गुलशन-ए-इश्क

गुलशन-ए-इश्क 

शीख साम्राज्याचे शेर-ए-पंजाब रणजीतसिंहांची राणी जिंद कौर पतीच्या निधनानंतर शीख साम्राज्य सावरण्याचा प्रयत्न करते. मात्र, सत्तेसाठी हपापलेले ब्रिटिश तिची तिच्या मुलापासून अन् साम्राज्यापासून ताटातूट करतात. एकीकडे व्हिक्टोरिया तिच्या मुलाचा सांभाळ करत असते, तर दुसरीकडे साम्राज्य आणि मुलं गमावल्याची दु:खाने जिंद नेपाळमध्ये एकांतवासात असते. शीख साम्राज्य, नेपाळ, लंडन, नाशिक आणि पुन्हा लाहोर असा जिंदच्या अनोखा प्रेमाचा प्रवास म्हणजे गुलशन-ए-इश्कचं म्हणावा…

रमेश पडवळ ramesh.padwal@timesgroup.com

दोन हजार वर्षांपूर्वी मोहाच्या फुलांनी गोदाकाठ दरवळून जायचा. ती फुलं पाण्यात टपटपायची तेव्हा प्रेमाचा संदेश घेऊन पुढच्या गावापर्यंत हा दरवळ बहरायचा अन् प्रत्येक थेंबा थेंबानं अंग शहारायचं! तेव्हा गालिब असते तर किती सुंदर लिहिलं असतं, असं वाटण्यापूर्वी दोन हजार वर्षांपूर्वीचा हाल नावाचा राजा तेव्हाचा एक गालिब म्हणावं इतका अनोखा कवी, गोदाकाठच्या मोहाच्या फुलांविषयी तेवढंच सुंदर वर्णन सप्तशती ग्रंथात नोंदवितो. अशा या नाशिकनं कवी कालिदासांनाही भुरळ घातली होती. एवढंच काय तर वनवासाला पंचवटीत विसावलेले श्रीराम व सीता यांच्यातील प्रेम इथेच तर फुललं. असंख्य देवांना ही भूमी आपली वाटली तर साधूंनी ती तपोभूमी म्हणून स्वीकारली. अगदी नाशिकच्या मोहात रासक्रीडा करणारा मुल्हेरचा श्रीकृष्ण का असेना. अशी हजारो उदाहरणे नाशिकच्या मोहाच्या फुलांपासून ते गुलशनाबादमधील गुलाबांच्या बहरापर्यंतची देता येतील. प्रेमाला जपण्याचं, वृद्धींगत करण्याचं, फलश्रृत करण्यालाही नाशिकभूमी पोषक ठरली आहे. इतिहासाचं अन् नाशिकचं एक अनोख नातं आहे. मग ते शेकडो वर्षांपूर्वीच्या सातवाहन युगाचं असो वा यादव घराण्याचं. मराठा कालखंडाच असो वा ब्रिटिशांचं. सत्तांतराच्या स्पर्धेत हे नातं युद्ध, लढाय्या अन् संघर्षांनी अधिक घट्ट होत गेलं. तो इतिहास आजही खाणाखुणांतून नाशिकच्या अंगाखांद्यावर जगताना दिसतो. नाशिकनं युद्ध झेलली तशीच प्रेमाची माणसही ह्दयाशी जपली अन् पुन्हा वारसदारांच्या कुशीत सोपवली. म्हणून या शहराला प्रेमे शहर-ए-नाशिक म्हणावसं वाटतं. म्हणूच अनेक महात्मे, राजे, महाराजांनी आपले शेवटचे क्षण गोदाघाटाला देत येथेच कायमचा विसावा घेतला आहे. अनेकांसाठी हे शहर आश्रयदाताही झालं. अशाच अनेक ऐतिहासिक प्रसंगातून गोदाकाठावरची मंदिरे, समाध्या येथे उभ्या राहिल्या. अनेकदा एखादं मंदिर, समाधी कालपरत्वे नष्ट होते अन् मोकळ्या झालेल्या जागेत पुन्हा दुसरी एखादी वास्तू उभी राहते. गोदाघाटावरील दुतोंड्याही असाच एका समाधीच्या जागेवर उभा आहे. ती समाधी आहे शीख साम्राज्याचा पहिला राजा शेर-ए-पंजाब रणजित सिंह यांच्या पत्नी जिंद कौर यांची. प्रेमाचं मोठेपण सांगणारा हा दुतोंड्या मारुती कितीही पूर येवोत, जिंदच्या आठवणींना घेऊन तो कायम तेथेच उभा पहायला मिळणार आहे. म्हणूनच शेर-ए-पंजाब आणि जिंदची ही कहाणी अचंबित करणारी आणि दुतोंड्याच्या रूपाने प्रत्येक नाशिककरांच्या मनात अचल राहणारी आहे.
