नाशिकमध्येही हवं ‘मूर्तीचं वरकुटे’!

नाशिकमध्येही हवं ‘मूर्तीचं वरकुटे’!

गावानं वारसा जपायचा ठरवलं तर एक आदर्श उभा राहू शकतो. असाच एक आदर्श सोलापुरातील वरकुटे या गावाने उभा केला आहे. नाशिकमध्येही ध्येयवेडी गावे आहेत अन् त्यांनाही संपन्न वारसा लाभला आहे. या प्रत्येक गावानं मूर्तीच्या वरकुटे सारखं झपाटलेपण घेतलं तर नाशिकमध्येही एका नव्या पर्वाला सुरूवात होऊ शकते.
रमेश पडवळ
8380098107
वरकुटे हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील एक गाव. गावाची लोकसंख्या अवघी तीन हजाराच्या आसपास. गावाचं नाव वरकुटे असं असलं तरी गावाची ओळख मात्र गेल्या शंभर-सव्वाशे वर्षांपासून ‘मूर्तीचं वरकुटे’ अशी आहे. गावाच्या नावापुढे मूर्ती हे नाव आलं कोठून, यासाठीचा शोध झाला अन् थेट मूर्तीच्या वरकुटेत दाखल झालो. या गावाचं वेगळपण त्याच्या नावात होतं, हे वेगळं सांगायला नको! त्यामुळेच गावच्या प्राचीन इतिहासाच्या पाऊलखुणा ग्रामस्थांनी वेशीबाहेरच्या एका इमारतीत जपल्याचं पहायला अन् डोळेभरून अनुभवायला मिळालं. सोलापूरच्या प्रसिद्ध शेंगदाण्याच्या चटणीसारखा एक वेगळा गोडवा वरकुटेतील ग्रामस्थांमध्ये पहायला मिळाला. गाव तसं लहान पण, खटपटी फार! असं म्हणण्यामागे कारणही तसचं आहे. श्रद्धा, अंधश्रद्धेच्या पलीकडे जाऊन ही माणसं वेगळा विचार करू शकतात, यावर विश्वास बसत नव्हता. ग्रामीण भागातील माणसं प्रथा, परंपरा अन् श्रद्धा, अंधश्रद्धेशी जास्त चिकटून असल्याचं इतर वेळी पहायला मिळतं; मात्र मूर्तीचं वरकुटेकरांनी आधुनिक विचारांचा मोकळेपणा स्वीकारल्याचं पहायला मिळतं. वरकुटेकरांनी असं काय केलं, असं मनात येणं साहजिकच आहे. वरकुटेकरांना गावातील तळ्यात शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी प्राचीन मंदिराचे अवशेष व अनेक मूर्ती सापडल्या होत्या. या मूर्ती त्यावेळच्या ग्रामस्थांनी एकत्रित जमा करून जपल्या अन् पुढच्या पिढ्यांसाठी सांभाळल्या. काळ बदलत होता. या मूर्ती भग्न होत्या. त्यामुळे गावावर अरिष्ट येईल म्हणून त्या नदी अथवा समुद्रात फेकून द्याव्यात, असे तेव्हा कोणी ना कोणी सुचविलेही असेल; पण वरकुटेकरांनी या अंधश्रद्धेला बळी न पडता आपल्या गावातील जमिनीत सापडलेला हा वारसारूपी खजिना आपल्या गावचा आहे. तो जपला पाहिजे तर आपल्या गावाचा इतिहास पुढच्या पिढ्यांना समजेल, इतक्या साधा विचार त्यांनी केला अन् एका झाडाखाली गावातील तळ्यात सापडलेल्या पन्नासएक मूर्ती काळजाशी जपल्या.
