दगड शिकवा आम्हा आता कोणी…!




दगड शिकवा आम्हा आता कोणी!

इतिहास म्हणजे काय, आपण इतिहास का शिकतो अन् वारंवार त्यात का डोकावतो. अनेकांना इतिहास हा वेडा वाटतो. तर अनेकांना इतिहासाचं भलतचं वावडं असतं. खरं तर त्यांना इतिहास कळालेलाच नसतो केव्हा ते इतिहासातच वावरत असतात, त्यांना त्यांच्या भामटेपणा इतिहासाच्या डोळ्यात डोळे घालून जगू देत नाही म्हणून त्यांना तो टोचतो. पण, खरचं इतिहास नेमका काय आहे आणि तो जपण्यासाठी आपण प्रयत्न करतो का? मला वाटतं इतिहास म्हणजे भविष्यातील पाऊलखुणा! या पाऊलखुणा इतिहासावर आधारलेल्या किंवा इतिहासाचा हात हातात घेऊन पुढे जाणार असतात. पटो अथवा न पटो आपण इतिहासाशिवाय जगू शकतच नाही. कारण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला एक इतिहास आहे. त्यातील काहींची आपण दखल घेतो तर काहींना इतिहास म्हणून सोडून देतो. जे सोडून देतो ते नेमकं काय असतं अन् आपण ते सोडून का देतो, याचा विचार आपण करत नाही अन् माहितीच्या अभावामुळे विचार करण्याची वेळच आपल्यावर येत नाही. जे काही आपण इतिहास म्हणून सोडून देतोय ते मागे वळून एकदा पहायला हवे, अशी स्थिती नाशिकच्या अन् महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये पहायला मिळते आहे. इतिहासाचे हे वास्तव पाहताना त्या मूर्तींच काय करायचं असा प्रश्न मला सतावतो. रस्त्यालगत, शेतात, नदीलगत, हगणदारीत पडलेल्या शेकडो प्राचीन मूर्ती वाचविण्यासाठी तो इतिहास जोपासण्यासाठी एक चळवळ उभारा रे! असं सांगावं वाटतं. कारण दगडांच्या देशात राहणाऱ्या आपल्याला कधी दगड कसा पहावा हे शिकविलेच जात नाही. हा दोष कोणाचा?

नाशिकच्या गावांची भटकंती म्हणजे माझ्यासाठी एक मेजवानीच असते. वळणावळणाच्या रस्त्यानं ओढ दाखविणारे ढगांसोबत काल, शुक्रवारी एका तालुक्याच्या गावाजवळच्या लहानशा खेड्यात गेलो होतो. एका मित्राच्या आग्रहास्तव अन् त्याने वर्तवलेल्या काही खाणाखुणांच्या आधारे मलाही तेथे जाव वाटलं. गाव तसं लहान पण, उद्योगी! अशी गावची ओळख एका राजकीय व्यक्तीने भेटी दरम्यान करून दिली. माझा ओढा त्या खाणाखुणांकडे अधिक होता. त्यामुळे मी थोडी घाईच केली. मित्रानही ओळखलं. अखेर आम्ही त्या ठिकाणी पोहचलो अन् मी काही क्षण स्तब्ध झालो. शेषशाही विष्णूची मूर्ती, विष्णूच्या नाभीतून प्रकटणारा ब्रह्मा, पायाशी सेवीका आणि हा सोहळा अनुभवताना सप्तमातृका आहा काय सोहळा पण रस्त्यालगत फेकून दिल्यासारखा. फेकून द्यायला मूर्ती काही लहान नव्हती. ३ फूट बाय ४ फूट आकारातील ही मूर्ती मला अजब वाटली. मूर्तीची परिस्थिती ठिकठाक होती. विषय संपला नव्हता. त्याच्या शेजारी ब्रह्मा, विष्णू व महेश यांची मूर्तीही त्याच आकारातील. शंकराने पार्वतीला आपल्या मांडीवर घेतलेल्या दोन मूर्तीही आकर्षक पण काहीशा झिजलेल्या. इतरही काही भग्न मूर्ती इकडेतिकडे पडलेल्या काही जमिनीतून आम्हाला बाहेर काढा, असे सांगत असलेल्या पहायला मिळाल्या अन् आपण आपल्याच इतिहासाबद्दल, संस्कृतीबद्दल अन् कलेबद्दल किती मागास अन् निरूत्साही आहोत, हे पहायला मिळालं. अंधश्रद्धेने माखलेल्या अख्यायिकांच्या या मूर्ती बळी होत्या हेही पहायला मिळालं.