ही ऐतिहासिक घटना आहे शीख साम्राजाचा पहिला राजा शेर-ए-पंजाब रणजी सिंह (जन्म १७८०, मृत्यू १८३९) यांची. आजचा पाकिस्तान, जम्मू काश्मीर व दिल्ली हे पूर्वी शीखांचं पंजाब साम्राज्य होतं. भारत भूमीवर ब्रिटिश व्यापारी म्हणून आले अन् त्यांनी भारत देश बळकावयाला सुरुवात केली. एक एक राजा, संस्थान ब्रिटिशांपुढे पडत होतं. जे संघर्ष करीत होते ते धुळीला मिळू लागले होते. ब्रिटिशांच्या दबावापुढे पंजाब प्रांत मात्र फारशी दाद देत नव्हता. हा संघर्ष तीव्र होण्याच्या मार्गावर होता. शीख साम्राज्याचा पहिला राजा शेर-ए-पंजाब रणजीतसिंह यांनी आपली पकड काश्मीरपासून मुलतानपर्यंत आणि पेशावरपासून आग्र्यापर्यंत मजबूत करून ठेवली होती आणि या शीख साम्राज्याची राजधानी होती लाहोर. वडिलांच्या निधनानंतर अवघ्या बाराव्या वर्षी रणजीत सिंहांवर पंजाब प्रांताची जबाबदारी होती घेतली अन् एक साम्राज्य निर्माण केलं. १ एप्रिल १८०१ रोजी त्यांनी महाराजा हे पद ग्रहण केले अन् ते शीख साम्राज्याचे पहिले राजा ठरले. अफगाणिस्तान आणि ब्रिटिशांविरोधात त्यांनी कडवी झुंज दिली. अफगाणींना हरवत ते मुस्लिमांवर राज्य करणारे पहिले गैरमुस्लिम राजेही ठरले. रणजीत सिंहाच्या या झंझावातासमोर ब्रिटिशांचं पंजाब साम्राज्य बळकावण्याचं स्वप्न फिकं पडू लागलं होतं. १८३९ मध्ये रणजीत सिंहांचा मृत्यू झाला अन् ब्रिटिशांसाठी ही आयती संधी चालून आली. मात्र, शीख साम्राज्याची बांधणी नियोजनबद्ध होती. तिला सहज तडे जाणे शक्य नव्हते. शीख साम्राज्याचा ताबा घ्यायला ब्रिटिश आसुसलेले होते. शीखांमध्ये अंतर्गत बंडाळी निर्माण करूनच हे साम्राज्य उद्ध्वस्त केले जाऊ शकतं, हे लक्षात घेऊन ब्रिटिशांनी आपली चाल खेळली. शीख साम्राज्याचे तुकडे झाले तरच हे साम्राज्य खालसा करता येईल ही ब्रिटिशांची नेहमीची चाल तेथेही त्यांना उपयोगी पडली. मात्र, या सगळ्यात रणजीत सिंहांची नववी पत्नी व शीख साम्राज्याची महाराणी जिंद कौर (जन्म १८१७; मृत्यू १८६३)ने शीख साम्राज्य सावरण्यासाठी पतीच्या निधनाचे दु:ख बाजूला ठेऊन पुढे सरसावली. महाराणी जिंद कौर सौंदर्य, करारी स्वभाव आणि आक्रमकवृत्तीसाठी प्रसिद्ध होती. तिची कीर्ती ब्रिटिशांपासून लपली नव्हती. रणजीत सिंहानंतर ब्रिटिशांनी कोणाचा धसका घेतला असेल तर ती होती जिंद. हा धसका इतका होता, की ब्रिटिशांनी लंडनला पाठविलेल्या पत्रांमध्ये