नासिक कर्फ्यू डायरी

नासिक कर्फ्यू डायरी
        कर्फ्यू म्हटलं की, जबरदस्तीनं घरात राहण्याची सक्ती... रस्त्यावर आलात तर गोळ्या घालण्याची भीती. एखाद्या सरकारची दहशत, कोणाला तरी काही तरी मिळवायचयं म्हणून आवाज दाबण्याची प्रशासन व्यवस्थेला हाती घेऊन गेलेली प्रक्रिया. मात्र, एखाद्या आजारी पाडणार्या व्हायरसमुळे जगावर स्वत:हून कर्फ्यू ओढवून घेण्याचं संकट ओढवेल, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. इंग्रजी चित्रपटांमध्ये मात्र, हे चित्र अनेकदा चितारलं गेलं आहे. टाइमपास म्हणून हा चित्रपट पाहतानाही कधी तरी ‘करोना’ नावाचा व्हायरसमुळे असं संकंट जगावर ओढवेल, असं कधी वाटलं नव्हतं. जे आपण आज प्रत्यक्षात अनुभवतो आहे. जनता कर्फ्यूच्या एका दिवसानं आपल्याला इतकं भेदरवून टाकलं की, आपण सायंकाळी व्हायरस गेला, अशी भाबडी आशा बाळगत रस्त्यावर आलो. खरंतर, कोंडून घेण्याची, राहण्याची आपली संस्कृती नाहीच. एखादं पुस्तक संपवायचंय म्हणून आठवडाभर लायब्ररीत अथवा घरात कोंडूंन घेणं वेगळं अन् रस्त्यावर आलात, लोकांना भेटलात, हात मिळविला, जवळून बोललात तर आजारी पडून मृत्यूपर्यंत आपला प्रवास होऊ शकतो, ही भीती वेगळी. भीतीनं कोंडून घेणं म्हणजे एक मानसीक जबरदस्तीचं. मग ती आपल्या हिताची का असेना, अशी आपली मानसिक स्थिती असणार यात शंका नाही. पण, जनता कर्फ्यूमुळेच हा व्हायरस पिटाळला जावू शकतो तर याला दुसरा पर्यायही नाही. ‘लाथो के भूत बातों से नही मानते’ हे बहुदा या व्हायरसला दाखवून द्यावं लागणार आहे.
        आपल्यासमोर आजपासून सुरू झालेल्या कर्फ्यूमुळे अनेक प्रश्न आहेत. मगा सांगितल्याप्रमाणे हा कर्फ्यू आपल्या फक्त घराबाहेर पडण्याच्या स्वातंत्र्यावर आपल्या हितासाठी गदा आणतो. पण, आपण बोलू शकता, लिहू शकता, एकमेकांशी फोनवर, व्हिडिओ कॉलवर मुक्तपणे संवाद साधू शकतो. आपल्या कुटुंबातील आतापर्यंत जमजून घेण्यात कमी पडलेल्या सदस्याला समजून घेण्यासाठी प्रयत्न करू शकतो. आर्इ दिवसभर किती काम करते, हे पाहू शकतो. बाबा उशीरा येतो लवकर जातो पण, आता तो नेमकं काय काय करू शकतो आणि घरात बांधून ठेवल्यानं त्याची किती तडफड होणार आहे, हेही पाहू शकतो किंवा त्या बाबाला आर्इला अथवा घरातील ज्येष्ठाला आपलंही करू शकता. खरतरं अनेकदा लोक आपल्या बरोबर आयुष्यभर असूनही ती समजत नाहीत. पण, हा २१ दिवसांचा कर्फ्यू आपल्याला आपल्या माणसांच्या जवळ घेऊन जार्इल, असं वाटायला लागलं आहे. अर्थात, मोबाइल जरा बाजूला ठेवला तर! कारण, आताही थांब जरा मला हे पाहू दे! असं म्हणतं मोबाइलच हाती ठेवायचा असेल तर संवादाचा हा ‘कर्फ्यू’ धागाही आपण तोडून टाकू की काय, असं वाटायला नको. पण, तरही खूप वेळ आपल्याकडे असणार आहे या कर्फ्यूला समजून घेण्यात आणि आपल्याशी, आपल्या शहराशी संवाद साधण्यासाठी.
