नाशिकचे वाडे : ऐतिहासिक अन्‌ सांस्कृतिक संचित

नाशिकचे वाडे : ऐतिहासिक अन्‌ सांस्कृतिक संचित

--         रमेशायण https://rameshaayannashik.blogspot.com/

एखादी संस्कृती ही त्या समाजासाठी तयार झालेला आरसा असते. व्यक्तींमध्ये संस्कृती साकारते, जिवंत होते, नव्याने निर्माण होते. तरीही संस्कृती व्यक्तिनिरपेक्ष असते, कारण तिला एक निराळेच स्वतंत्र जीवन बहाल झालेले असते. म्हणूनच यातून अनेक संस्कृतीप्रमाणे वाडा संस्कृतीसारखी एक संस्कृती साकारते. प्रत्येकाची अन्‌ प्रत्येक शहराची एखाद्या संस्कृतीमुळे ओळख असते. ही ओळख शेकडो वर्ष त्या शहराचा चेहरा बनून बहरत्या शहराला नवचैतन्य देत राहते. पुणे म्हटलं की, शनिवारवाडा जसा डोळ्यापुढे उभा राहतो तशीच नाशिक अन्‌ येथील वाडा संस्कृतीही अशीच आहे. नाशिकच्या वाड्यांचा हा प्रवास एका झुंजावातापासून एका विवंचनेपर्यंत घेऊन जातो. ही विवंचना आहे त्या अज्ञात वाड्यांच्या इतिहासाची, ते बांधणाऱ्या हरविलेल्या माणसांची अन्‌ त्यांचा इतिहास पुसट होत चालल्याची.
नाशिकमध्ये पहिला वाडा कोणता बांधला गेला हे सांगणे कठिण असले तरी गड किल्ल्यावर राजवाडे बांधणारे राजे व त्यांच्या सरदारांनी गावांमध्ये वाड्यासारखी भव्यवास्तु उभारण्यास सुरूवात केली असावी. अर्थात वाडा हे तेव्हा आणि आजही श्रीमंतीचे एक लक्षण आहे. सत्तेची ताकद अन्‌ कारभारी व्यक्तीच आर्थिक सुबत्तेतून वाडे उभारत. त्या वाड्यांतून त्यांचा रूबाब, जीवनशैली अन् कार्यपद्धतीही लक्षात यावी इतके बोलके वाडे तेव्हा साकारले गेले. त्यामुळे वाडा संस्कृती अन्‌ हे वाडे तयार करणाऱ्या व्यक्ती हा वेगळा फरक करता येत नाही. ते होते म्हणून वाडे जन्मले अन्‌ आता ते नाहीत म्हणून की काय हे वाडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, असे म्हटले तर वावगे ठरू नये. वाडा कसा असतो, कसा दिसतो, त्याचे उपयोग काय हे आपण सर्वच जाणतो. पण त्यामागील माणसे कोण, त्यांचा इतिहास काय हे जाणून घेणे हाही एक मनोरंजक प्रवास आहे.
