आलिजा बहाद्दूर भुलले पख्याल्याला

आलिजा बहाद्दूर भुलले पख्याल्याला                                                 
                                जिवाभावाची मैत्री : महादजी शिंदे अन् राणेखानभाई

 

इतिहासाच्या पानांमध्ये कर्तव्य, कर्तृत्व, जय-पराजय, शौर्य, सूड आणि आत्मशोधासाठी सुरू असलेल्या लढाय्यांमध्ये मैत्रीचे अनेक धागे अलगद गुंफलेले अन् एकमेकांमध्ये गुंतलेले पहायला मिळतात. एकमेकांच्या जीवावर उठलेले मैत्रीच्या धारेत एकजीव होतात. तर, मैत्रीसाठी आयुष्य वाहणारे जीव मोरपंखासारखे अलगद बहुरंगी होत इतिहास घडवताना दिसतात. असचं एक जात, धर्माच्या पलीकडच्या मैत्रीच ऐतिहासीक उदाहरण म्हणजे मराठा सरदार महादजी शिंदे आणि पाणी वाहणार्या राणेखानचं…

 

रमेश पडवळ

Ramesh.padwal@timesgroup.com

 

कुरुक्षेत्रातील अर्जुन-श्रीकृष्णाच नातं असो वा रामायणातील राम-हनुमानाचं. मैत्रीच्या या अजरामर कथा आविष्कार घडविताना दिसतात. इतिहासाच्या पानांमध्येही अशा अनेक मैत्रीचे धागे दडलेले आहेत. यातील एक आहे मराठा सरदार महादजी शिंदे आणि पखाली (पाणी वाहणारा) असलेल्या राणेखान यांच्या मैत्रीचं. मराठा सरदार व अलिजा बहाद्दूर म्हणून ओळखले जाणारे महादजी शिंदे यांचे कार्य, कर्तुत्व प्रसिद्ध आहेत. त्याचं चरित्र नाना फडणविसाच्या चरित्रासारखा ३५-४० वर्षाचा हिंदुस्थानचाच इतिहास होय. शिंदे घराण्याची पेशवाईतील कारर्किद शैर्य गाजविणारी राहिली. त्यामुळे युद्धशास्त्र महादजींच्या रक्तातच होतं. नानासाहेब पेशव्यांच्या संगतीने मुत्सद्दीपणांतही महादजी तरबेज झाले. महादजीनें प्रथम तळेगांव-उंबरीच्या निजामावरील लढाईंत शौर्य गाजवून नांव मिळविलें. यानंतर औरंगाबाद (१७५१), साखरखेडलें (१७५६), पंजाब (१७५९) वगैरे मोहिमांतही होते.  पानिपतवर भाऊसाहेबांबरोबर महादजी दक्षिणेंतून गेले होते. पानिपतची तिसरी लढाई मराठे व अहमदशहा अब्दाली यांच्यात जानेवारी १७६१ मध्ये झाली. लढाईत मराठ्यांचा पराभव झाला. पानिपतांत शेवटच्या दिवशी जेव्हा उरलेले लोक पळाले, तेव्हा महादजीही परत फिरले. वाटेत त्यांना लुटण्यासाठी अब्दालीच्या पाच पठाणांनी घेरले. महादजींनी त्यांच्याशी दोन हात करीत चारजणांना यमसदनी पोहचविले; मात्र पाचव्या पठाणाने त्याला डाव्या पा यावर गंभीर जखम केली. त्याही अवस्थेत ते लढले अन् बेशुद्ध होऊन पडले. एक तरुण जबर जखमी होऊ पडल्याचे पेशव्याच्या सैन्यातील राणेखान नावाचा भिस्ताने (घोड्यांना पाणी घालणारा पखाली) महादजींना पाहिले. सगळीकडे पळापळ सुरू होती. कोण आपला कोण शत्रूचा हे लक्षात येत नव्हते. पण, राणेखानाची नजर त्या तरुणावर एकवटली. मरून पडलेल्या पाच पठाणांमध्ये जखमी होऊन पडलेल्या त्या तरुणाला तेथेच सोडून स्वत:चा जीव वाचविणं सोप होतं. पण, हे पठाण असलेल्या राणेखानाला काही बरं वाटलं नाही. मराठा पानिपतात पठाण आणि रोहिल्याविरूद्ध हरलं होते. राणेखानही पठाणच होता; मात्र पेशव्याच्या सेवेत. पण, येथे ते कोण आपण कोण हा संघर्ष नव्हता. संघर्ष होता तो आत्मशोधाचा आपल्या स्वामींच्या निष्ठेचा. रोहिले आणि पठाणांनी तुकोजी शिंदे, विश्वासरावसह अनेक मराठे मारले. पानिपतच्या रणभूमीत दिसेल त्याची कत्तल सुरू होती. अशाही अवस्थेत राणेखानानं स्वत:च्या जीवापेक्षा त्या तरुणाच्या जीवाला येथे महत्त्व दिले ते निष्ठा राखूनच. कापलेल्या पठाणांच्या रक्ताच्या पुरात माखलेल्या अन् पायावरील जखमेनं जेरबंद झालेल्या त्या तरुणाजवळ जेव्हा राणेखान गेला तेव्हा त्याचा चेहरा अचानक उजळला. अरे… हे तर मराठ्यांचे सरदार महादजी शिंदे. तरुण, तडफदार पण, पानिपत युद्धाच्या पराजयाची गडद दु:ख त्याला महादजी शिंदेच्या चेहऱ्यावर दिसत होतं. हा दिवाही मालवेल, अशी अवस्था होती. पण, मराठेशाहीला जिवंत ठेवायचं असेल तर त्याचा प्रत्येक लढवय्या सैनिक वाचला पाहिजे, नाहीतर पुढील इतिहास कोण लिहिणार, असा सवाल राणेखानाच्या मनात उभा ठाकला असणार. ‘शीर सलामत तो पगडी पच्चास’ म्हणतं राणेखानाने महादजींना उचललं आणि आपल्या घोड्यावर घेत जवळच्या खेड्यात आश्रय घेतला अन् तेथील एका हकीमाच्या घरी महादजींना घेऊन आला. हकीमानं औषधोपचार करून त्यांची जखम बांधली. राणेखानात त्याची सुश्रुषा करण्याची जबाबदारी घेत महिनाभर सेवा केली. जखम भरली पण, महादजींच्या पायावरील त्या जखमेनं त्यांना अपंगत्व दिलं. हा त्यांचा लंगडा पाय त्यांना दोन गोष्टींची आठवण करून देत होता. एक म्हणजे पानिपतचा पराजय आणि राणेखानाची मैत्रिपूर्ण सेवा.