शीख साम्राज्याची महाराणी जिंद कौरचा उल्लेख ‘पंजाबची मेस्सिलिना’ असा केला आहे. यावरून रणजीत सिंहांनंतरही शीख साम्राज्य मिळविणे जड जाणार असल्याचे ब्रिटिशांच्या लक्षात आलं होतं. दरम्यान, महाराणी जिंदचा मुलगा दलीप सिंह (जन्म १८३८; मृत्यू १८९३) त्यावेळी अवघा एक वर्षाचा होता. त्याला पाळण्यातच राजा बनविणे शक्य नसल्याने ती चार वर्षांपर्यंत स्वत: राजसत्ता हाती घेऊन शीख साम्राज्य वाचविण्यासाठी गृहकलह आणि ब्रिटिशांविरोधत लढत राहिली. मात्र, ब्रिटिशांनी पेटवलेली अंतर्गत बंडाळी शांत व्हायला तयार नव्हती. ती थेट ब्रिटिशांविरोधात लढली असती तर एकवेळ जिंकलीही असती. मात्र, आपल्याच लोकांविरोधात लढणं तिला जड जाऊ लागलं. बंडाळी थोपविण्यासाठी तिने आपला पाच वर्षांचा मुलगा दलीप सिंहला १५ सप्टेंबर १८४३ रोजी शीख साम्राज्याचा दुसरा राजा म्हणून घोषित केलं. शीख साम्राज्याला दुसरा राजा मिळाला. ब्रिटिशांविरोधात लढायला शीखांना मनोधैर्य मिळाले. मात्र दलीप सिंह हा शीख साम्राज्याचा अखेरचा राजा ठरला. दलीप सिंह या अल्पवयीन मुलाला राजा बनविल्याचे ब्रिटिशांना रूचले नाही. अंतर्गत बंडाळीचा फायदा घेत १८४५-४६ दरम्यान अँग्लो-शीख युद्ध भडकले. यात ब्रिटिशांनी आपली खास तोडा-फोडा राज्य कराची भूमिका येथेही वटवली अन् जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्य म्हणून घोषित केलं तर दिल्लीही ताब्यात घेतली. त्यानंतर शीख साम्राज्याची राजधानी लाहोर शहरही ब्रिटिशांच्या ताब्यात आले. पहिले अँग्लो-शीख युद्ध आणि अंतर्गत बंडाळीमुळे महाराणी जिंद कौरच्या हातातून सर्वकाही सुटत गेलं. शीख साम्राज्याची अखेर तिच्या डोळ्यात रक्ताचे अश्रू बनून वाहू लागले. अखेर ९ मार्च १८४६ रोजी ब्रिटिशांनी शीख साम्राज्य खालसा केलं. त्यानंतर महाराणी जिंदला कैद केलं गेले, तर महाराजा दलीप सिंहला लाहोरच्या दरबारातून आपल्या आर्इकडून हिसकावून ब्रिटिश सैन्यांच्या संरक्षणात लंडनला पाठविलं गेले. रणजित सिंहांकडील कोहिनूर हिरा परंपरेनुसार शीख साम्राज्याचे दुसरे राजा दलीप सिंहांकडे आलेला असतो. या कोहिनूर हिऱ्यामुळेच दलीप सिंहांना तेथून लंडनला हलविले गेले, असे काही अभ्यासक मानतात. भारताच्या अखंड संस्कृतीतील खऱ्या अर्थाने कोहिनूर असलेले शीख साम्राज्य खालसा झालं. कोहिनूर हिऱ्याच्या रूपाने आजही ही जखम आपल्या मनांत ताजी आहे.
