अहिल्यादेवी होळकर स्मारकाची उपेक्षाच!

अहिल्यादेवी होळकर स्मारकाची उपेक्षाच!

पाच वर्षांपासून विधानसभेत अडकला प्रश्न; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे नजरा

ramesh.padwal@timesgroup.com
MTramehpadwal
नाशिक : अहिल्यादेवी होळकरांची कर्मभूमी असलेल्या चांदवडमध्ये या राजमातेचे स्मारक व्हावे, ही नाशिककरांची पाच वर्षांपासूनची मागणी अजूनही विधानसभेत घुटमळते आहे. नाशिकला दत्तक घेतलेल्या माजी मुख्यमंत्र्यांनी विषय मार्गी लावायचा सोडून कागदी घोडे नाचवित स्मारकाची बोळवणच केली. भाजप-शिवसेना युतीच्या काळात विधानसभेत अडकलेला अहिल्यादेवी स्मारकाचा प्रश्न महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोडवतील का? की, या राजमातेची पुन्हा उपेक्षाच होणार, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
नाशिकचा इतिहास अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. धैर्य आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या अहिल्यादेवींचे स्मारक चांदवड येथील रंगमहालात व्हावे, अशी अपेक्षा नाशिककरांनी २० जून २०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र, त्याची दखलही तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. म्हणून भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी २० जून २०१६ मध्ये विधानसभेत हा विषय मांडला. हिरे यांनी हा प्रश्न जून २०१७ च्या अतारांकित प्रश्नात पुन्हा मांडला. त्यावर उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे स्मारकाबाबत प्रस्ताव मागविल्याचे सांगितले. नाशिक दत्तक घेतलेल्या फडणवीसांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात अहिल्याबार्इ स्मारकाबाबतच्या विषयाचे केवळ कागदी घोडे नाचवित स्मारकाची बोळवण केली, अशी भावना चांदवडवासीयांची आहे.
गेल्या पाच वर्षांपासून विधानसभेत अडकलेला हा स्मारकाचा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोडवतील का, की अहिल्यादेवींची पुन्हा उपेक्षा होणार, असा प्रश्न नाशिककरांना सतावतो आहे. अहिल्यादेवींच्या नावावर राजकारण करणाऱ्या संस्था, संघटनाही अहिल्यादेवीच्या स्मारकाबाबत मूग गिळून गप्प असल्याने हा प्रश्न सुटू शकलेला नाही, अशी खंतही नाशिककर व्यक्त करीत आहेत.
....
जिल्हाधिकारी कार्यालय अनभिज्ञ
चांदवड येथील रंगमहालात अहिल्यादेवी होळकर स्मारक उभारण्याबाबत प्रस्ताव नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविल्याचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जून २०१७ च्या अधिवेशनात सांगितले होते. मात्र, असा कोणताही प्रस्ताव मागितला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय व पुरातत्त्व विभागाकडून मिळाली आहे. रंगमहाल ही वास्तू राज्य संरक्षित वास्तू असल्याने, असे स्मारक उभारायचे असेल तर पुरातत्त्व विभागाच्या सहभागाशिवाय प्रस्ताव तयार होणे शक्य नाही. मात्र, पुरातत्त्व विभागाला अशी कोणतीही सूचना अथवा आदेश मुख्यमंत्री कार्यालय अथवा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेला नसल्याचे सांगितले गेले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकमध्येही हवं ‘मूर्तीचं वरकुटे’!

लकडी की काठी, काठी का घोडा!

काळाराम मंदिर सत्याग्रह : २ मार्च, काळाराम अन् रमेशायण!