नाशिक हेरिटेज जतनासाठी नागरी समिती !




नाशिक हेरिटेज जतनासाठी नागरी समिती !

नाशिक जिल्ह्यात अनेक वारसा स्थळे आहेत. ही वारसा स्थळे जपण्याच्या तसेच दुर्लक्षित वारसा स्थळांच्या संरक्षणासाठी जनजागृती व प्रयत्न होण्याची गरज आहे. खरे तर जिल्हा पातळीवर तसेच प्रत्येक ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका व महापालिकेच्या पातळीवर वारसा जतन समितीची गरज आहे. हे बहुदा कायद्यातही असावे; मात्र याची अंमलबजावणी होत नसल्याने नाशिकमधील अनेक वारसा स्थळे दुर्लक्षित व दयनीय स्थितीत आहेत. अनेक मंदिरे, गड-किल्ले, शिल्प, शिलालेख, ताम्रपट, वाडे, गढ्या अन् प्राचीन इतिहास दुर्लक्षित राहिल्याचे आपण पाहतोच आहोत. प्रशासनाकडे याबाबत कोणत्याही स्वरूपाचा पाठपुरावा होत नसल्याने नाशिकचा वारसा अधिकच धोक्यात जाण्याची शक्यता आहे. याचे आणखी एक कारण म्हणजे हा वारसा आहे, हे न समजल्यामुळे तो अधिक धोक्यात आल्याचे दिसते. तर एखादे शिल्प अथवा स्थळ वारसा असल्याचे माहित असून, आपण पुरातत्त्व अथवा संबंधित खात्यापर्यंत पत्रव्यवहार करण्यास धजत नाही. कारण, या उचापत्या कोण करणार आणि त्याला प्रशासन प्रतिसाद देर्इल का? हा एक अतिप्राचीन प्रश्न नेहमी आपल्या डोक्यात घट्ट बसलेला असतो. मात्र, योग्य मार्गाने अन् दिशेने पाठपुरावा केला तर नाशिकमधील ५०० हून अधिक प्राचीन मूर्ती वाचविल्या जाऊ शकतात. तर २०० हून अधिक प्राचीन मंदिरे संरक्षित केली जाऊ शकतात. यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. हे करायचे असेल तर नाशिककरांनी नाशिक हेरिटेज सिटिझन कमिटी स्थापन करून त्या माध्यमातून लढा उभारायला हवा. हा लढा प्रशासन, सरकार अथवा व्यवस्थेविरोधात नाही. तर हा लढा आहे आपला वारसा वाचविण्यासाठी आपल्याच नाशिककरांमध्ये जनजागृती करण्याचा अन् हा वारसा आहे हे ओळखण्याचा. एकदा का वारसा स्पष्ट झाला की, तो प्रशासनाच्या मदतीने सुरक्षित कसा करता येर्इल. यावर पाठपुरावा करता येर्इल. योग्य व्यक्तींपर्यंत योग्य पद्धतीने पाठपुरावा केला तर खूप काही शक्य आहे. आपले शहर आपला वारसा जपायचा असेल तर प्रत्येक वेळी आंदोलनेच करायला हवीत, असे नाही. ती समस्या जमजून घेत ती योग्य पद्धतीने मांडली की खूप काही बदल हळूहळू घडायला लागतो. आपल्या प्रयत्नात सातत्य असेल तर नाशिकचा प्राचीन वारसा वाचविला जाऊ शकतो.
नाशिकचा वारसा वाचविण्यासाठीच्या या लढ्याला मी सुरूवात केली आहे. आपल्यालाही या लढ्यात सहभागी होता येर्इल. नेमकं काय करायचं हा प्रश्न आपल्या मनात असणार. हा लढा सोशल मीडियाचा योग्य वापर करून व ऑनलाइनपद्धतीने पाठपुरावा करण्याच्या स्वरूपात आहे. तसेच प्रशासनाशी चर्चा, समन्वय, मार्गदर्शन, सल्ला, सहकार्य या स्वरूपातील बैठका घेऊन वारसा वाचविण्यासाठी काय करता येर्इल. यावर मंथन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. म्हणजेच www.vaarsa.com या वेबसाइटमधील Citizen Heritage Conservation Form विभागातील Nashik Heritage Conservation Citizen Form आपल्याला सदस्य होता येर्इल. नाशिकमधील एखादे शिल्प अथवा वास्तू, बारवा, शिलालेख, ताम्रपट, गड-किल्ला म्हणजेज वारसा या अंतर्गत