कैदेतील महाराणी जिंद लाहोरहून आपली कशीबशी सुटका करून नेपाळच्या आश्रयाला गेली. शीख साम्राज्याच्या महाराणीला आश्रित जगण जगावं लागतं होत. शीख साम्राज्याचा दुसरा अल्पवयीन राजा दलीप सिंहांना साम्राज्यासह आपल्या आईपासूनही तोडलं अन् ते लंडनच्या व्हिक्टोरिया राणीचे आश्रित बनले. राणी व्हिक्टोरिया त्यांना एका प्रिन्सचा दर्जा देत सांभाळते. त्यांचे शिक्षण आणि जीवन सुकर व्हावे म्हणून व्हिक्टोरिया राणी आपल्या देखरेखीखाली त्यांची व्यवस्था लावून देतात. त्यांना शीख धर्म सोडून ख्रिस्ती बनविलं जातं. दलीप सिंह आपण कोण आहोत हे लंडनच्या वातावरणात विसरून गेलेले असतात. लंडन शहरात त्यांची ओळख ‘द ब्लॅक प्रिन्स’ म्हणून झालेली असते. व्हिक्टोरिया राणींन ठेवलेलं हे नाव दलीप सिंहची खरी ओळख नाही हे लाहोरहून लंडनला आलेल्या ५ वर्षांच्या महाराजाला २३ वर्षांचा होईपर्यंत लक्षात आलेलं असतं. आपण नेमके कोण आहोत या शोधाअंती दलीप सिंहला आपण शीख साम्राज्याचे राजा असल्याची जाणीव व्हायला लागते. दलीप सिंह व्हिक्टोरिया राणीला आपल्या आर्इला भेटण्यासाठी भारतात जाण्याची इच्छा व्यक्त करतात. लंडनच्या राजमहालात त्यांच्या या इच्छेने खळबळ निर्माण होते. दलीप सिंहने अजाणतेपणी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असला तरी तो मूळचा ‘सरदार’ आहे आणि त्याच्यातील ‘सिंह’ केव्हा जागा होर्इल, याचा नेम नाही, अशी प्रतिक्रिया लंडनच्या दरबारात उमटते. दलीप भारतात गेला तर पुन्हा शीखांना बळ मिळेल व ते बंड करून उठतील, याची भीती ब्रिटिशांमध्ये निर्माण झाल्याने ही इच्छा पूर्ण करणे शक्य नसल्याचे दलीपला सांगितले जाते. मात्र, दलीप हट्टाला पेटल्याने यावर उपाय म्हणून दलीपच्या आर्इला म्हणजे महाराणी जिंद कौरला नेपाळहून भारतात आणण्याची तयारी सुरू होते. मात्र आर्इला भेटण्यासाठी दलीप मायदेशी जाण्याचा हट्ट धरतो आणि त्याला लाहोरला जाण्याची परवानगी नाकारत कोलकत्याला आर्इची भेट घडविण्याचे निश्चित केले जाते. दलीप आईला भेटण्यासाठी १६ जानेवारी १८६१ रोजी कोलकत्यात येतो. तेव्हा त्यांना शिखांना भेटू दिलं जात नाही. ते आईला घेऊन लंडनला येतात. तेव्हा कुठे दलीप सिंह यांना आपल्या शेर-ए-पंजाब असलेल्या वडिलांच्या कार्यकर्तृत्वाची ओेळख जिंद करून देते. ब्रिटिशांना याची कुणकुण लागते अन् दलीप सिंहांच्या हालचालींवर नजर ठेवली जाऊ लागते. आपले साम्राज्य मिळविण्यासाठी दलीप सिंह सहकाऱ्यांची जमवाजमव करू लागतो. याच दरम्यान, १ ऑगस्ट १८६३ रोजी महाराणी जिंद कौर यांचा मृत्यू लंडन येथील केन्सिंग्टन येथे होतो. मरणापूर्वी जिंदने आपल्या मृत्यूनंतर आपल्याच भूमीत अंत्यसंस्कार करण्याची इच्छा मुलाकडे व्यक्त करते. येथूनच नाशिकशी शीख साम्राज्याच्या ऋणानुबंधाची सुरुवात होते.