कर्तव्य आणि निष्ठेबद्दलची आठवण करून देणारी जखम महादजींनी कायम ह्दयाशी ठेवली. महादजींनी राणेखानच्या धाडसाचे कौतुक पेशवे दरबारात केलं. त्या उपकारांची परतफेड म्हणून राणेखानाला पैसा, जडजवाहिर, हत्ती, घोडे व नाशिक जिल्ह्यातील निमगाव, देवपूर आणि जामगाव पास्ते या गावांची जहागिरी दिली. आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि समृद्ध असणाऱ्या महादजींना राणेखानाला संपत्ती देणं सहज शक्य होतं ती त्यांनी त्याला दिलीही. मात्र राणेखानाच्या निष्ठेचं फक्त संपत्ती हे फळ नव्हतं हे महादजींनी जाणलं होतं. राणेखानातील धाडस, समयसचूकता आणि दूरदृष्टीकोन हे गुण महादजींनी हेरले होते. याची जाणीव ठेऊन महादजींनी राणेखानाला आपला उजवा हाताची जागा देत सेनापती केलं. फक्त सेनापतीच नव्हे; तर ‘भार्इ’ हा मैत्रीच्या बंधातील एक अजोड रत्नही राणेखानाच्या आणि महादजींच्या शिरपेचात रोवला. तेव्हापासून घोड्यांना पाणी पाजणारा पखाली झाला सेनापती राणेखानभार्इ! ही त्यांच्या मैत्रीची सुरूवात होती. महादजी शिंदे आणि भार्इ हे एक समीकरण महादजींनी लढलेल्या प्रत्येक लढार्इत खणखणीत नाणं ठरलं. दिल्ली दूर नही, हेच ही दोस्ती सांगून गेली अन् पानिपताचा वचपा त्यांच्या मैत्रींतील मुत्सद्देगिरीने काढला.