येणारी कोणतीही गोष्ट आपल्याला दुर्लक्षित, बेवारस, असुरक्षित वाटत असेल म्हणजेच त्याच्या जतनाची गरज आपल्याला वाटत असेल तर आपण त्याबाबत लेखी स्वरूपात माहिती, छायाचित्रे नाशिक हेरिटेज सिटीझन कमिटीच्या र्इ-मेलवर पाठवायची आहे. या माहितीची खातरजमा करून त्याबाबत कमिटीच्या माध्यमातून संबंधित प्रशासन, अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार केला जार्इल व नाशिकच्या वारसशाचे जतन करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येर्इल. त्याबाबत मिळणार्या प्रतिसादाची माहिती वेबसाइटवर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येर्इल. फक्त पाठपुरावाच नाही तर केंद्र, राज्य सरकारचे वारशा संदर्भातील कायदे, प्रशिक्षण, कार्यशाळा यांच्या माहितीही आपल्याला वेळोवेळी उपलब्ध करून दिली जार्इल. म्हणजे वारसा जतन करताना त्या संदर्भातील कायद्याची माहिती, हक्क, अधिकार व कर्तव्य याबाबत लोकशिक्षणाचे कामही नाशिक हेरिटेज सिटीझन कमिटी करेल. या स्वरूपाचे काम ऑनलाइन असल्याने आपल्याला कोठूनही या उपक्रमात सहभागी होता येर्इल तसेच आपला वारसा वाचविण्यासाठी सोशल मीडियाचा योग्य वापर करून जिल्ह्यातील व शहराच्या वारशाच्या जतनासाठी प्रयत्न करता येतील.
      वारसा जतन हे क्षेत्र माणसाच्या जगण्यातील एक अविभाज्य घटक आहे. या क्षेत्रातील शिक्षण, लोकशिक्षण, समाजशिक्षण मात्र त्या तुलनेत दिले जात नाही. कारण, हे शिकण्याचे क्षेत्र आणि आपल्या जाणीवा समृद्ध करत गेल्यास हे शिक्षण थोड्याशा मार्गदर्शनावरही मोठ्या संधी निर्माण करू शकते. तसेच आपल्या शहराची जुनी ओळख समृद्ध केली जाऊ शकते. त्यासाठी प्रशासनाचे विविध विभागांचे व पुरातत्त्व विभागाचे मार्गदर्शन मिळू शकेल. तसेच Nashik Heritage Conservation Citizen Form ची तज्ज्ञ समितीही या चळवळीत सक्रिय असल्याने समितीही वेळोवेळी वारसा जतन, संवर्धनासाठी विशेष लेख, हेरिटेज वॉक व स्थळांच्या प्रत्यक्ष भेटीतून मार्गदर्शन करतील. नाशिक महापालिका, नाशिक जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या पातळीवरही हेरिटेज कमिटी असावी, यासाठी फोरम पाठपुरावा करणार आहे. प्रशासकीय पातळीवर हेरिटेज कमिटी होणे तर कायद्याचे आवश्यक आहे. मात्र, नागरिकांची नाशिककरांची ही हेरिटेज कमिटी असणे आता गरजेचे झाले आहे. आपण या फोरमला विशेष सहकार्य करून आपल्या नाशिकचा वारसा जतन अन् संवर्धन करण्यासाठी या चळवळीत सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. आपल्या सूचना, सल्ला, मार्गदर्शन आम्हाला मिळत राहिलच. नाशिकचा वारसा जपण्यासाठी टाकलेले हे एक सोशल पाऊल आपले नाशिक जपण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. कारण, इतर कोणी येऊन आपल्या शहराला जपेल ही अपेक्षा करण्यापेक्षा आपल्या हातातील मोबाइलच्या माध्यमातूनही आपण लोकांमध्ये जनजागृती घडवू शकता.

-        -  रमेशायण
आपल्या प्रतिक्रिया 8380098107 या क्रमांकावर पाठवू शकता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकमध्येही हवं ‘मूर्तीचं वरकुटे’!

लकडी की काठी, काठी का घोडा!

काळाराम मंदिर सत्याग्रह : २ मार्च, काळाराम अन् रमेशायण!