गावात मंदिरेही बरीच होती. मंदिराचं अंगणही मोठ होतं. या मूर्ती बहुदा भग्न असतील म्हणून पुजनीय नसतीलही पण, त्या अंगणात नक्कीच शोभून दिसल्या असत्या. आपल्या गावात हजार वर्षांपूर्वी दगडाचे सुरेख मंदिर होते अन् त्यातील हा मूर्तीरूपी वारसा आजही आपण जपला आहे हे कौतुक किती मोठ म्हणायचं पण, आपण कौतुकाच्याही योग्यतेही नाही, असे गावाला का वाटावे. असो. पण, आता तरी गावाने विचार करायला हवा. मंदिरात नाही तर गावातील शाळेत अंगणात तरी या मूर्ती ठेवल्या तर त्या चिमुकल्यांच्या मनावर न करताही असंख्य संस्कार होतील. कोठून आल्या या मूर्ती, कोणी घडविल्या, ते मंदिर कोणी बांधले असेल, तो काळ कोणता असेल या सह असंख्य प्रश्न त्यांना इतिहासाची गोडी लावतील अन् शाळेत कधीही न शिकविला जात असलेला दगड आपोआप शिकविला जात नाही. ‘दगडांच्या देशा, राकट देशा’ हे ब्रीद अभिमानाने आपण आपल्या महाराष्ट्राला लावतो व छातीठोकपणे सांगतो. पण, शाळेत कोणी आपल्याला दगड शिकवत नाही ना महाविद्यालयामध्ये मग प्राचीन इतिहास आपल्याला कधी कळणार. म्हणूनच आपण ‘मराठ्यांचा इतिहास’ (मराठ्यांच्या म्हणजे आताचे मराठा नव्हे; मराठे म्हणजे महाराष्ट्र) येवढ्यापुरतेच आपण मर्यादित राहतो. आपण मराठ्यांच्या इतिहासाला ‘मराठ्यांचा प्राचीन इतिहास’ म्हणून कधीच पाहत नाही. येथेच सगळं गोम आहे, असं वाटायला लागतं. असो. विषय येथे थोडा भरकटेल पण, आपल्या इतिहासाबद्दल आपणच उत्खनन करण्यास आपण निरूत्साही असतो; मात्र छाती काढून बोलतो येथेच सर्वकाही गमावून बसतो. जसा या गावातील खरा वारसा रस्त्यावर पडलेला आपण पाहतो अन् नव्या बाबाबुवांच्या नांदी लागून काय साधतो कोणास ठाऊक. त्यांचं पुढे काय होत हेही आपण अनुभवतो आहोत. वारसा नेमका कोणता हे आपल्याला ठरविता येत नाही, हे शैक्षणिक अज्ञान असेल मात्र, कधीतरी शिकण्याची अन् शिकून संघर्ष करण्याची तयारी तर आपण ठेवायलाच हवी नाही का?