नाशिकच्या वैभवशाली वाड्याची कहाणी आपल्याला दोन हजार वर्षापूर्वीच्या इतिहासात घेऊन जाते. सातवाहन, क्षत्रपांची सत्ता नाशिकमध्ये राहिली आहे. त्यामुळे राजेमहाराजांना राहण्यासाठी तेव्हाही मोठाले राजवाडे उभे राहिले असतील अन् कालांतराने नष्ट झाले असतील. सत्ता बदलल्या तसे त्याचे रूप स्वरूपही बदलले असेल यात शंका नाही. द्रढप्रहार (शके ७७२ इसवी सन ८५० ते शके ८०२ इसवी सन ८८०)ची चंद्रादित्यपूर’(चांदवड) ही राजधानी होती. त्याचा राज्यविस्तर चांदवड ते अंजनेरीपर्यंत अन् दक्षिणेकडे सिंदीनेरपर्यंत (सिन्नर) होता.  त्याचा मुलगा सेऊणचंद्र (प्रथम)नेही राज्यव‌िस्तार केला अन्  व त्याची राजधानी राज्यकारभाराच्या सोयीसाठी चंद्रादित्यपुराहून सिंदीनेर आणली. या काळातही राजकारभार व राहण्यासाठी नक्की वाडे उभारले गेले असतील. सेऊणचंद्र (प्रथम) - (शके ८०२ ते ८२२) पासून त्याच्या नंतर धाडियप्प, भिल्लन (प्रथम), श्रीराज, वादुगी, धाडियप्प (द्वितीय), भिल्लम (द्वितीय), वेसुगी, अर्जुन, भिल्लम (तृतिय), वादुगी (द्वितीय), वेसुगी, भिल्लम (चतुर्थ), सेऊणचंद्र (द्वितीय), सिंघणदेव, मल्लुगी, भिल्लम (पंचम) याच्यापर्यंत (शके ११०७ ते १११५) अशी सुमारे तीनशे वर्षें यादवांची राजधानी सिन्नरयेथे होती. भिल्लम (पाचवा) याने यादवांची राजधानी शके ११०७ मध्ये सिन्नरहून देवगिरीला (दौलताबाद, औरंगाबाद) येथे नेली. मात्र त्यांच्या ऐश्वर्याने नाशिकलाही समृद्ध केले. त्यांनी उभारलेले वाडे त्याचे साक्षीदार आहेत. मात्र, या काळातील गडकिल्ले सोडले तर वाडे आजही कायम राहणे अशक्यच. आपण आज जे वाडे पाहतो आहोत ते पंधराव्या शतकानंतरच्या काळातील आहेत. त्यामुळे नाशिकमधील वाड्यांचा इतिहास खऱ्या अर्थाने दिल्लीच्या तख्तापासून सुरू होतो. ४ फेब्रुवारी १६२८ शहाजहान दिल्लीच्या तख्तावर आला अन् निजामशाहीचा नितपात करण्यासाठी मोगलांनी योजना आखायला सुरूवात केली. दिल्लीशाह मोगलांच्या शक्तीपुढे आपले काही चालणार नाही हे निजामाने ओळखले. आपल्याला मराठा सरदारच तारू शकतात, हे तो जाणून होता. आपल्यापासून दूरावलेल्या शहाजीराजे, लखूजी जाधवराव आदी मराठा सरदारांना त्याने परत येण्याचे आवाहन केले. निजामाच्या सादेला प्रतिसाद देत मराठे सरदार निजामाशाहीत परत आले. मात्र लखूजी जाधवरावांचा निजाम दरबारात खून झाल्याने शहाजी राजांनी निजामशाही सोडली.  नोव्हेंबर १६३० मध्ये शहाजीराजे मोगलांना मिळाले. यावेळी शहाजहानने संगमनेर आणि जुन्नर या जिल्ह्यातील परगणे जहागिरीदाखल शहाजींना दिले. तोपर्यंत मोगलांनी नाशिकवर ताबा मिळविलेला होता. मार्च १६३१ मध्ये नाशिकचे ठाणेदार म्हणून शहाजी राजांची नेमणूक करण्यात आली अन्‌ शहाजी राजे नाशिकला राहण्यास आले. त्यावेळी शिवाजी राजे एक वर्षांचे होते. गोदावरीच्या दक्षिणेला असलेले व टेकडावर वसलेले जुन्या नाशिकमध्ये शहाजी राजांचे वास्तवास होते. नाशिकचे ठाणेदार शहाजीराजे आजच्या जुम्मा मशिदीच्या जवळ व गाडगे महाराजांच्या