महाराणी जिंद कौर यांना मातृभूमीत अत्यंसंस्काराची परवानगी ब्रिटिश नाकारतात. जिंद यांचा देह व दलीपसिंह यांना पुन्हा लाहोरला घेऊन जाणे म्हणजे पुन्हा नव्याने शीख साम्राज्य एकवटले जाण्याची भीती ब्रिटिशांमध्ये निर्माण होते. हा धोका लक्षात घेऊन केन्सिंग्टन येथील एका चर्चच्या आवारात महाराणी जिंदला दफन केले जाते. या घटनेने हतबल दलीप सिंह दुखावतो. आईला दिलेले वचन पूर्ण करता न येण्याचे दु:ख तो वारंवार व्हिक्टोरीया राणीकडे व्यक्त करतो. अखेर त्याच्या या प्रयत्नांना यश येत. दफन केलेल्या जिंदचे पार्थिव आठ महिन्यांनंतर म्हणजे फेब्रवारी १८६४ मध्ये दफनातून बाहेर काढून भारतात अत्यंसस्कारासाठी नेलं जातं. मात्र, मुंबईत आल्यावर मुंबईतील ब्रिटिश प्रशासन त्यांना अत्यंसंस्कारासाठी लाहोरला जाण्याची परवानगी नाकारते. पुन्हा तिढा निर्माण होतो. अखेर त्यांचे अत्यंसंस्कार नाशिकमध्ये गोदावरीकाठी करण्याची परवानगी दिली जाते. यासाठी दलीप सिंह रामकुंडाजवळील जागा विकत घेतात आणि तेथे आईवर १६ फेब्रुवारी १८६४ रोजी अंत्यसंस्कार करतात. अंत्यसंस्कारासाठी गोदाकाठावर दगडी चौथरा बनविला जातो. हा चौथरा आजही रामकुंडाशेजारील अहिल्याबाईंच्या महादेव मंदिरासमोर पहायला मिळतो. ज्या ठिकाणी शीख साम्राज्याची महाराणी जिंद कौर यांच्यावर अंत्यसंस्कार होतात, त्या ठिकाणी त्यांची समाधी बांधून त्यांच्या अस्थी त्यात ठेवल्या जातात. या समाधीची काळजी घेतली जावी व नियमित याकडे लक्ष रहावे, म्हणून दलीप सिंह नाशिकजवळचे एक गाव विकत घेऊन त्याचा महसूल या समाधीसाठी बांधून देतात. हे गाव कोणते याचा संदर्भ मात्र उपलब्ध नाही. ती समाधी म्हणजे आज ज्या ठिकाणी दुतोंड्या उभा आहे तीच ती जागा. शीख साम्राज्याचे पहिले राजा रणजीतसिंह यांची समाधी लाहोरमध्ये तर जिंदची नाशिकमध्ये. आपल्या शीख साम्राज्यासाठी बलिदान दिलेल्या या प्रेमाची अशीही ताटातूट नाशिकभूमीलाही कशी सहन व्हावी! नाशिकनं कोणाला पराजीत होणं शिकविलेल नाही, हा या भूमीचा स्वभाव असल्यानं या ताटातूट झालेल्या प्रेमाला एकत्र करेपर्यंत जिंदला सांभाळण्याची जबाबदारी मात्र, नाशिकनं पार पाडली. कारण जिंदची गोष्ट इथेच संपत नाही.
अंत्यसंस्काराची राख दलीपसिंह गोदेत सोडतात. एका घड्यात ठेवलेल्या आईच्या अस्थी लाहोरमधील वडिलांच्या समाधीजवळ तरी ठेऊ द्या, अशी मागणी दलीप सिंह ब्रिटिशांकडे करतात मात्र ही मागणीही फेटाळली जाते. हा घडा ते गोदाकाठावर समाधी बांधून त्यात ठेवतात. पुन्हा कधी आपले साम्राज्य हाती आले तर आईची इच्छा पूर्ण करण्याचा त्यांचा मानस त्यांच्या डोळ्यातून टपटपत राहतो. या सगळ्या घटनांनी दलीप सिंहांतील राजा जागा झालेला असतो. आश्रित जीवन जगण्याचे परिणाम त्याने भोगलेले असतात. सततच्या अपमानाने जगण्यातील खरा अर्थ त्याला कळालेला असतो. यावेळी दलीप सिंहाचं कुटुंब त्यासोबत असतं. आईची इच्छा अजूनही अपूर्ण असते. हे दु:ख पाठीवर घेऊन तो पुन्हा लंडनला परततो. लंडनला गेल्यावर शीख साम्राज्य पुन्हा उभे रहावे म्हणून दलीप सिंह प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. मात्र, त्यांची ही लढाई अपयशी ठरते. अखेर २२ ऑक्टोबर १८९३ रोजी शीख साम्राज्याचे शेवटचे राजा दलीप सिंह यांचा मृत्यू पॅरिस (फ्रान्स) मधील एक हॉटेलमध्ये विपण्ण अवस्थेत होतो. दलीप सिंहांची कन्या