जुनी पिढी मागे पडून नवी पिढी पुढे येत होती. मात्र जुन्या पिढीने नव्या पिढीला एक संस्कार दिला. तो म्हणजे, ‘हा आपल्या गावचा वारसा आहे तो जपला पाहिजे.’ नव्या पिढीनेही हा वारसा जपण्यासाठी एक पाऊल आणखी टाकलं. ग्रामपंचायत निधीतून उघड्यावर पडलेल्या या मूर्तीसाठी २० बाय ३० फूटाच्या एक खोलीत एक संग्रहालय उभारण्याचा निश्चय केला. ग्रामस्थांच्या या प्रयत्नांना २००९-१० मध्ये सोलापूरचे तत्कालिन जिल्हाधिकारी जगदीश पाटील यांनी पाठिंबा देत संग्रहालयासाठी विशेष निधीही मंजूर केला. यातून गावात संग्रहालय उभं राहिलं. संग्रहालयात पंचवीस सूरसुंदरींच्या मूर्तीसह विष्णू, कुबेर, शिव, वायू, चामुंडा आदी मूर्ती अभ्यासासाठी ठेवलेल्या आहेत. या मूर्ती फक्त ठेवलेल्या नाहीत, तर संग्रहालयांमध्ये मूर्तीखाली पक्के व्यासपीठ ग्रामस्थांनी उभारलं. अशा पद्धतीनं मूर्तीरूपी वारसा जपणारं मूर्तीचं वरकुटे राज्यातील पहिलं गाव ठरलं. हा प्रयोग त्यांनी आठ वर्षांपूर्वी केला होता. मात्र या उपक्रमाची ना कोणी दखल घेतली, ना ही कोणी त्यांचा आदर्श घेतला. पण, आम्ही हे कोणासाठी म्हणून केलेलं नाही, असेही वरकुटेकर ठासून सांगतात. हा वारसा आमच्या पूर्वजांनी जपून ठेवला नसता तर मूर्तीचे वरकुटे हे फक्त ‘सोलापूर जिल्ह्यातील एक गाव’ एवढचं काय तो या गावाचा परिचय असता; मात्र आता तसे नाही. आमच्या गावातून जाणारी मंडळी आवर्जून गावात थांबतात. त्यामुळे गावाचे अर्थकारणही बदललं आहे. वरकुटेकर आवर्जून गावात येणाऱ्यांचे स्वागत करतात. गावातील संग्रहालय दाखवितात अन् पुन्हा गावात येण्याचे प्रेमान आमंत्रणही देतात. आम्ही आमचा वारसा आमचं शक्तीस्थळ बनविलं आहे, असं ते आवर्जून सांगतात.
वारसा जपण्याची लढाई ना थांबली आहे ना थांबणार आहे. कोठे ना कोठे आपला वारसा जपण्यासाठी प्रयत्न सुरूच असतो. असेच आणखी एक उदाहरण पंढरपुरातील आहे. ‘गावातील भग्न होऊन पडलेला अथवा गावाला नको असलेला मूर्तीरूपी वारसा एकतर गावाने जपावा नाहीतर आमच्याकडे आणून द्यावा,’ असा ध्यास घेतलेल्या माजी पुरातत्त्व उपसंचालक अन् सोलापूर विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील यांचा हा वारसा जपण्यासाठी केलेला पंढरपूरचा संघर्ष प्रेरणादायी आहे. पंढरपूरच्या एका मंदिरातील मूर्ती बदलली जाणार असल्याचे वृत्त वृत्तपत्रांमध्ये झळकलं. अनेकदा मूर्ती खूपच भग्न अथवा झिजली असेल तर देवस्थान असा निर्णय घेतं. यात काही विशेष नव्हते; मात्र बदलली जाणारी मूर्ती समुद्रात विसर्जित केली जाणार होती. मूर्ती प्राचीन असल्याने ती जपली पाहिजे, असे डॉ. माया पाटील यांना वाटलं. त्यांनी पंढरपुरकरांशी संपर्क साधून मूर्ती विसर्जित करण्यापेक्षा पुरातत्त्व विभागाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विद्यापीठाच्या संग्रहालयाकडे सोपविण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मूर्तीचा उपयोग होईल, या चांगल्या हेतूचे देवस्थानने स्वागत केले. मात्र काही मंडळींनी मूर्ती विसर्जित करण्याचा हट्ट धरला. यातून मोठा वाद उभा ठाकला; मात्र आपला वारसा जपण्याऐवजी समुद्रात सोडून देणे त्यांना पसंत नव्हतं. त्यातून संघर्ष निर्माण झाला. मात्र, वारसा जतन करणे का गरजेचे आहे हे पटवून देत त्या मूर्तीला विसर्जित होण्यापासून त्यांनी वाचवलं. आज ती गजलक्ष्मीची मूर्ती सोलापूर विद्यापीठाच्या संग्रहालयात अभ्यासली जात आहे. यावर डॉ. माया पाटील म्हणतात,‘संस्कृतीची जपणूक इतर कोणी येऊन करेल याची प्रतीक्षा करण्यापेक्षा प्रत्येक गावाने आपल्या गावातील वारसा ओळखून त्याचे संवर्धन कसे करता येईल, याकडे लक्ष द्यायला हवे. वरकुटे गावाने जे केले ते प्रत्येक जिल्ह्यात व्हायला हवे. आपला इतिहास हा वारसा सांगतात, मग तो इतिहास जपण्यासाठी तो वारसा जपायला नको का? वारशाच्या जतनाबाबत आपण फक्त बोलतो, करत काहीच नाही. काही तरी सकारात्मक उभे करायचे असेल तर जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत. यासाठी नव्या पिढीने पुरातत्त्व विषयाचा अभ्यास करून आपला वारसा जपण्यासाठी प्रयत्न करायला हवा.’ असा संघर्ष अन् तळमळ पाहिली की, मूर्तीचे वरकुटे हे लहानसे गाव जे करू शकते ते नाशिकमध्ये होऊ शकत नाही का, असा प्रश्न उभा राहतो.