पानिपतचा धडा शिकवणारा अनुभव मराठ्यांच्या गाठीला होता. आता प्रश्न होता तो आपल्याच लोकांशी दोन हात करावे लागण्याच्या संकंटाचा. मात्र ही संकटे कधी हटणार नाहीत हे गृहित धरून महादजी शिंदेंनी आपली मराठा साम्राज्यातील घोडदौड सुरूच ठेवली. १७६१ ते १७७३ हा काळ महादजी शिंदेंना अनुभव संपन्न करणारा ठरला. तर याच काळात राणेखानभार्इ आणि त्यांच्या मैत्रीतील पैलू अधिक लढायातील घडामोडीसारखे उलगडले गेले. कारण याच मैत्रीच्या विश्वासावर महादजी शिंदेंनी उत्तर हिदुंस्थानावरील राज्यकारभारावर १७७४ ते १७८९ या काळात आपले एकतंत्री वर्चस्व निर्माण केलं. एवढचं नव्हे; तर बादशाही राज्यकारभार आपल्याहाती घेतल्यानंतर महादजी शिंदे यांचे पेशवार्इतील वजन अधिकच वाढले. मात्र हे वजन वाढण्यामागे त्यांचा संघर्ष राणेखानाने मित्र होऊन जवळून पाहिला होता. महादजींना सरदारकी मिळविण्यासाठी १७६१ ते १७६९ इतका दीर्घ कालावधीत आपल्याच मंडळींशी मोठा संघर्ष केला. हा संघर्ष सुरू झाला तो राघोबादादांनी महादजींना सरदारकी देण्याच्या विरोधापासून. मात्र पेशवार्इ माधवरावांकडे आल्यावर सरदारकीचा मार्गही मोकळा झाला. मात्र माधवरावांच्या मृत्यूनंतर नाराणराव पेशवेपदावर आल्यावर मराठ्याचे बळ कमी झाले. या काळात शिंदेंचा प्रदेश व होळकरांचा प्रदेशच मराठा साम्राज्य म्हणून ओळखली जाऊ लागली. दरम्यान नारायणरावांचा खून, त्यानंतरचे बारभार्इ प्रकरण, राघोबादादाचे उत्तरेत पलायन या घटनांनंतर १७७९ पासून महादीजीचा प्रत्यक्ष पेशव्यांच्या बरोबर संबंध न येता पेशव्यांचा कारभारी नाना फडणवीस यांच्या बरोबर जास्त संबंध येऊ लागला. त्यामुळे यापुढील काळात नाना व महादजी यांच्यात स्नेह आणि संघर्ष पहायला मिळतो. महादजींनी राणेखानाच्या जोरावर पहिले इंग्रज मराठा युद्ध जिंकले. पुरंदरचा तह, सालबार्इचा तहात महादजींची भूमिका महत्त्वची ठरली आणि महादजींचे वाढणारे वर्चस्व नाना फडणवीसांच्या डोळ्यात सलले. मात्र, दक्षिणे अडकलेल्या नानांना उत्तरेत जायची संधी मिळत नव्हती. मात्र, महादजींना खाली ओढण्याची संधी नाना सोडत नव्हते. इंग्रजांचा बिमोड करण्यासाठी महादजींना बंगालची स्वारी करायची होती मात्र, नाना मदतीस तयार नव्हते. या दरम्यान, इंग्रजांनी महादजींशी समेट करून सख्य निर्माण केले. याचाही राग नानाला सतावू लागला. महादजीनें बादशहाकडनू पेशव्यांस वकील-इ-मुतलकचें पद व स्वतःस त्या पदाची नायबगिरी मिळवून, साऱ्या बादशाहींत गो वधाची मनाई करून घेतली. बादशहास दरमहा ६५ हजारांची नेमणूक करून देऊन महादजीनें सारी बादशाही (१७८५) आपल्या हातांत ठेवली. यानंतर काही काळ उत्तरेत फक्त डंका होता तो मराठ्यांचाच म्हणजे महादजींचा. हेही नानांना बोचले.