धर्मशाळेच्या अगदी वरच्या मजल्याला लागून असलेल्या मोगलांच्या सरकारी वाड्यात (गढीत) राहत होते, असा एक संदर्भ इतिहासाच्या पानांमध्ये आढळतो. या जुन्या संदर्भाशिवाय नाशिकमध्ये वाडा होता याचा यापेक्षा जुना संदर्भ हाती लागत नाही. यावेळी शहाजीराजे व बालशिवाजी तेथे राहिले भैयासाहेब कोठावळे यांचा वाडा आजही पाहता येतो. पूर्व किनाऱ्यावर वाड्यांसारखे मठ होते; मात्र वाडा नव्हता. यानुसार जुन्या मातीच्या गढीवरील मोगलांची सरकारी इमारत वाड्यासारखा अन्‌ नाशिकच्या ठाणेदारासाठी सत्ता चालविण्याचे केंद्र होते अन्‌ येथूनच नाशिकच्या वाड्याची सुरूवात झाली, असे म्हणणे योग्य ठरेल. १६३२ म्हणजे एका वर्षातच शहाजींनी मोगलांविरोधात बंडाचा झेंडा फडकविला अन्‌ ते पुन्हा निजामशाहीत गेले. त्यामुळे १६३२ ते १६३६ या पाच वर्षात मोगल अन्‌ शहाजींमध्ये धुमश्चक्री चालू राहिली. दरम्यान, नाशिक शहाजींच्याच ताब्यात होते. या पाच वर्षात बाल शिवाजींचा नाशिकमध्येच वावर असावेत. ऑक्टोबर १६३६ मध्ये नाशिक, त्र्यंबक, शिवनेरी व माहुली मोगलांना देत ते कायमचे विजापूर गेले. पुन्हा मोगलांच्या ताब्यात गेलेले नाशिक गुलशनाबाद म्हणून ओळखले जाऊ लागले. ही ओळख १७५१ पर्यंत कायम होती. यावेळी नाशिक जिल्हा नव्हता, तर मोगलांच्या महाराष्ट्रातील खानदेश, वऱ्हाड, औरंगाबाद आणि नांदेड या चार सुभ्यांपैकी खानदेशातील परगण्याचे ठिकाण म्हणून नाशिक एक  होते. १६८० नंतर मराठ्यांनी नाशिकवर स्वाऱ्या सुरू केल्या. मात्र मोगलांकडून त्यांना हार पत्करावी लागत होती. अखेर १६९६ मध्ये मराठ्यांना नाशिकच्या काही भागावर अंमल बसविण्यास यश आले अन्‌ पुढे नाशिकवर मराठ्यांचे वर्चस्व वाढले. रामकुंड याच काळात बांधण्यात आले. १७४७ मध्ये सरदार नारोशंकर यांनी रामेश्वर मंदिर (आताचे नारोशंकर मंदिर) बांधले यादरम्यानच सरदारांचे वाडे नाशिक साकारले जाऊ लागले. याचदरम्यान, नवापुरा वसला. १७५१ मध्ये गुलशनाबाद पुन्हा नाशिक झाले. त्यावेळी गोदेच्या पश्चिम काठावर आजच्या नाशिकचा पत्ताच नव्हता. हे आजचे नाशिक पेशव्यांनी १७५३ मध्ये वसवले अन्‌ याच दरम्यान नाशिकमध्ये वाडा संस्कृती बहरली. मल्हारराव होळकर यांनी चांदवडमध्ये साडेतीन एकर जागेवर तीन मजली आकर्षक रंगमहाल १७५० ते १७६५ दरम्यान बांधला. होळकरांच्या काळात या ठिकाणी सुंदर चित्रांनी रंगकाम झाले. त्यामुळे त्याला रंगमहाल हे नाव पडले. रंगमहालात लाकडावर आकर्षक कलाकुसर करण्यात आली आहे. कलाकुसर केलेली लाकडी मूर्ती व रंगमहालातील मौल्यवान वस्तूविशेष आकर्षण आहे. नाशिकमध्ये घाट अन्‌ मंदिरांचे वैभव बहाल करणाऱ्या अहिल्याबाईंनी येथून अनेक वर्ष राज्यकारभार पाहिला. रंगमहाल हा वाडा आजही वाड्यांच्या वैभवांची अन्‌ त्यावेळच्या सांस्कृतीक, कला अन्‌ वैचारिक श्रीमंतीचे प्रतीक म्हणून उभा आहे. तर अहिल्याबाईंनी आपली मुलगी मुक्ताबाईचे लग्न सरदार फणसे यांच्याशी लावताना त्यांना निफाड अन्‌ लासलगावात किल्ल्यांसारखे वाडे बांधून