राज्य संग्रहालयातून मांडणार वैभवशाली ‘महा’संस्कृती

राज्य संग्रहालयातून मांडणार वैभवशाली ‘महा’संस्कृती

ramesh.padwal@timesgroup.com
MTrameshpadwal / 8380098107
नाशिक : देशभरात पाचशेहून अधिक संग्रहालये आहेत. यात गोवा, आसाम, गुवाहाटी, बिहारसारख्या राज्यांची संस्कृती दाखविणारी राज्य संग्रहालये आतापर्यंत दिमाखात उभी राहिली आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या स्थापनेला साठ वर्षे उलटूनही राज्याचे स्वतंत्र असे राज्य संग्रहालय नव्हते. आता मात्र राज्याचे स्वत:चे संग्रहालय मुंबईत उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबतचा प्रस्ताव सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सादर केला आहे. महाराष्ट्राच्या ‘महा’संस्कृतीची मांडणी करतानाच, राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या शक्तिस्थळांसह अश्मयुगापासून ते आधुनिक महाराष्ट्राचा प्रवास शिल्पांसह दृकश्राव्य माध्यमातून मांडला जाणार आहे.

पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, इतिहास-संस्कृतीबरोबर समाजकारण, राजकारण, कलासंस्कृती समजून घेण्यासाठी संग्रहालये मार्गदर्शक ठरतात. त्यामुळेच महाराष्ट्रात विविध विषयांवरील दोनशेहून अधिक शासकीय तसेच खासगी संग्रहालये आहेत. मुंबर्इतील छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय (प्रिन्स ऑफ वेल्स) हे खासगी संग्रहालय आहे. परंतु त्याच्या काही मर्यादा आहेत. महाराष्ट्रात संग्रहालय संस्कृती बहरली आणि राज्य यात अग्रस्थानी असला तरी या सर्व विषयांची एकत्रित मांडणी करणारे राज्य संग्रहालय महाराष्ट्रात नाही. त्यामुळे मुंबर्इत राज्य संग्रहालय उभारण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, संग्रहालय कसे असावे, कुठे करावे यावर सांस्कृतिक मंत्री देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे प्रस्ताव सादर केला आहे. महाराष्ट्राचे वैभव दाखविणाऱ्या संग्रहालयाचा आराखडा तयार करण्यासाठी एक कोटी निधीची आवश्यकता असल्याचेही प्रस्तावात नमूद केले आहे.

महाराष्ट्राच्या महासंस्कृतीचे दर्शन घडविणारे तसेच, आधुनिक महाराष्ट्राचा संपूर्ण इतिहास दर्शवणारे राज्य संग्रहालय उभारण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही देशमुख यांनी म्हटले आहे. संग्रहालयासाठी किमान ८-१० एकर जागेची गरज आहे. या प्रस्तावावर लवकरच निर्णय होणार आहे. मुंबर्इत खार अथवा गोरेगाव फिल्म सिटीतील जमिनीवर हे संग्रहालय साकारल्यास पर्यटकांना मुंबर्इतच महाराष्ट्र दर्शनाचा अनुभव घेता येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यास किमान ५ ते ८ वर्षे लागतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.    

असे असणार राज्य संग्रहालय...
- अश्मयुगापासून ते आधुनिक काळापर्यंतचा महाराष्ट्राचा प्रवास उभा करणार
- महाराष्ट्राची इतिहास, वारसा, धर्म, परंपरा, संस्कृती थ्रीडी रूपात मांडणार
- दृकश्राव्य, त्रिमितिचित्रात्मक प्रतिकृती, वैकल्पिक, आभास माध्यमे वापरणार
- राज्याची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक चळवळी प्रतिबिंबित करणार
- कला, सांस्कृतिक चळवळ, चित्रपट, नाट्य, नृत्य वैभव उभारणार
- महाराष्ट्राच्या स्थापनेपासून उद्योग चळवळींपर्यंत प्रवास साकारणार
- राज्यातील ३६ जिल्ह्यांच्या वारसास्थळांनाही मिळणार स्थान

शिक्षण, खाद्यसंस्कृतीचा अनुभव
संग्रहालय म्हटलं की, फक्त तेथे ठेवलेल्या वस्तू पाहणे. मात्र, राज्य संग्रहालयात शिक्षणासह खाद्य संस्कृतीचा आनंद उपभोगता येणार आहे. पर्यटनासाठी आलेल्या व्यक्तीला राज्यातील भाषा, संस्कृती जाणून घेता यावी, भाषांचे ज्ञान घेता यावे, उत्खनन, पारंपारिक खेळ, वेशभूषा, अलंकार यांचे शिक्षण देणारे तसेच आपली कला सादर करता यावी यासाठी कार्यशाळा, विशेष वर्ग व दालनांची निर्मिती केली जाणार आहे. एवढेच नव्हे तर राज्यातील खाद्य संस्कृतीचा आढावा घेणारे, ही खाद्य पदार्थ कशी बनविली जातात याच्या प्रत्यक्ष कार्यशाळाही या दालनातून घेतल्या जाणार आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या खास पदार्थाचांचा आस्वाद घडविणारे उपहारगृह येथे साकारण्याबाबत प्रस्तावात उल्लेख आहे. यामुळे संग्रहालयात पर्यटकांच्या सहभागही अनुभवायला मिळणार आहे.

मादाम तुसाँ अवतरणार मुंबर्इत!
मादाम तुसाँ म्हटलं की, महान व लाडक्या व्यक्तींचे मेणाचे पुतळे डोळ्यासमोर उभे राहतात. याच धर्तीवर राज्य संग्रहालयात स्वतंत्र दालन उभारले जाणार असून, महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची कामगिरी केलेल्या ऐतिहासिक, राजकीय, उद्योग, कला, क्रीडा, शैक्षणिक आदी क्षेत्रातील व्यक्तींचे मेणाचे पुतळे उभारले जाणार आहेत. हे या संग्रहालयाचे वेगळेपण ठरू शकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकमध्येही हवं ‘मूर्तीचं वरकुटे’!

लकडी की काठी, काठी का घोडा!

काळाराम मंदिर सत्याग्रह : २ मार्च, काळाराम अन् रमेशायण!