होळकर प्रकरण, अनुपगीर गोसावी प्रकरणामुळे नाना व महादजींमधील दरी अधिकच वाढली. दरम्यान, रजपूत, जाठ, रोहिल्यांना महादजींचा सरदार राणेखानभार्इ धडे शिकवित होता. २८ जुलै १७८७ रोजी लालसोटची लढाई घडून आली. या संग्रामाचे वृत्त महादजीने नाना फडणीसास लिहून कळवले. यात महादजी म्हणतात, “राणेखानभाईचे तोंडावर प्रतापसिंग व हमदानी होता, त्यांसीं आडवी मार देऊन त्यांची मदत करू दिली नाही. हमदानी गोल बांधून उठावणी करण्याच्या विचारात होता. इतक्यांत इकडील तोफांनी मारगिरी दिल्ही, त्यांत हमदानी गोळा लागून ठार झाला. डावे बाजूस राठोड व कच्छवे यांचे तोंड ठेचले. राणेखान भाई उभे होते त्यांजवर दोनतीन तोफा थोरल्या जयपूरकरांनी लागू केल्या. गोळे बहुत आले. शेपन्नास घोडी, माणसे जखमी व ठार जाली, परंतु भाई ठिकाणावरून हालले नाहीत. तोफेच्या गोळ्याने त्यांच्या तलवारेच्या कबजाची वाटी उडाली, तोच गोळा मोतद्दारास लागला, पण भाई ठिकाणावरून हालले नाहीत. ईश्वरे त्यांस कुशल केले. प्रातःकाळचे प्रहर दिवसापासून दोन घटका रात्रपावेतो परस्पर तोफा चालल्या. रांगडे मोडून घातले. हमदानी मेला. (संदर्भ ग्रंथ : मराठी रियासत खंड ७ ) या प्रसंगावरून महादजींनी आपल्या मित्र राणेखानाचे पेशव्यांकडे केलेले कौतुक आणि त्यांच्यावरील विश्वास स्पष्ट होतो.

लासोट्याच्या लढाईत राठोडांचा व जयपूरवाल्यांचा हजार सैन्यांचा मुडदा रणांगणात राहिला. शिवाय २ हजार रजपूत जखमी झाले. यानंतर तिसरे दिवशी ३० जुलै १७८७ रोजी महादजीकडील मोगली पलटणीनी दंगा केला. हा दंगा म्हणजे पानिपतची आठवण करून देणारा होता. महादजींनी शिवाजीपंत विंचुरकरांना बोलावून घेत येथून बाहेर पडलो नाही तर पुन्हा आपले पानिपत होईल, असे सांगत १ ऑगस्ट १७८७ मध्ये फौजांना माघारी फिरवून डीगेस (राजस्थानातील एक प्रांत) पोहचले. यावेळीही राणेखानाने आपल्या मित्राला म्हणजेच सरदार महादजींना आश्वस्त केले. तो प्रसंग इतिहासात असा नोंदला गेला आहे की,‘पाठीमागून भाई (राणेखानभाई) आले, त्यांनी बावांस (महादजींना) बिदा केले आणि सांगितले यांसी बोलून पाहतो. आले तर उत्तम, नाही तर दोनही पलटणे कापून काढून तोफा आपल्या घेऊन येतो, आपण पुढे जावे. नंतर भाईंनी पलटणांस सख्त रीतीने बोलून लष्करांत घेऊन आले.’ यावरून दंगा करणाऱ्या पलटणांनाही राणेखानाने कौशल्याने हाताळल्याचे अन् महादजींना तेथून सुरक्षित हलविल्याचे दिसते.