दिले. लासलगावचा वाडा खासगी मालकाच्या ताब्यात असला तरी तो आजही पहायला मिळतो. विशेष म्हणजे याला लासलगावचा किल्ला म्हटले जाते. पण निफाड अन्‌ लासलगावच्या वाड्यांची गोष्ट इथेच संपत नाही. कारण हे वाडे अहिल्याबाईंनी आपल्या जावयासाठी खास करून बांधले आहेत. सत्तेतील बंडाळींना हैराण झालेल्या अहिल्याबाईंना बंडाळी थोपविणे अवघड झाले होते. बंडाळी थोपवली गेली नाही तर राज्य हातचे जाईल, अशी स्थिती निर्माण झाली होती. यावेळी अहिल्याबाईंनी आपल्या मुलीचा स्वयंवर रचला. जो सरदार ही बंडाळी मोडून काढेल त्याच्याशी मुक्ताबाईचे लग्न लावण्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी यशवंतराव फणसे या तरुण सरदाराने ही कामगिरी पार पाडली. विवाहात निफाड, येवला व लासलगाव परिसरातील १२० एकर जमीन, पाच गावांची जहागिरी व ७०० नोकरचाकर दिले अन्बांधले हे भक्कम वाडे! हे वाडे पाहताना आजही हा इतिहासपट डोळ्यांसमोर उभा राहतो. तर होळकरांशी संबंधित आणखी एक वाडा लासलगाव जवळच असलेल्या कोटमगावात आहे. येथील सोमवंशींचा वाडा व होळकरांचे कोर्ट भरायचे तो कुलकर्णी वाडा आजही इतिहास सांगताना दिसतात. तर या दोन्ही वाड्यांचे काष्टशिल्पाचे काम चांदवडच्या रंगमहालासारखेच आहे. असाच होळकरांना आणखी एक वाडा सिन्नरच्या वडांगळीत होता. तो आता जमीनजोस्त झाला असला तरी त्याच्या खाणाखुणा वाड्याच्या भव्यतेच्या इतिहास सांगतात.   
नाशिक तीर्थक्षेत्र असल्याने अनेकांसाठी हे आकर्षणाचे केंद्र होऊ लागले. श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई अन्‌ त्यांचे त्र्यंबकराव पेठे नाशकात कायमचे राहू लागले. पेठे वाडा अन्‌ गोपिकाबाईंसाठी नाशिकमध्ये अन्‌ गंगापूरमध्ये वाडा बांधण्यात आला. १७६० ते १७८० च्या दरम्यान नाशिकचा सरकारवाडा थोरल्या माधवराव पेशव्यांनी राजकारभारासाठी सरदार रंगराव ओढेकरांच्या देखरेखीखाली बांधला गेला. त्याला चोपडावाडा असेही म्हटले गेले. या दरम्यानच बादशहाकडून सरदार दाणींना विंचूरची जहागिरी मिळाली अन् ते विंचूरकर झाले. विंचूरकरांनी विंचूरमध्ये बांधलेला वाडा किल्लापेक्षा कमी नाही. याची साक्ष आजही तो वाडा देताना दिसतो. किल्ल्याच्या तोडीचे प्रवेशद्वार अन् प्रवेशद्वारासमोर तीनशेवर्ष जुने गणपतीचे चित्र वाडेसंस्कृतीचा धार्मिक पैलूही उलगडतो. हा वाडा आता खासगी मालकीचा आहे. मात्र आजही त्याचे मालक श्री. दरेकर आपुलकीने हा वाडा दाखवितात. या वाड्यात नंतर कोर्टाचे कामही चालत असे. विचूंरकरांशिवाय पोतनिसांचा वाडाही आपली भव्यता इतिहासह व्यक्त करतो. पो‌तनिसांच्या वाड्यातही चित्रकलेचे अनोखे रूप न्हाहाळायला मिळतात. पेशव्यांनी विंचूरकरांना येवल्याची जहागिरी दिली तेथेही वाडा संस्कृती उदयास आली. तेथेही अनेक सुंदर वाडे उभे राहिले. त्यांच्यातही चित्रकला अन् शौर्याचा गाथा सजल्या. पण नाशिकमध्ये रंगमहालानंतर सरकावाड्यासारखा वाडा झाला नाही. नाशिकमध्ये दोन सरकारवाडे होते. तर ओझर गावातही सरकारवाडा