        त्याच बरोबर प्रश्न पोटापाण्याचाही असणार आहे. ज्यांचं जगणं दररोजच्या हातावर आहे, त्यांचं काय होणार. त्यांच्यासाठी आपल्या शहरातील अनेक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. आपणही आपली पूर्ण काळजी घेत त्यांना काही मदत करू शकतो का? हेही पहाता आलं तर उत्तमच. जगण्यासाठीचा संघर्ष काय असतो, यावर कोणकोणत्या पद्धतीने मात करता येर्इल, याचाही विचार करावा लागणार आहे. अर्थात जीवनावश्यक सर्वकाही सुलभरितीने उपलब्ध होर्इलच यासाठी प्रशासन व्यवस्था सक्रिय असेल मात्र, त्याला संयमानं प्रतिसाद देणं ही देखील तेवढीच गरज आहे. कारण, गर्दी हेच या आजाराचं पहिलं लक्षण आहे हे जरा समजून घ्या. चहाची सवय, फास्ट फूडची सवय, सिगारेट, दारू म्हणजे अशा प्रत्येक गोष्टीची सवय की ज्यांची हौस म्हणून आपण उपभोग घेत असतो, अशी प्रत्येक गोष्ट टाळावी लागणार आहे. अनेकांनी गेल्या दोन दिवसांपासून यापैकी कोणत्याही गोष्टींवर खर्च करण्याचा विचार करूनही ते करू शकले नसतील. अर्थात, जीवावर बेतलं असताना दारू दुकानांवर रांगा करणारी मंडळीही आहेतच म्हणा. पण, अशीही मंडळी आहेत की, आजचा दिवस कसा जाणार याची त्यांना भ्रांत आहे. हे एकवीस दिवस आपल्या सहनशक्तीची परिसीमा पाहणारे आहेत. कारण, आताच डोकं जड पडायला लागलं आहे. मात्र, हे दिवस आपल्याला कसं जगायचं आहे, हेही शिकविणारे असतील.
        आपण माणसं आहोत, माणुसकी आपला धर्म आहे आणि हे जग माणसांसाठी आपल्यासोबत सहवासात राहणार्या प्राणीमात्रांसाठी बनलं आहे, हे दाखवून द्यायचं असेल तर संयम बाळगत आपल्यासाठी दवाखान्यांमध्ये लढणारे, रस्त्यावर राबणारे, प्रशासनव्यवस्थेत दिवसरात्र एक करणारे असंख्य हात आपले स्वत:चे आहेत असं समजून त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करा. तरच कर्फ्यूचे हे दिवस ज्यासाठी आहेत ते साध्य पूर्ण होण्याकडे आपण जावू. आणि हे लक्षात ठेवा, नासिक हे प्राचीन शहर आहे आणि या शहरानं कोणालाही पराजित व्हायला शिकविलेलं नाही. हे शहर, शहरातील प्रत्येक गोष्टी आपल्याबद्दल विचार करते आहे. आपल्या सोबत आहे.
महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र आपल्या दारात येणार नसल्याने आपलं शहर नेमकं हा प्रत्येक दिवस कसं जगतं आहे, हे ‘नासिक कर्फ्यू डायरी’तून आपल्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत राहिलं. सुरक्षित रहा.. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.
- रमेश पडवळ, महाराष्ट्र टाइम्स, नासिक
8380098107 / rameshpadwal@gmail.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकमध्येही हवं ‘मूर्तीचं वरकुटे’!

लकडी की काठी, काठी का घोडा!

काळाराम मंदिर सत्याग्रह : २ मार्च, काळाराम अन् रमेशायण!