तिची डेझर्ट सफारी...

तिची डेझर्ट सफारी...

२०२० मध्ये ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान अबू धाबी येथे सहावा वूमन हेरिटेज वॉक होत आहे. या हेरिटेज वॉकचे वैशिष्ट्य म्हणजे तो फक्त महिलांसाठी असतो आणि तोही चक्क अमिरातच्या तळपत्या वाळवंटात. महिलांमधील क्षमतांना वेगळा आयाम निर्माण करणारा वॉक सबलीकरण आणि वैचारिक सीमोल्लंघनाची संधीच जगभरातील महिलांसाठी ठरते आहे. अबू धाबी ते अल ऐन या दरम्यानच्या वाळवंटातून चालत महिला १२५ किलोमीटरचा अंतर केवळ ५ दिवसात पूर्ण करतात. या रोमांचकारी डेझर्ट सफरी विषयी...…

रमेश पडवळ, नाशिक
Rameshpadwal@gmail.com
8380098107

सात एमिरात म्हणजे अबू धाबी, दुबई, शारजाह, अजमान, उम-अल-क्वैन, रास अल-खैमा, फुजैराह. या प्रदेशाची बहुतांशी जमीन ही वाळवंट आहे; परंतु त्यातही प्रत्येक प्रांतातील रेतीमध्ये विविधता आणि विकास ही ‘युएई’ (United Arab Emirates) ची खासियतच म्हणावी लागते. कारण येथील वाळवंट सहनशक्तीचीही कसोटी पाहतात, असे म्हटले जाते. येथील वाळवंटाचे रंग आणि प्रकार जसे बदलतात तसा हवेचा प्रभाव आणि उष्णतेचे प्रमाणही कमी अधिक होताना जाणवते. या वाळवंटात आपल्याला सोडून दिलं तर आपण काय करणार आहोत, नजर जाईपर्यंत फक्त वाळवंट आणि निळं आकाश. सूर्य जसजसा मावळतीकडे जाईल तसंतसे वाळवंटातील या रेतीचे अन् क्वचितच जाणवणाऱ्या हवेचे रंग बदलताना अनुभवता येतात. हे सगळं अनुभवण्यासाठी तुम्हाला थोडे धाडस करावे लागेल. ते धाडस म्हणजे वाळवंटात चालण्याचे. ते एक अथवा दोन दिवस नाही तर सतत पाच दिवस.

गिरीभ्रमण, गिर्यारोहण, भटकंती अथवा बायकर्स क्षेत्रात महिलांची संख्या अजूनही तशी कमीच आहे. अगदी बोटांवर मोजण्याइतकीच, असेही म्हणायला हरकत नाही. अजून तेवढं स्वातंत्र्य जगभरातील महिलांच्या वाट्याला आलेलं नाही. अगदी भारतातील महिलांच्याही! मात्र, परिस्थिती बदलत आहे. एकूणच भटकंतीच्या सांस्कृतिक जडणघडणीत आणि उद्योगात महिलांचा वाटा वाढतो आहे. त्याचदृष्टीने अबू धाबी येथे दरवर्षी होणाऱ्या वूमन हेरिटेज वॉकडे पाहण्याची गरज आहे. हेरिटेज वॉक ही संकल्पना आता जनमानसात रूजत आहे. अनेक देश आपल्या शहराची, देशाची समृद्धी, इतिहास व वेगळेपण दाखविण्याच्या हेतूने हेरिटेज वॉक घेत आहेत. अनेक ठिकाणी याचे सारर्थही महिलांकडेच अधिक प्रमाणात असल्याचे दिसते. देश-विदेशातील भटकंतीत टूरिस्ट कंपन्या गाईड म्हणूनही महिलांनाच अधिक प्राधान्य आणि संधी देत आहेत. मात्र, तरीही स्वतंत्रपणे भटकंती करण्यात हौशी महिला मागेच असल्याचे दिसतात. यामागेही काही कारणे आहेत. यात कुटूंबाची जबाबदारी, आर्थिक परावलंबित्व आणि अजूनही पुरूषप्रधान संस्कृतीच्या जोखडाखाली जगावे लागत असल्याने त्याचा संमिश्र परिणाम महिलांच्या मुक्त भटकंतीवर झालेला पहायला मिळतो आहे. मात्र, महिलांसाठी जाचक मानल्या जाणाऱ्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये आता बदल घडू लागला आहे हे अबू धाबीने दाखवून दिले आहे. अबू धाबीत गेल्या पाच वर्षांपासून फक्त महिलांसाठी वाळवंटातून सफर घडविणारा वूमन हेरिटेज वॉक http://womensheritagewalk.com/ हा अनोखा प्रयोग यशस्वीरित्या राबविला जातो आहे. हा फक्त अबू धाबीतील महिलांसाठी नाही तर जगभरातील महिलांना यात सहभागी होण्याची संधी दिली जाते.

