कुंड, बारवा, विहिरी, नद्या का मरतायेत?



 

कुंडबारवाविहिरीनद्या का मरतायेत?

शहर वाढू लागलं, की शहरातील मूळ गाव नामानिराळं होतं म्हणा अथवा आठवणींपुरतच राहतं म्हणा. मोठाले रस्ते, पथदीपांचा झगमगाट, आकाशाकडे झेपावणार्या इमारती आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जातात. मात्र, हा भास असतो. या झगमगाटात आपण आपल्या घरात येणार पाणी कोठून येतं हे सहज विसरून जातो. कारण, पाणीपट्टी भरत असल्याने वेळेवर अन् भरपूर पाणी देण्याची जबाबदारी महापालिकेची झालेली असते. महापालिका आपल्याला पाणी देत नव्हती, त्या पिढ्या पिण्याचे पाणी कोठून आणायच्या, असा प्रश्न सध्या कोणालाच पडत नाही. त्यामुळे आपण आपली कुंड, बारवा, विहिरी, नद्या गमावत चाललो आहोत. त्या का मरतायेत, याकडे कोणाचेच लक्ष नाही.. यावर रमेशायणचा एक दृष्टीक्षेप..

-    रमेशायण / 8380098107
  
भारतीय जलसंस्कृती समृद्ध जलसंस्कृती म्हणून ओळखली जाते ती आपल्या नद्यांमुळे. मग ती गंगा असो, ब्रह्मपुत्रा असो, पंचगंगा असो वा गोदावरी. जलसंस्कृतीचा हा पहिला दुवा. मात्र आजही आपण या पाण्याकडे फक्तएच२ओम्हणून पाहत आहोत. म्हणजेच पाणी हे एच२ओ आहे आणि आपल्याला ते जगण्यासाठी लागतं, असं आपलं गणित होऊ लागल्याने हे एच२ओ येत कोठून त्याचा स्त्रोत काय? हे आपण विसरत चाललो आहोत. कारण त्याची सहजता अधिक वाढली आहे; मात्र त्याचं मोल आपल्याला अजूनही कळालेलं नाही. याचं मुख्य कारण म्हणजे घरात थेट नळाने येणार पाणी. शहराला पाणी कोठून येत असं शहरी माणसाला विचारलं तर नळानंतरचा पर्याय म्हणून जास्तीत जास्त धरण  सांगताना अनुभवायला मिळतो. त्याच प्रश्नाच उत्तर पेठसारख्या दुर्गम भागात विचारलं गेलं तर त्याचं उत्तर असतं, विहिर, नदी अथवा एखाद्या डोंगराच्या कपारीतील झरा! उत्तरातील हा फरक गरीब-श्रीमंतीसारखी एक दरी तयार करतो आहे. त्यामुळेच कुंड, बारवा, विहिरी, नद्यांकडे दुर्लक्ष होऊ लागलं आहे. हे दुर्लक्ष आपल्याला खूप मोठी किंमत मोजायला लावणार आहे, हेही आपण विसरत चाललो आहोत.
प्राचीन काळापासून माणसानं आपल्या वसाहती नदीकाठीच का वसविल्या. याच साध उत्तर म्हणजे पाणी. नाशिककरांनीही राहण्यासाठी प्राचीन काळापासून गोदेचा काठ निवडल्याच आपण पाहतो आहोत. नाशिककरांची जी काही भरभराट आज दिसते आहे त्याला गोदावरी हे एक मुख्य कारण आहे. नाशिककरांची प्रेरणा, मार्इ, आर्इ, सर्वकाही गोदाच राहिली आहे. म्हणूनच आपण तिला गंगा असेही म्हणतो. नाशिककरांच्या जीवनात आनंदाच्या, दुखाच्या, नैराश्याच्या, सुखाच्या अन् अध्यात्मिक अंगानेही गोदेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणून माणसाच्या जीवनात नदीचं महत्त्व किती अगाद आहे हे उमजायला लागतं. याच गोदापात्रातून नाशिककर पूर्वी पिण्याचे पाणी घरी न्यायचे. याच पाण्याचा वापर तेव्हा व्हायचा. आता घरात येते इतके तेव्हा पाणी शुद्ध नव्हते. मात्र गोदा हाच नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत होता आणि आजही आहे. नदीपात्रातील कुंड त्याच हेतूनही निर्माण झाली