्नात दिसणं हे शुभ मानलं जातं नाही का? तर काला घोडा हे नाव दिवसाही स्वप्नात आलं तर मुंबईकरांची चांदीच होत असणार. असो. पण काला घोडा कायम आहे हेच खूप झालं. बघा, घोडा आपल्याला किती प्रिय आहे ते.  
घोडा किती प्रिय असू शकतो. याचे उदाहरण द्यायचं झालं तर शौर्यवैभव महाराणा प्रतापांचं द्यावे लागेल. त्याचा चेतक हा घोड्याबद्दल अनेक अख्यायिका प्रसिद्ध आहेत.  चेतक इराणी घोडा होता. तो गुजरातच्या काठीवाड चोटीलाकेजवळील भिमोर या गावातील होता. काठीवाडचे तीन घोडे एका व्यापाऱ्याने विकत घेतले. अटक, त्राटक अन् चेतक अशी त्यांची नावे होती. अटक हा कामी पडला. त्राटक हा घोडा महाराणा प्रतापांनी त्यांचे लहान बंधू शक्ती सिंह यांना दिला अन् चेतक स्वत:साठी ठेवला. हवेशी स्पर्धा करणं हे चेतकचं वैशिष्ट्य महाराणा प्रतापांना आवडून गेलं होतं. १५७६ च्या हल्दी घाटी युद्धात चेतकने आपल्यातील अद्वितीय स्वामीभक्ती अन् बुद्धिमत्ता अन् शौर्याचा परिचय दिला. जखमी झालेल्या महाराणा प्रतापांना त्याने रणभूमीतून सुरक्षित ठिकाणी पोहचविलं अन् आपले प्राण सोडले. तेव्हापासून चेतक म्हटलं की महाराणा प्रताप आठवतात अन् महाराणा प्रताप म्हटलं की चेतक आठवतो. आतापर्यंत राजे, सरदारांच्या युद्धाकथांवर पोवाडे, वीरगिते अन् कविता रचल्या गेल्या आहेत. मात्र चेतक हा एकमेव घोडा असा आहे की, प्रसिद्ध हिंदी कवी श्याम नारायण पाण्डेय यांनी या चेतकचा पराक्रम आपल्या काव्यात गुंफला. हे गीत आजही मेवाडमध्ये संस्कृतीचा भाग म्हणून गायलं जातं. याच हल्दीघाटीत चेतकची समाधी आजही आपल्या त्याच्या वेगळेपणाची साक्ष देताना दिसते. स्वत: छत्रपती शिवाजी महाराजही या अश्वलक्ष्मीचे पुजक होते असं म्हटलं जातं. ‘ज्याचा पागा बळकट त्यांचे राज्य बळकट’ असं महाराज म्हणत असत. हे म्हणण्यामागे छत्रपतींनी ज्या वेगानं स्वराज्याकडे वाटचाल केली, यात दडलं आहे. शिवकाळात घोड्यांची भूमिका आणि पल्ला महत्त्वाचा ठरलेला महाराष्ट्राने अनुभवला आहेच. हरा घोडा ही अकबर बीरबलाची गोष्टही प्रसिद्ध आहे. तीही घोडा या चरित्राशिवाय पूर्ण होत नाही.
खंडोबा घोड्यावर पाहताना वेगळाच भासतो. तर बंदुकिलाही घोडा म्हटलं जातं, ते त्याच्या चपळतेमुळेच. काला घोडा कला महोत्सव मनात घर करतो हेही त्यांच्या वैभवामुळेच. मध्य प्रदेशातील ‘घोडा डोंगारी’ नावाचं शहर आपल्या नावातच घोडा हे ब्रीद लावतो, टांगेवाला घोडा घुंगरांच्या तालात आपल्याला आकर्षित करतो तर नाशिकची ट्राम देखील पहिल्यांदा घोड्यामुळेच धावली होती. अनेकदा लग्न अडतात तीही घोड्याच्या घोडीमुळेच. नवरदेवाला घोडीशिवाय लग्नात जायचं नसतं तर सासुरवाडीकडच्यांना आजकाल घोडीच मिळत नाही, अशी स्थिती पहायला मिळते. नवरदेव घोडीवरून पडला हेही आपण अनुभवतोच. आपल्या जीवनातील महत्त्वाच्या उत्सवातही घोडा महत्त्वाची भूमिका पार पाडतो. चित्रकारांच्या ब्रशचे रंगही घोडा आपल्या केसांनी सावरताना दिसतो तर महाराष्ट्रातील नंदूरबारमधील सारंगखेड्यातील  आणि उत्तर प्रदेशातील बाराबंकीतील घोडे बाजार म्हणूनच भाव खावून जाताना दिसतात अन् कोट्यवधींचा घोडा घेणारे शोकिन पहायला मिळतात. घोड्यांची रेस तर कोट्यवधीची उथलपुथल करताना अनुभवायता येते. दाऊदलाही या रेसचे आकर्षण असल्याचं त्याच्या फोटोतून आपल्याला पहायलं मिळतं. तर नेपाळचा घोडा दिउर उपग्रह त्याचं हवामान सांगताना दिसतो. त्यांचा हा घोडा अंतराळातही आपली झेप रोखू शकत नाही. तो तेथूनही आपल्याला मदतच करताना दिसतो. चीनच्या प्रथांमध्येही घोडा महत्त्वाचे पात्र आहे. आपल्या पूर्वजांना शांती लाभावी, पाऊस चांगला यावा व समृद्धी लाभावी म्हणून चीनी मंडळी कागदी घोडे बनून ते पेटवितात. तर नाशिकमधील झोडगे गावात पांढऱ्या कापडाचे घोडे बनवून देवाला वाहिले जातात. हा पांढरा घोडा आपल्या गावाचे संरक्षण करतो, अशी झोडगेकरांची समजूत आहे. कुठे कागदी घोडे पेटवून तर कोठे कापडी घोडा वाहून आपल्याला अपेक्षीत नवस बोलण्याची पद्धत, प्रथा, परंपरा आपण पाहतो अन् आश्चर्यचकित होतो की, घोडा या संकल्पनेबद्दल कितीही लिहिलं तरी मन भरत नाही.   