माळवा-मेवाडातून मराठे परतल्याचे पाहुन राजपुतांनी मराठ्यांची ठाणी बळकावून उपद्रव सुरू केला. दुसरीकडे नजीबखान रोहिल्याचा नातू गुलाम कादर याने मराठ्यांच्या ताब्यातील अंतरवेदीवर अंमल मिळविला. त्याने बादशहाच्या कारभार्याला फितूर करून बादशाही ताब्यात घेण्याचा घाट घातला. उत्तरेतील मराठ्यांच्या साम्राज्यावर आलेले संकट निवारणासाठी महादजींनी नाना फडणवीस यांच्याकडे मदत मागितली. नानांनी मदत देऊ केली. ८ सप्टेंबर १७८७ रोजी तुकोजी होळकर व अलिबहाद्दर महादजींच्या मदतीसाठी दिल्लीकडे निघाले. मात्र ते पोहचले एक वर्षांनी. दरम्यान, बादशहाने नोव्हेंबर १७८७ मध्ये दिल्लीतून पलायन केले. इंग्रज व शीख यांनी मराठ्यांच्या या स्थितीचा फायदा घेण्याची तयारी सुरू केली होती. जयपूर, जोधपूरचे राजपूत व मोगलही मराठ्यांविरूद्ध एकत्र झाले. उत्तरेत मराठ्यांची परिस्थिती बिकट झाली होती. भरतपुरला जाटांनी मराठ्यांच्या मदतीला दहा हजार सैन्य पाठविले. पुढे गुलाम कादर व इस्मार्इल बेग यांच्याशी २१ एप्रिल १७८८ रोजी किरोलीत लढार्इ झाली. या लढार्इत दोन्हीकडील बरीच हानी झाली. अखेर मराठा व जाट भरतपुरला गेले. खुणशी कादर येथेही पोहचला व लढला. मात्र त्याने भरतपुर सोडून कुंभेरीचा किल्ला ताब्यात घेतला व डिगेत येऊन पुन्हा मराठ्यांना भिडला. तेथे मराठ्याच्या तीव्र विरोधामुळे कादर तेथून पळाला व आग्र्याला पोहचला. कादरने २९ जुलै १८८८ दिल्ली काबिज करीत नवीन बादशहा बसविला. दरम्यान महादजीने पुण्यात पत्रव्यवहार करून मदतीसाठी बरीच याचना केली मात्र प्रतिसाद मिळाला नाही. यावेळी एकदां तर महादजीनें नानांच्या मत्सरानें आम्ही ‘‘आणखी छायेस पोट भरूं’’ असे त्यांना कळविले असतां त्यानीं त्यांचे समाधान करून लिहिले की, ‘‘ज्यांच्या घराण्याचे एकनिष्ठेचे बाणे चालत आले त्यांच्या चित्तांत हीं अक्षरे येणारच नाहींत... रती इतकी दरज (फट) असतां शत्रूस बळ येतें.’’ मात्र तोपर्यंत महादजीने राणेखानाच्या बळावर जून-जुलै १७८८ पर्यंत माळव्यातील आणि राजस्थानातील परिस्थिती बरीच आटोक्यात आणली. पुन्हा ठिकठिकाणी मराठ्यांचे अधिकारी वसुलीची आणि बंदोबस्ताची कामे करू लागले. मात्र, दिल्ली अजूनही कादरकडे होती.