अबू धाबी ही संयुक्त अरब अमीरातची राजधानी. मुस्लिम राष्ट्रांमध्ये महिलांवर असलेली बंधने या देशाने झुगारून विकासाच्या प्रक्रियेत महिलांनाही सहभागी करून घेतले आहे. म्हणूनच अबू धाबीत होणारा वूमन हेरिटेज वॉक अबू धाबीच्या विकासात साथ दिलेल्या महिलांच्या सन्मानार्थ आयोजित केला जातो. विशेष म्हणजे हा वॉकचे आयोजनही करतात महिलाच. अमेरिकन लेखिका जोडी बालार्ड यांची हा वॉक घेण्याची संकल्पना मांडली व त्याला अबू धाबीच्या असमा अल मुटावा यांची समर्थ साथ मिळाल्याने २०१५ पासून अबू धाबी ते अल ऐन या शहरादरम्यानच्या वाळवंटातून १२५ किलोमीटर अंतराचा हा वॉक महिला पाच दिवसात पूर्ण करतात. गेल्या पाच वूमन्स हेरिटेज वॉकमध्ये जगभरातील चारशेहून अधिक महिलांनी यात सहभाग घेतला आहे. २०२० मध्ये ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान अबू धाबी येथे पाचवा वूमन हेरिटेज वॉक होत आहे. यंदाच्या हेरिटेज वॉकचे वैशिष्ट्य म्हणजे वूमन्स हेरिटेज वॉकच्या गेल्या पाच वर्षांच्या यशस्वीतेमुळे पुरूषांसाठीही असा वॉक घ्यावा, अशी मागणी वाढल्याने खास पुरूषांसाठीही ७ ते ११ फेब्रुवारीदरम्यान मेन्स हेरिटेज वॉकचेही येथे आयोजन होत आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या या उपक्रमात समसमानतेची संधी पुरूषांनाही उपलब्ध करून दिली आहे, असा म्हणायला हरकत नसावी.

अबू धाबी ते अल ऐन या दोन शहरामधील वाळवंटात हा वॉक होणार आहे. नियमित रस्त्यावर चालणे आणि वाळवंटात चालणे यात खूप फरक असतो. त्यामुळे १२५ किलोमीटर हे अंतर वाळवंटात पार करणे हे काठिण्य पातळीच मानली जाते. तप्त, ओसाड, निर्जल वाळवंटात फक्त महिला वॉकमध्ये सहभागी असल्या तरी त्यांच्या सुरक्षितेची पूर्ण काळजी घेतलेली असते. अचानक अॅब्युलन्ससारख्या अत्यावश्यक सेवेची गरज पडू शकते, यादृष्टीने सर्व नियोजन केलेले असते. म्हणजेच वॉक अवघड आणि आव्हानात्मक आहे हे आपल्या लक्षात आलेच असेल. त्यामुळे वाळवंटात आपल्या गरजेच्या गोष्टी सोबत घेऊन चालायचे कसे याबाबत वॉकपूर्वी ट्रेनिंग सेशनही घेतले जाते. हे ट्रेनिंग सेशन करणे सक्तीचे असते. कारण, अचानकपणे सतत पाच दिवस पहाटेपासून सूर्य मावळेपर्यंत चालणे शक्यच होणार नाही. त्यामुळे आपण फिट अहात याचे प्रमाणपत्रही आवश्यक असते. देशविदेशातील महिला एकत्र आल्यानंतर सांस्कृतिक, वैचारिक आणि महिलांच्या भावविश्वावर चर्चा होत असल्याने हे अंतर काहीच वाटत नाही. मात्र, त्यासाठी वाळवंटात चालण्याचे ट्रेनिंग आणि आपला फिटनेस गरजेचाच आहे. कारण, पहाटे वॉक सुरू होत असल्याने वाळवंटातील थंडी आणि त्यानंतर वाढत जाणारे ऊन, वाऱ्याचा सतत बदलणारा प्रवाह, वाळवंटातील वादळ, रेतीचा सतत चेहऱ्यावर होणारा शिडकावा हे सहन करण्यासाठीची सहनशक्तीला जोड लागते ती कोणत्या प्रकारचे कपड घालावेत, बदलत्या वाळवंटातील रेतीच्या रंगाप्रमाणे बुटांचे गेअर आणि चालण्याची पद्धतही बदलावी लागते. कधी वेग घ्यावा लागतो तर कधी शांतपणे चालावे लागते. सायंकाळ होता होता पुन्हा थंडीची झालर तुमच्याभवती आलेली असते. हा सगळा अनुभव ट्रेनिंगदरम्यान अनुभवल्याने प्रत्यक्ष वॉकमध्ये हा अनुभव उपयोगी पडतो आणि आपल्या सहनशक्तीची परीक्षा सोपी व्हायला मदत होते.