होती. प्रत्येक कुंड विशिष्ट कारणांमुळे बनविली गेली होती. कोणत्या कुंडातील पाणी पिण्यासाठी वापरायचे कोणत्या धार्मिकविधीसाठी अन् कोणती अस्थी विसजर्नासाठी हे ठरलेले होते. नाशिककर प्रामुख्याने पाण्यासाठी लक्ष्मण कुंडाचा वापर करीत. त्याच प्रमाणे काही झरे स्वरूपातील स्त्रोतही गोदापात्राच्या अवतीभवती होते की, ज्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी केला जार्इ. नाशिकच्या वाढत्या लोकसंख्येला नंतर पुरेशे पाणी मिळणे अवघड होऊ लागले. पेशवेकाळात नाशिककरांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून पेशव्यांचे सुभेदार धोंडो महादेव यांनी नासर्डीच्या झिर्याचा आधार घेत एका हौदात पाणी साठवून ते नाशिककरांना मिळेल याची सोय केली होती. याचा वापर त्यावेळी पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी अधिक केला जार्इ.   
१८६२ नंतर पाणी देणे ही नाशिक नगरपालिकेची जबाबदारी निर्माण झाल्याने याचा विचार त्यांना करावा लागला. त्यातच व्हिक्टोरीया पूल म्हणजेच आताचा होळकर पूलाने मोठी अडचण केली. या पुलाच्या बांधणीनंतर कुंडांमध्ये पुरेसे पाणी येणे अवघड झाले. त्यामुळे नाशिककरांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी लक्ष्मणकुंड आरक्षित करण्यात आले त्याचबरोबर लोकांनी घराघरात आड खोदल्या. घराघरांमधील आड हा देखील नाशिककरांचा हक्काचा पाण्याचा स्त्रोत होता. तर आसराच्या वेशीकडील लोक मुक्तेश्वर मंदिराच्या समोरील गोदावरी पात्रातील झर्यातून पिण्याचे पाणी भरत असत. त्र्यंबक दरवाजाजवळील मोठ्या नाल्यातील पाणीही पिण्यासाठी वापरले जार्इ. यावरून त्यावेळचे नाले किती स्वच्छ पाणी देत असतील हे लक्षात येते. पण, नंतरच्या काळात वाढलेल्या लोकसंख्येने नाले अस्वच्छ होऊ लागले. नंदिनी म्हणजेच आताची नासर्डी १९५८ पर्यंत पिण्यायोग्य पाण्याने वाहताना दिसत होती. ज्येष्ठ मंडळी आजही नासर्डीतून पाणी पिण्यासाठी घरी आणले जायचे अशा आठवणी आजही सांगतात. लोकवस्तीने आपला कचरा नदी, नाल्यांमध्ये टाकायला सुरूवात केली. कपडे धुणे, निर्माल्य नदीत टाकणे, मेलीली जनावरे नदीत टाकण्यासारखे प्रकार घडू लागले. मी आपल्याला जी स्थिती सांगतोय ती आहे १८६२ ते १८६५ या दरम्यानची. त्यावेळेच प्लॅस्टिक नावाचा राक्षस नव्हता तरी वाढलेल्या लोकसंख्येमुळे नदीची अवस्था इतकी वार्इट झाली की, गोदावरी नदीचे पाणी पिण्यास अयोग्य आहे, असा शेरा मुंबर्इ सरकारचे प्रमुख सॅनिटरी इन्स्पेक्टर मिस्टर हेवलेट यांनी मारला. या शेर्यानं नाशिककरांची मोठीच अडचण झाली. वाढत्या लोकसंख्येला धरणाची गरज आहे. त्यासाठी गोदावरी नदीवर धरण बांधले जाणार होते. मात्र हेवलेट यांच्या शेर्यामुळे अशुद्ध पाण्यावर धरण बांधले जाऊन नये, असे इंग्रज अधिकार्यांचे मत झाले. धरण बांधणे रद्दही झाले. मात्र गोदावरीशिवाय इतर पाणी पिणार नाही, अशी भूमिका नाशिककरांनी घेतली. गोदावरीपेक्षाही नासर्डीनदीचे पाणी पिण्यायोग्य असल्याचेही हेवलेट यांनी म्हटले होते. यासाठी तेव्हा १ लाख ३० हजार रूपये खर्च होणार होता. म्हणजेच