भारतरत्न विश्वेश्वरय्यांची मुहूर्तमेढ नाशिकमधून!

१५ सप्टेंबर अभियंता दिन विशेष

भारतरत्न विश्वेश्वरय्यांची मुहूर्तमेढ नाशिकमधून!

धुळ्यातील पांझरा-दातर्ती पाटबंधारा व नाशिक शहराच्या पाणीपुरवठा योजनेला दिला आकार

Ramesh.padwal@timesgroup.com

@MTRamesh

नाशिक : द्रष्टे अभियंता म्हणून नावलौकिक मिळविलेले भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचं अन् नाशिकचं एक अतूट नातं आहे. विश्वेश्वरय्या यांच्या अभियंता क्षेत्रातील कारर्किदीची मुहूर्तमेढ १८८४ मध्ये नाशिकमधून रोवली गेली होती. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी अभियंता म्हणून त्यांची पहिलीच नेमणूक नाशिकमध्ये झाली होती. या कारर्किदीत त्यांनी वेळे आधीच धुळ्यातील प्रकल्प पूर्ण केला होता तर १९०७ मध्ये नाशिक जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता म्हणून नियुक्तीवर असताना नाशिक शहराच्या पहिल्या पाणी पुरवठा योजनेचा आराखडा त्यांनीच साकारला होता.

मुंबई इलाख्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात सहायक अभियंता म्हणून नियुक्त होताच सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांना (जन्म १५ सप्टेंबर १८६१ – मृत्यू १४ एप्रिल १९६२) इंग्रजांनी १८८४ मध्ये नाशिक जिल्ह्याचे सह अभियंता म्हणून नियुक्त केले. रूजू होताच १८८४ सालच्या पावसाळ्यात यांच्यासमोर धुळे जिल्ह्यातील पांझरा नदीतून १६ किलोमीटर अंतरावरील दातर्ती येथे पाणीपुरवठा करण्यासाठी बंधारा करण्याचे पहिले काम मिळाले. हे आव्हान पेलण्यासाठी त्यांनी जलवाहिन्या आखून वानलिका (सायफन) तत्त्वाने पाणी आणण्याचे ठरवले. त्या काळातही बांधकाम यंत्रणेत साचेबद्ध चाकोरी करणारे कर्मचारी व ठेकेदार अन् उन्मत्त झालेले ब्रिटिश अधिकारीही होते. अशा अडचणींवर मात करून त्यांनी ही योजना वेळे आधीच पूर्ण केली. त्यासाठी त्यांनी वक्रनलिका किंवा सायफन पद्धतीचा उपयोग केला होता. या पद्धतीचा उपयोग शेतीच्या सिंचनासाठी आणि शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी करणारे विश्वेश्वरय्या हे पहिलेच अभियंता ठरले. काम ठरलेल्या वेळे आधी झाल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यानेही त्यांचे हे काम पाहून कौतुक केले अन् त्यांना नियुक्तीच्या दहा महिन्यातच बढती दिली. ते पुण्यात रूजू झाले. त्यावेळी त्यांचा पगार होता ५०० रूपये. अभियंता म्हणून नाशिकमधून सुरूवात करून ते पुन्हा १९०७ मध्ये कार्यकारी अभियंता म्हणून दाखल झाले. यावेळी त्यांनी नाशिक शहराची पाणीपुरवठा योजनेचा आराखडा आखला. ‘माय वर्क मेमरिज’ या त्यांच्या पुस्तकात त्यांनी केलेल्या सगळ्या कामांचे सविस्तर वर्णन वाचायला मिळते.

सर विश्वेश्वरय्या यांनी केलेल्या कार्याचा आवाका आणि व्याप्ती प्रचंड होती. शेकडो अभियंते आणि अनेक संस्था करू शकणार नाहीत अशी उत्तुंग कामगिरी त्यांनी एकट्याने करू दाखविली. त्यामुळेच ब्रिटिश सरकारने त्यांना सर हा किताब दिला. मुंबई, कलकत्ता, काशी, पाटणा, अलाहाबाद व म्हैसूर या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डी. लिट्. देऊन गौरवले. तर पंतप्रधान पंडित नेहरूंच्या कार्यकाळात त्यांना भारतरत्नने गौरविण्यात आले. अभियंता दिनानिमित्त त्यांच्या अन् नाशिकच्या नात्याची ही ऐतिहासिक नोंद मोलाची ठरते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकमध्येही हवं ‘मूर्तीचं वरकुटे’!

लकडी की काठी, काठी का घोडा!

काळाराम मंदिर सत्याग्रह : २ मार्च, काळाराम अन् रमेशायण!