गुलाम कादरने दिल्ली मिळविल्यावर अत्याचाराचे सत्र सुरू केले. अगदी जनानखाण्यापर्यंत त्याचे अत्याचार पोहचल्याने आता कादरचा बंदोबस्त करावाच लागणार हे महादजींनी ओळखलं होतं. दरम्यान, महादजीनें आपली कवायती फौज पुष्कळच वाढविली; त्यांत मराठ्यापेक्षां मुसुलमान, रजपूत यूरोपियन यांचाच भरणा जास्त केला. त्यानें आग्र्याच्या किल्ल्यांत यूरोपीय हत्त्यारासारखी हत्यारें तयार करण्याचे कारखाने काढले अन् सैन्य राणेखानाच्या नैतृत्वाखाली मजबूत केले. कादरला संपविण्याची विशेष कामगिरी पारपाडण्यासाठी महादजींनी निवड केली ती आपला मित्र राणेखानभाईची. राणेखान फौजेसह येतोय हे ऐकूनच घाबरलेल्या गुलाम कादरने दिल्लीतून पलायन करीत मिरज किल्ल्याचा आश्रय घेतला. त्याने किल्ल्यातून मराठ्यांशी दोन महिने झुंज दिली. राणेखानानं त्याची किल्ल्यात जाणारी सगळी मदत तोडल्यावर कादरला किल्ल्याबाहेर येण्याशिवाय पर्याय उरला नाही. अखेर १७ डिसेंबर १७८८ रोजी कादर मराठ्यांशी लढण्यासाठी किल्ल्याबाहेर आला. मात्र, त्याने मराठ्याचे अन् खास करून राणेखानभाई पठाणकडून होत असलेली कापाकापी पाहून पारच भेदरला आणि त्याने तेथूनही पळ काढला. कादरला मोकळे सोडून उपयोग नव्हता. म्हणून राणेखानाने त्याचा पाठलाग करून त्याला १९ डिसेंबरला जिवंत पकडला आणि महादजींच्या ताब्यात दिला. महादजीनी त्याला कैदेत ठेवले आणि अखेर ३ मार्च १७८९ रोजी ठार केले. कादरसारखा शत्रू मारला गेल्याने मराठे आश्वस्त झाले आणि महादजींनी बादशहा शहा अलम यांना पुन्हा दिल्लीच्या गादीवर बसविले. आता मथुरा, वृंदावन हे मराठ्यांचे बालेकिल्ले पुन्हा ताब्यात आले होते. महादजीने इच्छेप्रमाणे बादशहाने पुन्हा आपल्या मुलुखात गो वधबंदीचे फर्मान काढले. हा विजय महादजी आणि राणेखानाच्या मैत्रीचा होता. नाना फडणवीसांनी पाठवलेली मदत अखेर एप्रिल १७८९ मध्ये एक वर्षानंतर पोहचली. तोपर्यंत महादजींनी राणेखानाच्या जोरावर उत्तरेत पुन्हा आपले बस्तान मजबुत केले होते. हे कळताच नाना फडणवीसांची अधिकच चलबिचल झाली. कादरला ठार केल्यानंतर तर पेशवाईत महादजींचा डंखा वाजला अन् नाना फडणवीसांची अशी अवस्था झाली की, त्यांना थेट महादजींशी बोलताही येईना. अनेकदा नाना फडणवीसांना महादजीशी बोलण्यासाठी राणेखानाशी आधी बोलावे लागे व एखादी गोष्ट गळी उतरवावी लागे. यावरून महादजी व राणेखानभाईची मैत्री आणि विश्वास येथे स्पष्ट होतो.  

कादर संपला तरी मराठ्यांना इस्माईल बेग व रजपुतांचा त्रास अजूनही कायम होता. संकट हटले नव्हते. महादजींनी आपल्या मित्र राणेखानभाईच्या खांद्यांवर आणखी एक जबाबदारी दिली ती म्हणजे रजपुतांच्या पाडावाची. रजपुतांचा कायमचा निकाल लावण्यासाठी महादजीची स्वारी २८ ऑगस्ट १७९० मध्ये रोजी जयपूर व मारवाडकडे निघाली. राठोड मराठ्यांना भिडले पण, कादरचा पाडाव करणाऱ्या मराठ्यांशी लढताना राठोड कमी पडले अन् हरले. राणेखानाच्या नैतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले. उत्तरेतील लढायांचा आणि कामगिरीचा प्रत्येक क्षण महादजी व राणेखानाने जिगरबाजपणे लढला. महादजींचा राणेखानावरील विश्वासच या लढाया लढत होता, अशी स्थिती निर्माण झाली. पण, दुसरीकडे नाना फडणवीसांच्या कुरापती सुरूच होत्या. अलिबहाद्दर प्रकरणाचा फटकाही नानांकरवी मराठा साम्राज्याला बसला. त्यातच तुकोजी होळकर आणि महादजी असा तंटा लावून देण्यास नाना यशस्वी झाले अन् उत्तरेतील मराठेशाही अंताकडे जाऊ लागली. मात्र, या परिस्थितीतही चितोड काबीज करण्याची तयारी महादजींनी केली. उदेपूरच्या मुलुखात होळकरांनी आपला अंमल बसविला तर चितोडचा मुलुख १७ नोव्हेंबर १८९१ रोजी ताब्यात आला.