गोदावरी ऐवजी नासर्डीवर धरण बांधण्याची कल्पना वास्तवात येण्यासाठी इंग्रजांनी सर्वप्रक्रिया पूर्ण केली होती. फक्त प्रश्न होता तो खर्चाचा. मात्र नव्यानेच स्थापन झालेल्या नाशिक नगरपालिकेला हा खर्च झेपावणार नाही. तसेच. नाशिककरांना पाणी फक्त गोदावरीचेच हवे असल्याने गोदावरीऐवजी नासर्डीवर धरण करण्याची मनशा नाशिककरांच्या भूमिकेमुळे होऊ शकली नाही. नगरपालिकेसमोर व इंग्रजांसमोरही नाशिककरांना पाणी कसे आणि कोठून पुरवायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. कारण गोदावरीचे पाणी अशुद्ध असल्याने रोगरार्इचे प्रमाण वाढले होते. कॉलरा, ताप, पोटदुखी, साथीचे आजाराने नाशिककर हैराण होते. या सगळ्यांमागे पाणी असल्याचा निष्कर्ष इंग्रजांनी काढला होता. नाशिकरांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून इंग्रजांनी पेशव्यांचे सुभेदार धोंडो महादेव यांनी नासर्डीच्या झिर्याचा आधार घेत सुरू केलेली हौदात पाणी साठविण्याची पाणी योजना पुन्हा नव्याने सुरू करावी, असा विचार केला. दरम्यानच्या काळात ही योजना दुर्लक्षामुळे बंद पडली होती. नगरपालिकेने ३० हजारे रूपयांमध्ये ही योजना खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला मात्र ती मालमत्ता खाजगी असल्याने हा व्यवहार फिसकटला. नाशिक शहराला पाणी देणार्या दोन तीन योजनासोडल्या तर शहरात ८२५ विहिरी होत्या. जुन्या गावात ५०२, नव्या वस्तीत २७० व पंचवटीत ५३ विहिरी होत्या. ४ विहिरी फक्त नगरपालिकेच्या होत्या त्याही अशुद्ध पाण्यामुळे वापरात आणण्याजोग्या नव्हत्या. त्यावेळची स्थिती आणि आजची स्थिती पाहिली की, आता आपण नशीबवान आहोत, असे वाटायला लागते.
पाण्यासाठी नाशिककरांची धडपड सुरू असताना अचानक आणखी एक मोठी समस्या त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली. अर्थात नाशिककरांनीच ही समस्या निर्माण केली होती. नाशिककर आपले सांडपाणी थेट नदीत सोडत होते. त्यामुळे नदीपात्रात हे पाणी साठून एक डबके तयार झाले होते. त्याच्या दुर्गंधीमुळे हा उपद्रव नाशिककरांनाच होऊ लागला. या डबक्याचे काय करायचे असाही प्रश्न निर्माण झाला. त्यासाठी मोठा खर्च होणार होता. १८७० मध्ये पंजाब प्रातांतील कपूरथळा संस्थानचे राजे नाशिकला आले असताना नगरपित्यांनी त्यांना ही समस्या सांगितली, तेव्हा हे डबके बुजवून नदीपात्रात घाट बांधण्यासाठी त्यांनी मोठा निधी दिला व नाशिककरांनी मोकळा श्वास घेतला. पण पाण्याचे काय करायचे हा प्रश्न अजूनही नाशिककरांना सतावत होता. शेवटी ३५ हजार रूपये सरकारी अनुदान मिळविण्यात नगरपालिका यशस्वी झाली अन् नदी पात्रात दोन खोल विहिरी खोदून पंपिग स्टेशनच्या मदतीने शहरात पाणी पोहचविण्याची योजना अखेर यशस्वी पार पडली. पण, मनातील शंकांचे वादळ कायम होते. व्हिक्टोरीया झाल्याने कुंड मोकळी पडू लागली. पंपिंगस्टेशनमुळे घराघरात नळाने पाणी दिले जाऊ शकते मात्र लोक नळ घेऊन पाणी पट्टी भरतील का असा प्रश्न नगरपालिकेसमोर होता तर लोकांच्या मनात नदी बाटली जाण्याची भिती होती. अखेर हजार नळ प्रथम