नाशिकची गावं भटकताना मलाही एक घोडा भेटला. हा लाकडी घोडा गोदाकाठच्या गावांमध्ये पहायला मिळतो. कोणी तो नवस म्हणून उभारतो तर कोणी नदीचे पाणी पूररेषा सांगण्यासाठी हा घोडा उभारल्याचं सांगतो. नदीलगता घोडा तोंडापर्यंत पाणी आल्यावर किंचाळतो, अशी सायखेडकरांची समजूत आहे. हे लाकडी घोडे पाहताना माझ्या मनाचा गोडा इतका सैरभैर होतो अन् क्षणात घोडा या प्रजातीच्या विश्वाची सफर घडविताना मी अनुभवलं आहे. हे सगळे घोडे एक वेगळा विचार मनात घर करतात ते त्यांच्या भावविश्वामुळे. मात्र नेपोलियनचा घोडा मला अजूनही काही सांगतो आहे असं वाटतं. हे त्याच्याच गोष्टीतून पाहूया.. एकदा एका युद्धात एक शिपाई नेपोलियनला निरोप देण्यासाठी रणभूमितून धावत आला. तो शिपाई जखमी होता. त्याचा घोडा केव्हाच मृत्यूमुखी पडला होता. धावून धावून त्या शिपायाची स्थितीही गंभीर होती. नेपोलियनने एक निरोप रणभूमितील आपल्या सैनिकांना देण्यासाठी त्याच्या हातात ठेवला. तो घेवून तो शिपाई पुन्हा धावत जाऊ लागला. तेव्हा नेपोलियनने त्याला थांबवलं अन् सांगितलं की, ‘धावत जाऊ नकोस. माझा घोडा घेऊन जा.’ हे ऐकल्यावर तो शिपाई म्हणाला,’मी आपला घोडा घेऊन जाऊ शकत नाही,’ त्यावर नेपोलियनचं वाक्य खूप काही सांगणार होतं. ‘पृथ्वीवर अशी कोणतीच परिस्थिती अथवा वस्तू नाही, की ज्याचा वापर सर्वसाधारण व्यक्ती राज्य करू शकत नाही. आपण आपल्या कर्तुत्वावर विश्वास ठेवला तर आपण काहीही मिळवू शकतो. जेव्हा आपण सामान्यपेक्षा वेगळ्या उंचीच काम करतो तेव्हाच असर्वसाधारण बनतो.’ हे ऐकल्यावर तो शिपाई नेपोलियनच्या घोड्यावर स्वार होतो अन् एका नेपोलियनसारखा लढतो.  ‘Winners don’t do different things, they do things differently’ असं तर या घोड्याला सांगायचं नसेल ना?
रमेशायण / 8380098107

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकमध्येही हवं ‘मूर्तीचं वरकुटे’!

काळाराम मंदिर सत्याग्रह : २ मार्च, काळाराम अन् रमेशायण!