मूर्ती जपण्याच्या उदाहरणांमध्ये नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयचा उल्लेख आवर्जून करायला हवा. सिन्नरमधील उपेक्षितरित्या पडलेल्या काही मूर्तीना सावानाने आपल्या इमारतीबाहेर जागा दिल्याने हा वारसा आजही नाशिकरांना अनुभवायला मिळतो आहे. नाहीतर या मूर्तीचे काय झाले असते, कोणास ठाऊक! वणी गावातील एका लहानशा नदीपात्रात अनेक मूर्तीशिल्प पडून आहेत ती गावाने जपायला हवीत. इगतपुरीतील बेलगाव तऱ्हाळ्यात अशाच प्रकारे प्राचीन मंदिरांचे अवशेष इतस्तत: पडून आहेत. ते जपण्यासाठी गावाने वरकुटेचा आदर्श घ्यायला हवा. पेठ गावात एका तलावाजवळ अशा प्रकारे मंदिर शिल्पांचा ढीग पडलेला आहे. हा वारसा संग्रहालयरूपात जपला तर पेठला वेगळेपण नक्कीच मिळेल. देवघर या गावातही अशीच स्थिती आहे. वडनेर दुमाला, खाणगावथडी अन् धारणगाव येथे प्राचीन मंदिरांचे अवशेष अजूनही जीवदान मिळेल या प्रतीक्षेत आहेत. या मंदिरांना पुढच्या पिढ्यांपर्यंत नेण्यासाठी नाशिककर म्हणून आपण प्रयत्न करायला हवेत. सिन्नरमध्ये असंख्य प्राचीन अवशेष व मूर्ती रस्त्यालगत, नदीलगत, हगणदारीत उपेक्षितरित्या पडून आहेत. याचे संकलन करून राजकियदृष्ट्या सजग असलेल्या सिन्नरमध्ये सुसज्ज संग्रहालय उभे राहू शकते. चांदोरीतील मंदिरे बाराही महिने पहायला मिळू शकतात, हरसूलमध्ये ठाणापाडा, वणीतील मार्कंडपिंप्री, नांदूरी, चांदवडमधील वडनेर भैरव, मालेगावातील निंबाईत, सिन्नरमधील नायगाव, वावीसह नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, बागलाण, देवळा, त्र्यंबकेश्वर, मनमाड, सटाणा या तालुक्यांमधील किमान दीडशे गावांमध्ये नाशिककरांचा वारसा उपेक्षितपणे पडून आहे. जुनी मंदिरे पाडून सिमेंटची मंदिरे उभारण्याचे फॅडही जिल्ह्यात अधिक आहे. नवे मंदिर बांधायला आक्षेप नाही. मात्र जुन्या मंदिरातील मूर्ती, शिल्प समुद्रात अथवा नदीत सोडणे हा तर आपल्या वारशावरील अत्याचारच नाही का? मूर्ती भग्न झाल्या म्हणून असे होत असेल तर त्या फेकण्यापेक्षा सावाना, पुरातत्त्व खात्याचे वस्तुसंग्रहालयाकडे सोपविल्या तर एक मोठा इतिहास जपण्यासाठी सकारात्मक पाऊल ठरेल. यासाठी इच्छाशक्ती जागृत झाली तर गावागावांमध्ये मूर्तीचं वरकुटे उभं राहिल. नाशिकमध्येही वरकुटे सारखं एकतरी गाव उभं करायला हवं, असं नाही वाटतं?
rameshpadwal@gmail.com
8380098107

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लकडी की काठी, काठी का घोडा!

काळाराम मंदिर सत्याग्रह : २ मार्च, काळाराम अन् रमेशायण!