देण्याचे ठरले. थेट घरात पाणी आल्याने नाशिककरांचे नदी आणि कुंडाकडे दूर्लक्ष झाले. यापूर्वी जे नाशिकर कुंड, नदी, विहीरी याचा वापर करून जगत असल्याने ते त्यांची काळजीही घेत मात्र आता त्यांची गरज संपली होती. नळांना मागणी वाढल्याने १९२३ मध्ये नगरपालिकेने तिसरी विहीर खोदून पाण्याचा पुरवठा गरजेनुसार वाढवला. जे पाणी नाशिककरांना मोफत नदी व कुंडातून मिळे ते पाणी पाण्याचे बिल देऊन नाशिककर विकत घेऊ लागले. पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरिनचा वापर सुरू झाला. मुंबर्इची हाफकिन ही कंपनी त्यावेळी पाणी शुद्धतेचे प्रमाणपत्र देत असे. वर्षातून तीनदा पाणी तपासले जार्इ. नाशिककर नदीला विसरले असले तर नगरपालिकेने सुरवातीला नदीकडे लक्ष देण्यासाठी म्हणजे तिचा वापर फक्त गटारगंगा म्हणून होऊ नये म्हणून नदीपात्रात रखवालदार नेमले. नदी दुशीत करणार्यांविरूध्द कडक कारवार्इ केली जार्इ. मात्र नंतर नंतर ते खर्चीक झाल्याने रखवालदार ठेवणे बंद झाले अन् नदीचा वापर गटारीसारखा होऊ लागला.
नाशिककरांना घरात पाणी आल्याने शहरातील शिंगाडा तलाव, विंचूरकरांचा हत्ती तलाव हे सगळ मागे पडत गेलं. तलावच काय तर घराघरातील आड, सामुहिक विहिरी नकोशा होऊ लागल्या. अनेकांनी चक्क त्या माती टाकून बुजविल्या. २००४ व त्यापूर्वीच्या कुंभमेळ्यात तर नाशिक महापालिकेने नदीवर हल्ला चढवला. हा हल्ला खूपच क्रूर होता. नाशिककरांनी आपल्या आजूबाजूचे पाण्याचे स्त्रोत बुजविले अन् गोदावरीचा वापर गटार म्हणून सुरू केला तर महापालिकेने नदीपात्रातील जिंवत पाण्याचे स्त्रोतच सिमेंट टाकून बुजवून टाकले. ही नाशिकची हानी काळाराम मंदिर सत्याग्रहानंतर सर्वात मोठी हानी ठरली. गेल्या अनेक वर्षांपासून आपण स्वावलंबनापासून परावलंबत्वाकडे प्रवास करत आहोत. हा उलटा प्रवास अगप्रतीकडे घेऊन जाणारा आहे हे सांगायला नकोच. त्याची काही उदाहरणे म्हणजे आडगाव हे गाव. आडगाव म्हणजे प्रत्येक घरात आड असल्याने या गावाला आडगाव असे म्हटले जाते. आजही अनेक घरांमध्ये आड आहे अन् तिला आजही पाणी आहे. आडगाव जेव्हा नगरपालिकेत गेले तेव्हपासून आडगावातील आड बुजविण्यास सुरूवात झाली. असे का व्हावे, आपल्या हातातील पाणी सोडनू घडाळ्याच्या काट्यावर येणार्या पाण्यावर का विसंबून रहावे. आडगावच्या सर्व आड जोडून आडगावन आपली स्वत:ची पाणी आणि जलशुद्धीकरण योजना बनवली असती तर महानगरपालिकेच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची गरजच या गावाला पडली नसती. किमान वापराच्या पाण्यासाठी हे गाव स्वावलंबी झाले असते. नाशिकच्या आजूबाजूच्या अनेक गावानी नळाले पाणी येताच आपली हक्काचे पाण्याचे स्त्रोत बुजवून टाकले.