 

सहनशक्ती ही या वॉकची पहिली पात्रता म्हणायला हरकत नाही. कमीत कमी अठरा वयोमर्यादा या वॉकसाठी लागते. आपण कोणत्या देशातून अहात याला काहीची बंधन नाही. वॉकला सुरूवात होते अबू धाबीच्या वाळवंटातून. चार रात्री वाळवंटातच रहायचे असल्याने त्यासाठी कॅम्पची व्यवस्था व जेवणाची व्यवस्था करण्यात येते. वॉकचा पहिला दिवस उगवितो पहाटे ४.३० वाजता आणि मावळतो रात्री ९ वाजता. पहाटे ४.३० वाजता वेकअप कॉल त्यानंतर ५ वाजता नास्टा, ५.२० ला सामूहिक प्रार्थना करून ५.३० ला प्रत्यक्ष वॉकला सुरूवात होते. चार-चार जणांचे समूह करून वाळवंटातून चालायला सुरूवात होते. प्रत्येक ६० ते ८० मिनिटांनी दहा मिनिटांचा ब्रेक घेतला जातो. ११.३० ला जेवण करून थोडा आराम घेतला जातो. दुपारी २ वाजता पुन्हा वॉकला सुरूवात होते ती थेट सायंकाळी ६ पर्यंत. कॅम्पच्या ठिकाणावर पोहचल्यावर फ्रेश होऊन ६.३० जेवण घेतले जाते. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, आजच्या दिवसाचा अनुभव व पुढील दिवसाचे नियोजन करून रात्री ९ वाजता वाळवंटात उभारलेल्या हटमध्ये थंड हवेचा अनुभव घेत झोपेचा आनंदही वेगळाच. अशापद्धतीने वाळवंटातील सफरीचे चार रात्री व पाच दिवस पार पडतात. हा अनुभव आतापर्यंतच्या आपल्या सहनशक्तीला कितीतरी पटीने वाढविताना दिसतो. आव्हानांना पेलण्याचा नवा आत्मविश्वास हे वाळवंट देत रहातो. आपल्या जोडीला असलेल्या इतर महिला वेगवेगळ्या देशातून संस्कृतीतून आलेल्या असतात, त्यांच्याशी होणारा संवाद आणि त्या जगत असलेल्या जीवनाचा अनुभव काही निराळाच असल्याचे त्यांचे भावविश्वही समजून घेता येते.

