ज्ञानाच्या उपासनेसाठी : बोधसूत्र

ज्ञानाच्या उपासनेसाठी : बोधसूत्र

ब्लॉग लिहिणं सोपं नाही. नवनवीन विषय घेऊन नव्या युगातील वाचकांना वाचनाची गोडी लावणं अधिक आव्हानात्मक होत आहे. त्यात महिला ब्लॉगरची संख्या पुरूष ब्लॉगरच्या तुलनेत कमी असली तरी विषयांतील वैविध्य मात्र महिलांनी जाणीवपूर्वक जपलं आहे. अगदी फॅशनपासून लाइफस्टाइलपर्यंत, ट्रॅव्हलिंगपासून फूडपर्यंतच्या विषयांना त्यांनी न्याय दिला आहे. या नव्याने ब्लॉगर म्हणून ओळख कमावलेल्या पुण्यातील धनलक्ष्मी टिळे यांनी जिज्ञासेतून भारतीय संस्कृती, इतिहास, पुरातत्त्व क्षेत्रातील वेगवेगळ्या पैलूंवर बोधसूत्रातून टाकलेला प्रकाश एक वेगळा प्रयत्न ठरतो आहे.

रमेश पडवळ
धनलक्ष्मी टिळे! वय ३२. त्या गेल्या सात वर्षांपासून पुण्यात ‘बालकला’ या कला प्रशिक्षण संस्थेअंतर्गत लहान मुलांना चित्रकला हा विषय शिकवतात. कला आणि नाट्यसृष्टीचे बाळकडू त्यांना घरातूनच म्हणजे बाबा सिनेअभिनेते प्रकाश इनामदार आणि आई जयमाला इनामदार यांच्याकडून मिळाले. त्यांनी काही वर्षं रंगभूमीत काम केलं. लहान बाळाची नाळ जशी त्याच्या आईशी जोडलेली असते, तशीच ती आपल्याला जन्मापूर्वीपासून मिळणाऱ्या संस्काराशी कायमची जोडलेली असते. संवेदना, जाणीवा, नवनिर्मिती, जिज्ञासा हा त्या संस्काराचा पाया असतो. याच अतूट नाळेनं त्यांना भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंकडे आकर्षित केलं. आपण कसं पुढे जावं, हे आपल्याला भेटणारा प्रत्येक माणूस सांगत असतो, शिकवित असतो. मात्र, आपली संस्कृती हे करताना आपण काय जपलं, वाढविलं पाहिजे, हे सांगत असते. भारतीयांना हजारो वर्षांच्या संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. या संस्कृतीचे जतन, संवर्धन करणे केवळ आपल्यासाठीच गरजेचे आहे, असे नाही तर आपल्या भावी पिढीला योग्य दिशा देण्यासाठीही महत्त्वाचे आहे, असं वाटू लागलं अन् यातूनच जन्म झाला बोधसूत्र या ब्लॉगचा, असे त्या सांगतात.
संस्कृती समजून घ्यायची असेल तर दीर्घ अभ्यास गरजेचा असतो. त्यामुळे आता अनेक मंडळी या विषयाकडे वळत नाहीत. नव्या पिढीचा दृष्टीकोन बदलतो आहे. मात्र, त्यामुळे आपल्या संस्कृतीचे पैलू उलगडून सांगणारे फारशे दिसत नाहीत. धावपळीच्या जीवनात पुस्तकातून हे ज्ञान घेण्याची परंपराही मागे पडत आहे आणि हे संस्कार देणारी वैदशाळा, शिक्षण परंपरा आणि लोककला लोप पावत आहेत. मात्र याचा अर्थ संस्कृती विसरायची का? तर आपल्या संस्कृतीचे रूप नव्याने नव्या माध्यमातून समोर आणण्याचे ध्येय समोर ठेऊन धनलक्ष्मी टिळे यांनी बोधसूत्रातून भारतीय संस्कृतीच्या वेगवेगळ्या पैलूंची मांडणी करण्याचा अनोखा प्रयत्न सुरू केला आहे.
याबाबत धनलक्ष्मी टिळे सांगतात, ‘भारतीय संस्कृती, धर्म, इतिहास, पुरातत्त्व, वारसा क्षेत्रातील वेगवेगळ्या पैलूंवर बोधसूत्रातून मांडणी जानेवारी २०१७ पासूनच सुरू झाली. मला ज्या गोष्टींचा ज्ञान अथवा बोध होतोय, ते शब्द सूत्ररूपात गुंफून लोकांपर्यंत घेऊन जाणे म्हणजे बोधसूत्र. तसेच, भारतीय संस्कृतीच्या चिकित्सक शोधाला मी बोधसूत्र म्हणते. बोधसूत्र हे आपल्या भारतीय संस्कृतीचे वेगवेगळे पैलू उलगडत आहेत. ‘आपली संस्कृती’, ‘असाही एक इतिहास’, ‘प्राचीन भारतातीय चित्रकले प्रवास,’ अशा लेखांसह ‘अद्भुत रस’ या मालिकेतील अर्धनारीश्वर: नवरस आणि देवी शिल्पे उलगडत त्यांनी आपला ब्लॉग वेगळ्या वळणावर आणला आहे. लिखानाची ओघवती शैली आपल्याला आतापर्यंत रहस्यमय वाटत असलेल्या विषय सुटसुटीत करून सांगते. स्थापत्यसूत्र या लेख मालेत त्या श्रीक्षेत्र औंढा नागनाथ व मुंबईचा वारसा असलेल्या व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको या स्थळांचे वर्णन सोप्या शब्दांत उलगडतात, तर अभिलेखसूत्रात कऱ्हाडकन्या, परमवैष्णवी श्रीमत त्रिभुवनमहादेवी, काव्यसूत्रातील आषाढस्य प्रथमदिवसे, शिवाय नम:, देवीसूत्रातील नवरस आणि देवी शिल्पांवरील विविध लेख, पर्यटन, लोकसूत्र, वारसा, शिल्पसूत्र, शिवसूत्र अशा वेगवेगळ्या विषयांवरील लेखमालिका बोधसूत्रातून वाचायला मिळते. ब्लॉगनंतर त्यांनी आता बोधसूत्र वेबसाइट रूपातही आणली आहे. लेखापुरतेच मर्यादित न राहता, ऑडिओ व व्हिडीओची साथही बोधसूत्रला देण्याचा त्यांचा मानस आहे.
भारतीय संस्कृतीचा परिचय म्हणजे खरंतर आपण स्वतःला स्वतःच्या अस्तित्वाचा परिचय आपण करून देत असतो, असे त्या मानतात. आपल्या संस्कृतीचं रहस्य बोधसूत्रातून उलगडत रहावं, हीच धडपड धनलक्ष्मी टिळे यांना सतत लिहायला प्रवृत्त करते. म्हणूनच त्या दगदगीच्या काळातही वाचक भारतीय संस्कृतीच्या विषयात मोबाइल या खिडकीतून डोकावेल, याकडेही आवर्जून लक्ष देतात. ब्लॉगिंगतून वेबसाइटपर्यंत भारतीय संस्कृतीच्या विचारधारेला सतत पुढे घेऊन जाण्याची अन् वेगळ्याविषयात काम करून स्वत:चही वेगळेपण निर्माण करण्याची धनलक्ष्मी टिळे यांची धडपड इतरांनाही प्रेरणा ठरावी, असचं हे बोधसूत्र आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकमध्येही हवं ‘मूर्तीचं वरकुटे’!

लकडी की काठी, काठी का घोडा!

काळाराम मंदिर सत्याग्रह : २ मार्च, काळाराम अन् रमेशायण!