खरतर महापालिकेने फक्त पिण्याचे पाणी नाशिककरांना द्यायला हवे. म्हणजे वापराच्या पाण्यासाठी नाशिककरांना पुन्हा आपल्या हक्काच्या पाणी स्त्रोताकडे अन् त्यांच्या पूर्नरभरणाकडे जाण्याची गरज भासेल. गोदावरीची, आपल्या उपनद्यांची, बारव, विहिर, आड अन् कुंडाचे महत्त्व आपण आपल्याच हातून संपवून टाकले आहे. ते पुन्हा जागवायचे असेल तर नाशिककरांना दहा दिवस पाणी देणे बंद केले तर आपोआपच नाशिककरांची पावले जुन्या आडांकडे वळतील. हा थोडा टोकाचा विचार झाला पण, पिण्याचे पाणी, वापराचे पाणी वेगळेच हवे. नाहीतर पुढचे भविष्य कठीण आहे. गावागावातील विहिरी पुन्हा वापरल्या गेल्या तर कोट्यवधींचा खर्च तर वाचणारच आहे पण, परावलंबाकडून स्वावलंबनाकडे नवीन प्रवास सुरू होऊ शकेल. सप्तश्रृंगी गडावर आजही एका मंदिरासमोरील बारवेच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी होतो. एकदा ही बारव पाण्यासाठी गेलो असता, बारवेत उतरताना एक आजीबार्इ माझ्यावर रागावल्या. त्या म्हणाल्या, ‘ही मेलेली बारव नाही.’ मी म्हटलं म्हणजे? ती आजी म्हणाली ते मनाला पटलं. आजीबार्इ म्हणाल्या,‘नातवा, घरात पाणी आलं म्हणून आपण या विहिरी बुजवू लागलो आहोत. गरज सपल्याने त्याच्या स्वच्छतेकडे कोणीही लक्ष देत नाही. मी वयाने सत्तरीची आहे. मी सरकारचा नळ घेतलेला नाही. कारण ती महागडी पाणीपट्टी मी भरू शकत नाही. पाण्यासाठी पैसे मोजावे लागणे हा कसला विकास. लोक भरतात पाणीपट्टी कारण त्यांना पाण्याची किंमत नाही. माझी ही बारव माझं जीवन आहे. ती मला भरभरून पाणी देते. म्हणून मी त्यात कचरा पडू नये. कोणी त्यात चपला घालून जाऊ नये म्हणून मी नेहमी काळजी घेते. पाणी अशुद्ध झाले की मग मी कोणाकडे जाऊ. माणसाला हे महत्त्व कळालं ना, की तोही पाण्याची काळजी घ्यायला लागेल.’ आजीबार्इंची ही गोष्ट नाशिककरांसाठी अंजन ठरवी. आपणच गोदा अस्वच्छ केली आहे त्यामुळेच आपल्याला आर्थिक झळही सोसावी लागत आहे. गोदावरीवर होणारा खर्च आपल्यामुळेच होतो आहे. गोदावरीच्या प्रदूषणाचे मूळ शोधून ते दूर केले तर गोदावरीवरील खर्च कमी होर्इल अन् आपल्यावर पडणारा आर्थिक बोजाही कमी होर्इल. गोदावरी असो वा नासर्डी, त्यांच्या स्थितीला आपण जबाबदार आहोत. शहर स्वच्छतेसाठी प्रयत्न सुरू असताना नदी प्रदूषित का होते, याचे उत्तर शोधण्याचा त्याच्या मुळावर घाव घालण्याचा अन् पाण्यासाठी तिच्यावरील दबाव कमी करण्याची गरज आहे. यासाठी आपले जुने पाण्याच्या स्त्रोतांचा सक्षतपणे वापर करण सुरू करायला हवे. तरच गोदावरीला मोकळा श्वास घ्यायला वेळ आणि तिच्या हक्काचे पाणी मिळेल.
नाशिक शहरात अन् जिल्ह्यात ३०० हून अधिक बारवा वापराविना पडून आहेत. काही बुजविल्या आहेत तर काही पाणी अजूनही कचर्याने भरलेल्या आहेत. त्या स्वच्छ करून पर्यायी पाणी वापरासाठी वापरल्या गेल्या तर नाशिक पाण्यासाठीही एक स्वावलंबी जिल्हा होऊ शकेल. डोंगराच्या अवतीभवती पाणी मुरण्यासाठी जसे चरे खोदले जातात तसेच त्या विहिरीच्या संरक्षणासाठीही प्रयत्न व्हायला हवेत. तरच आपण आपले भविष्य सुरक्षित करू शकू.
-    रमेशायण / 8380098107
-     

टिप्पण्या

  1. पाणी हेच जीवन***नाशिक कर जागे झाले तर थोडे प्रयत्न केले तर नक्कीच गोदावरी चे रूप बदलू शकते

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकमध्येही हवं ‘मूर्तीचं वरकुटे’!

लकडी की काठी, काठी का घोडा!

काळाराम मंदिर सत्याग्रह : २ मार्च, काळाराम अन् रमेशायण!