दगड हाच महाराष्ट्राचा आत्मा आहे म्हणूनच तो आपल्याला प्राचीन मंदिरातून, त्यांच्या शिल्पातून अन् गड, किल्ल्यातून आजही आपल्याला आकर्षित करतो अन् लढ म्हणालया शिकवतो. असे असेल तर आपल्या प्रत्येक गावातील हा वारसा आपणच जपायला नको का? कोणीतरी येईल, आपल्या क्षमतांवर बोट ठेवेल तेव्हाच महाराष्ट्र पुत्र जागा होईल, हे कशाला घडावे. हल्ला झाल्यावरच आपल्या सीमा सुरक्षित करायला कशाला हव्यात. आक्रमण तर विचारांनी देखील होते. आपल्या संस्कृतीबद्दलचा निरूत्साह हा आपल्या वैचारिक आक्रमणाचाच एक भाग आहे आणि आजच्या पिढीच्या नसानसात भिनला आहे. हे विष कसे उतरवायचे. हे विष उतरवायचे असेल तर आपल्या गावाचा शोध घ्या. आपल्या गावाचा इतिहासाचा शोध घ्या. येथे जगलेल्या, मेलेल्या माणसांचा, लढलेल्या माणसांचा अन् इतरांना जगविताना घोड्यावरून कोसळलेल्या माणसांचा शोध घ्या. गावातील अज्ञात बारवेचा शोध घ्या, जमिनीत सापडलेल्या अन् लपवून ठेवलेल्या ताम्रपटांचा शोध घ्या. झिजलेल्या अन् दुर्लक्षित शिलालेखांचा शोध घ्या. प्रत्येक दहा वर्षाच्या टप्प्यात आपल्या गावात काय, कसे घडले यांच्या नोंदींचा शोध घ्या. त्या नोंदवा. तर आपण आपल्या गावाला ओळखू शकू. आपल्या पडक्या वेशीला जगवा. तटबंदीला पुन्हा उभी करा. सिमेंटची मंदिरे बांधण्यापूर्वी दगडांच्या प्राचीन मंदिरांना धारातीर्थी होण्यापासून वाचवा. आपल्या गावातील उत्सव, प्रथा, परंपरा, लाकडी व दगडी शिल्पांचा शोध घ्या. हा आपल्या गावाचा वारसा आहे हे ओळखा तरच तुम्हाला जगण्याची आपल्या गावाला कधीतरी परतण्याची त्यांच्या जगण्यात स्वत:ला ओतून द्यावे वाटेल. अन्यथा गावेही सिमेंटची शहरे होतील. माणस दूरावतील त्यांना एकसंद्ध ठेवण्यासाठी गावात काहीच राहणार नाही. हे कसे करायचं हा देखील प्रश्न पडायला हवा कारण उत्तरही तयार आहे. आपलं गाव कसं आहे हे प्राथमिक शाळेपासून मुलांमध्ये रूजवा. गाव कळालं म्हणजे तालुका कळेल अन् तालुका कळाला म्हणजे जिल्हा कळेल. प्राथमिक शिक्षणात पाचवी पर्यंत गाव, शहर, जिल्हा यांची माहिती अभ्यासक्रमात हवी तरच खऱ्या अर्थाने लोकशिक्षण देता येईल. यात मुलांना गावातील माणसांना दगडही शिकवा. दगड कसा पहावा आणि हा दगड आला कोठून हे प्रश्न लहानपणी सगळ्यांच पडला असेल पण उत्तर मिळाले नाही अथवा समोर हे उत्तर देणारेही नव्हते. मात्र, आता तरी हे घडू द्या. तेव्हाच प्राथमिक शाळेतील मुलांना, शिक्षकांना गावातील त्या मूर्तींचं महत्त्व कळेल अन् प्रत्येक गावात एक मूर्तीच संग्रहालय उभं राहील.