बांबा दलीप सिंह यांनी आपल्या वडिलांची घालमेल अनुभवलेली असते. आपण मूळचे कोण, कोठून आलोत, आपली ओळख काय? अशा अनेक प्रश्नांनी आणि वडिलांच्या आणि आजोबांच्या शीख साम्राज्याला पुन्हा भेटण्यासाठी ती भारतात येते. बांबा एकटीच लाहोरमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेते. सन १९१५ मध्ये लाहोरच्या किंग एडवर्ड मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. डेव्हिड वॉटरस सदरलँड यांच्याशी तिचं लग्न होतं. सर्वकाही सुरळीत सुरू असतं. मात्र, आजोबांनी निर्माण केलेलं शीख साम्राज्य, वडिलांनी दिलेला लढा आणि आईच्या अस्थींना आजोबांपर्यंत पोहचविण्याची घेतलेली शपथ सर्वकाही अर्धवट असल्यानं त्याची बोच तिच्या मनात कायम असते. ६१ वर्षांनंतर का होईना ती आजोबा-आजींना एकत्र आणण्याचा निश्चय करते अन् २७ मार्च १९२४ रोजी बांबा सदरलँड नाशिकला आपल्या आजीच्या अस्थी पुन्हा मिळविण्यासाठी येते. जिंद कौर याच क्षणांच्या प्रतीक्षेत समाधीत विसावलेली असते. ती एकदा नव्हे तर दोनदा. लंडनमध्ये दफन केलेल्या जिंदला आठ महिन्यांनंतर मातृभूमीत नेण्यासाठी दफनातून बाहेर काढले जाते. मात्र ती मातृभूमीपासून पुन्हा दुरावते अन् पुन्हा एकदा गोदाकाठावर समाधीस्त होते. जिंदच्या अस्थी नाशिक येथील समाधीतून बांबा मिळविते आणि आपल्या आजोबांच्या म्हणजे शीख साम्राज्याचे पहिले महाराजा रणजीत सिंह यांच्या लाहोरमधील समाधीजवळ आजीची समाधी बांधते अन् त्यांना एक करते. त्या दोघांना एकत्र यायला ६१ वर्षे लागतात. हा ६१ वर्षांचा दुरावा एक प्रेम बनून नाशिकचा गोदाकाठ आपल्या ह्दयात सांभाळते. हा नाशिकचा बहुमानच म्हणायला हवा. या घटनेनंतर अटारी येथील सरदार हरबन्ससिंग रईसहे बांबा दलीप सिंह यांच्याकडे शीख साम्राज्याची राजकन्या म्हणून अंतिम हक्क (अंतिमअरदास) सादर करतात. त्यानंतर बांबा शीख साम्राज्याची राजकन्या म्हणवली जाते. बांबा दलीप सिंहचा मृत्यू १९५७ मध्ये होतो अन् शीख साम्राज्याच्या वंशाची अखेर होते.
शीख साम्राज्याची अखेर झाली असली तरी महाराणी जिंद कौरच्या आठवणी नाशिकनं १९६० पर्यंत जपल्या. १९६० मध्ये नाशिक महापालिकेने ही समाधी उद्धवस्त केली. कालांतराने त्याच जागी मारूतीची एक विशाल मूर्ती उभी राहिली. जिंदची समाधी व बाजूचा बाजार भरणारी गोदाकाठची जमीन आजही शीख साम्राज्याच्या शेर-ए-पंजाब म्हणवल्या गेलेल्या रणजीत सिंहांच्या नावावर आहे. नाशिकच्या इतिहासाला मिळालेल्या शीख साम्राज्याच्या महाराणीचा हा सहवास प्रेमे शहर असलेल्या नाशिकनं आजही आठवणीत जपला आहे.
000000000000000000000000000000
संदर्भ
1. Guru Granth Sahib Ratnavali, Punjabi University Patiala
2. Sahib Singh: Jivan Britant Guru Nanak Devji (Amritsar) article by Col. Dr. Dalvinder Singh Grewal
3. CHRONOLOGY OF EVENTS OF MAHARAJA DULEEP SINGH (1838-1893 A.D.)
4. Mahan Kosh
5. <http://sikhinstitute.org/duleepsingh/foreword.html>
6. Three Plays : Larins Sahib, Mira, 9 Jakhoo hill, by Gurcharan Das
7. https://www.sikhiwiki.org/index.php/Princess_Bamba_Sutherland

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकमध्येही हवं ‘मूर्तीचं वरकुटे’!

लकडी की काठी, काठी का घोडा!

काळाराम मंदिर सत्याग्रह : २ मार्च, काळाराम अन् रमेशायण!