अबू धाबीतील हा वॉक जगभरातील सर्व महिलांसाठी असला तरी यात सहभागी होणाऱ्या महिलांची संख्या मर्यादित आहे ती त्यावर होणाऱ्या खर्चामुळे. वॉकपेक्षाही वॉकसाठीचा खर्च भारतीय महिलांना अधिक कसोटी पहायला लावणारा असू शकतो. त्यामुळेच आतापर्यंत यात भारतीय महिला सहभागी झालेल्या दिसत नाहीत. हा वॉक परदेशात असल्याने जाण्या-येण्याचा खर्च व तेथील ट्रेनिंग व मुख्य वॉकचे शुल्क असा साधारण दोन ते तीने लाखांहून अधिक खर्च यासाठी होऊ शकतो. त्यामुळे भारतीय महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या अधिक सहनशीलतेची कसोटी पहायला लावणारा हा वॉक असू शकतो. मात्र, यावर भारत सरकारकडून धोरणात्मक विचार झाल्यास भारतीय महिलांना वाळवंटही पार करण्याची संधी मिळू शकते. अबू धाबी आणि भारताचे संबंध चांगले असल्याने खर्चाबाबत आणि महिला सबलिकरणातंर्गत या वॉकचा विचार झाल्यास ही भूमीही पादाक्रांत करण्याची संधी भारतीय महिलांना मिळू शकते. अथवा आपल्या वाळवंटातही असे अनोखे प्रयोग करून भारतीय संस्कृती जगभर नेली जाऊ शकते. यावर विचार मंथन गरजेचे असून, वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना एकत्र आणण्याची वूमन्स हेरिटेज वॉक ही वेगळी संकल्पनेचे स्वागत करायला हवे.

वाळवंटातील अनुभव..

वाळवंटातील या अनुभवाने मला आश्चर्यचकित केले आहे. प्रत्येक पाऊल टाकत पुढे जाण्यासाठी सहनशिलतेची कसोटी आणि आत्मविश्वासाची स्वतःशीच लढाई करावी लागते हे येथे लक्षात येते. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या देशातून आलेल्या महिलांना भेटण आणि त्यांचा संघर्ष समजावून घेण. जग संघर्ष करणाऱ्या लोकांवरच चालतं यावर येथे विश्वास बसतो. अविश्वसनीय स्त्रियांच्या या समुहातून मी खूप काही शिकले आहे.

- फातिमा उमर, युएई

अबू धाबी ते अल ऐन हा एक ऐतिहासिक प्रवास होता. यात सहभागी होण्याची संधी म्हणजे मला माझाच सन्मान वाटतो आहे. आपण पूर्वजांच्या पदचिन्हांवर चालतो आहोत असा अनोखा अनुभव या वॉक दरम्यान आला. ही संधी अमीरातने उपलब्द करून दिली याचा अभिमान वाटतो. महिलांकडे या वेगळ्या नजरेतूनही पाहिले जाऊ शकते. हा वॉकमागील विचार थक्क करणारा आहे.

- सेलेस्टे स्ट्रिडॉड इव्हान्स, दक्षिण आफ्रिका

वाळवंटात प्रवास करण्याचा किती अनुभव अविश्वसनीय आहे. वैयक्तिक आव्हानांची परीक्षा पाहणारा हा वॉक खूप आनंद देतो. हा वॉक पूर्ण करण्यासाठी मी माझ्या चेहऱ्यावर कायम स्मितहास्य ठेवले आणि इच्छाशक्ती कायम ठेवली! एकमेकींची काळजी घेत आणि एकमेकांना धीर देत आम्ही ध्येय पूर्ण केले. हा अनुभव कायम ह्दयात ठेवावा अन् त्यातून प्रेरणा घेत रहावी असा आहे.

- इसाबेला बाउली, फ्रेंच नागरिक

महिलांच्या हेरिटेज वॉकने निःसंशयपणे आपल्या प्रत्येकावर आणि प्रत्येकातील वेगळेपणावर वेगळ्या पद्धतीने परिणाम केला आहे, असे मला वाटते. मला एमिराती स्त्रियांना उघडण्याची आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची एक अनोखी संधी वाटते. जे आधुनिक काळातील अबूधाबीमध्ये अकल्पनीय नव्हते. त्याचबरोबर जगभरातील महिलांना त्यांच्यात सहभागी करून घेतल्याने याला एक वैश्विक रूप मिळाले आहे.

- मार्टा रॉड्रिग्झ, स्पेन

संदर्भ व टीप : वॉकसाठी अधिक जाणून घेण्यासाठी http://womensheritagewalk.com/  वॉकचे संकेतस्थळ नक्कीच पहा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकमध्येही हवं ‘मूर्तीचं वरकुटे’!

लकडी की काठी, काठी का घोडा!

काळाराम मंदिर सत्याग्रह : २ मार्च, काळाराम अन् रमेशायण!