सोलापूर जिल्ह्यातील वरकुटे गावानं अंधश्रद्धांना बाजूला ठेवत गावातील प्राचीन मूर्ती एकत्र करून एक छोटस मूर्तींच संग्रहालय उभं केलं. म्हणून गावाला आता मूर्तीचं वरकुटे असं नाव पडलं आहे. सोलापूरचे तत्कालिन जिल्हाधिकारी जगदीश पाटील यांनी पाठिंबा देत संग्रहालयासाठी विशेष निधीही मंजूर केला. यातून गावात संग्रहालय उभं राहिलं. संग्रहालयात पंचवीस सूरसुंदरींच्या मूर्तींसह विष्णू, कुबेर, शिव, वायू, चामुंडा आदी मूर्ती अभ्यासासाठी ठेवलेल्या आहेत. या मूर्ती फक्त ठेवलेल्या नाहीत, तर संग्रहालयांमध्ये मूर्तीखाली पक्के व्यासपीठ ग्रामस्थांनी उभारलं. अशा पद्धतीनं मूर्तीरूपी वारसा जपणारं मूर्तीचं वरकुटे राज्यातील पहिलं गाव ठरलं. हा प्रयोग त्यांनी आठ वर्षांपूर्वी केला होता. मात्र, या उपक्रमाची ना कोणी दखल घेतली, ना ही कोणी त्यांचा आदर्श घेतला. पण, आम्ही हे कोणासाठी म्हणून केलेलं नाही, असेही वरकुटेकर ठासून सांगतात. हा वारसा आमच्या पूर्वजांनी जपून ठेवला नसता तर मूर्तीचे वरकुटे हे फक्त ‘सोलापूर जिल्ह्यातील एक गाव’ एवढंचं काय तो या गावाचा परिचय असता; मात्र आता तसे नाही. आमच्या गावातून जाणारी मंडळी आवर्जून गावात थांबतात. त्यामुळे गावाचं अर्थकारणही बदललं आहे. वरकुटेकर आवर्जून गावात येणाऱ्यांचे स्वागत करतात. गावातील संग्रहालय दाखवितात अन् पुन्हा गावात येण्याचं प्रेमानं आमंत्रणही देतात. आम्ही आमचा वारसा हेच आमचं शक्तिस्थळ बनविलं आहे, असं ते आवर्जून सांगतात. म्हणजेच प्रत्येक गावानं आपलं शक्तीस्थळ ओळखलं तर काय होऊ शकतं हे मूर्तीचं वरकुटे या गावावरून स्पष्ट होतं. या इतिहासातून नाशिकमधील रस्त्यावर टाकलेल्या मूर्तीचं गाव नक्कीच घेऊ शकेल. फक्त हेच नाही तर नाशिकमधील शंभर गावांमध्ये गावाचा प्राचीन वारसा जपणारी संग्रहालये उभी राहू शकतात. अर्थात पाठिंबा देणारे जिल्हाधिकारीही लाभायला हवेत अन् आपल्याला वेगळं काही करायचं आहे ही ऊर्मी देणारे हातही असायला हवेत. सुरूवात तर झाली आहे. नाशिकमधील दुर्लक्षित झालेल्या मूर्ती पुरातत्त्व विभागाने संरक्षित करण्यासाठी ग्रामस्थांशी चर्चा करावी व गावातही त्या जपल्या जाव्यात अथवा त्या गावात नको असतील तर त्या पुरातत्त्व विभागाने आपल्या प्रादेशिक संग्रहालयात मांडाव्यात, असं घडलं तर महाराष्ट्रात कोठेही नसेल इतकी संग्रहालये व सर्वाधिक मूर्ती असलेले संग्रहालय नाशिकमध्ये उभं राहू शकेल. आपला वारसा आपला इतिहास सांगणारी ही शिल्प पुढील शेकडो वर्ष आपल्या इतिहास पुढील पिढ्यांना सांगताना दिसतील. पण, हे शाळांमध्ये दगड शिकविल्यावरच शक्य होईल. दगड आता शिकवा आम्हा असे म्हणण्याची अन् आपलाच वारसा जपण्यासाठी संघर्ष करण्याची चळवळ उभारण्याची वेळ आता आली आहे.
-रमेशायण / ८३८००९८१०७


टिप्पण्या

  1. सर प्रत्येक इतिहास प्रेमी च्या मनात हेच विचार आहे पण अचूक मार्गदर्शन मिळत नाही तसेच गावकऱ्यांची उदासीनते मुळे हे काम पुढे सरकत नाही*****प्रत्येक गावचा इतिहास हा लहान मुलांना शिकवला/सांगितला गेला पाहिजे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकमध्येही हवं ‘मूर्तीचं वरकुटे’!

लकडी की काठी, काठी का घोडा!

काळाराम मंदिर सत्याग्रह : २ मार्च, काळाराम अन् रमेशायण!