चितोड आला पण, महादजींचा परम सहाय्यक व निकट दोस्त राणेखानभाई चितोडगडाजवळ मुक्काम असतानाच २२ डिसेंबर १७९१ रोजी मृत्यू झाला. या धक्क्याने महादजी घायाळ झाले. जिगरी दोस्त गमावल्याचे दु:ख मोठे होते. राणेखानाचा मुलगा हसनखानने वडिलांसोबत खांद्याला खांदा लावून अनेक लढाया लढल्या होत्या. त्याचा हा अनुभव आणि राणेखानाचा मुलगा म्हणून महादजींना पुन्हा एक पठाण साथी मिळाला.  राणेखानभाईचा मृत्यू चितोडला झाला असला तरी त्यांची कबर नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील देवपूरमध्ये बांधण्यात आली. ‘बडाबाग’ ही शाही कब्रस्तान ही समाधी मुस्लिम स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असून, राणेखानाच्या मृत्यूनंतर महादजींनी आपल्या मित्राची कबर वैशिष्ट्यपूर्ण असावी यासाठी नक्कीच विशेष प्रयत्न केले असणार, असे या कबरीचा बाज सांगतो. राणेखानाची कबर पाहताना महादजी व राणेखानाच्या दोस्तीबद्दल बोलल्याशिवाय देवपूरचा इतिहासच पूर्ण होत नाही. तसाच या दोघांच्या मैत्रीची आठवण काढल्याशिवाय मराठ्यांचा इतिहासही कधी पूर्ण होणार नाही.

उत्तरहिंदुस्थान आपल्या काबूत आणल्यावर महादजी बारा वर्षांनीं पुण्यास आले (१७९२ जून). यावेळी नानांच्या मुत्सद्दीपणानें व महादजीच्या शौर्यानें सतलजपासून तुंगभद्रेपर्यंत मराठी साम्राज्य पसरून साऱ्या हिंदुस्थानभर त्याचा दरारा बसला होता. पण, महादजींच्या मनात राणेखान गमावल्यची हूरहूर कायम होती. पुण्यास आल्यावर १२ फेब्रुवारी १७९४ मध्ये म्हणजेच राणेखानाच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी एकाएकीं नवज्वर होऊन पुण्याजवळील वानवडी येथें वयाच्या ६७ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. महादजींची समाधी (छत्री) पुण्यातील वानवडी येथे आहे. नाशिकच्या देवपूरात राणेखान विसावला तर महादजी पुण्यातील वानवडीत. दोघांच्या समाधी आजही त्यांच्या शौर्याच्या कथा सांगताना दिसते. फक्त राणेखानाची समाधी आजही धर्माने निर्माण केलेल्या तेढीच्या धर्मसंकटात दुर्लक्षीत झालेली दिसते. धर्मापलीकडे जाऊन कोणीतरी आमची मैत्री पहा, अशी आर्त हे दोघेही मित्र देताना दिसते.  

००००००००००००००००००००००००००००००

संदर्भ

अलिया बहाद्दूर महादजी शिंदे  : लेखक कृष्णकांत नार्इक

महाराष्ट्राचा इतिहास : मराठा कालखंड (भाग २) : डॉ. वि. गो. खोबरेकर

महाराष्ट्रीय ज्ञानकोश : डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर

मराठी रियासत खंड - ७ :- गो. स. सरदेसाई   

नाना-महादजी : कुंदन तांबे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकमध्येही हवं ‘मूर्तीचं वरकुटे’!

लकडी की काठी, काठी का घोडा!

काळाराम मंदिर सत्याग्रह : २ मार्च, काळाराम अन् रमेशायण!