नावाचा वाडा होता. मात्र तो आता पडला असला तरी त्या परिसराला आजही सरकारवाडाच म्हणतात. चांदवडच्या रंगमहालानंतर नाशिकच्या सरकारवाड्यातील लाकडावरील नक्षीकामाचे उत्तम उदाहरण म्हणून हा वाडा आजही नाशिकच्या वाडा संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करता दिसतो. पुण्यासाठी शनिवारवाड्याचे जसे महत्त्व आहे तसेच नाशिकसाठी सरकारवाड्याचे. सरकारवाड्याला चोपडा वाडा असेही संबोधले जात. मराठी राज्याच्या बहराच्या काळात 1760 ते 1780 या काळात बांधलेल्या सरकारवाड्यातून उत्तर विभागाचा कारभार चालविला जात होता. रघुनाथ पेशवे नाशिकला स्थायिक होण्यास आल्यानंतर कारभार पाहण्यासाठी बांधण्यात आलेला हा वाडा ६६.५० बाय २३.८० मीटर आकाराचा आहे. गोपिकाबाई पेशवे नाशकात मुक्कामी असताना या वाड्यातून कारभार बघत. त्यामुळे त्याला सरकारवाडा असे नाव पडले. तर शेवटचे पेशवे आणि दुसरे बाजीरावांनीही सरकारवाड्यातून कामकाज गेल्याची नोंद मिळते. तर दुसऱ्या बाजीरावांच्या मेहूणीचे लग्न बडोद्याचे दिवाण गंगाधरशास्त्री पटवर्धन यांच्या मुलाशी ठरले होते. हा लग्न सोहळा या सरकारवाड्यात होणार होता. यासाठीही सरकारवाडा सजविण्यात आला होता. मात्र हे लग्न मोडले. म्हणजेच सरकारवाड्याचा वापर वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या कारणांनी झालेला दिसतो. अगदी तुरूंग ते पोलिसचौकी म्हणूनही सरकारवाड्याचा वापर झाला असून, सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना) ग्रंथालयाची सुरूवात याच वास्तूतून झाली आहे. 
सरकारवाड्याच्या खालील मजले कार्यालये अन्‌ वरच्या मजल्यावर दरबार हॉल होता. रेल्वेत अधिकारी असलेल्या एका चित्रकाराने सरकार वाड्याचे रेखाटलेले एक रेखाचित्र १५ जानेवारी १८५९ मध्ये इलस्ट्रेटेड लंडन न्यूज या वृत्तपत्रात नानासाहेबांचा वाडा या नावाने प्रसिद्ध झाले आहे. यावरून त्याकाळी नाशिकच्या वाड्याची चर्चा सातासमुद्रापार होत असल्याचे लक्षात येते. लगोलग राघोबादादांनी पत्नी आनंदीबाईंसाठी गंगापूर जवळील चौधस (आताचे आनंदवल्ली) येथे मोठा वाडा बांधला. हा वाडा आनंदीबाईची गढी म्हणून प्रसिद्ध झाला. नाशिक परिसरात पेशव्यांपेक्षा त्यांच्या सरदारांनी बांधलेले अनेक वाडे आहेत. अनेक सरदारांना आपला भक्कम वाडा नाशिकमध्ये असावा असे वाटायला लागले अन् नाशिक वाड्यांनी सजू लागले. नाशिकमध्ये फक्त सरदारांचेच अन् श्रीमंतांचेच वाडे होते असेही नाही. तर बुद्धीवंतांचेही वाडे होते. यात पंडित, ज्योतिषशास्त्री, आयुवेदाचार्य, वैयाकरणी यांचेही वाडे नाशिकमध्ये होते. यात वैयाकरणी गणेशशास्त्री गायधनी व शंकरशास्त्री गर्गे या संस्कृत पंडितांचे वाडेही आजही पहायला मिळतात. यात गायधनी वाडा व गर्गे वाडा आजही सुस्थितीत आहे. नारोशंकर राजेबहाद्दर या सरदाराने मालेगावात मोसम नदीच्या काठी पेशव्यांकडे वाडा बांधण्याची परवानगी मागितली अन्‌ मालेगावचा किल्ला बांधला. असे रंजक गंमतीजमतीही नाशिकच्या वाडा संस्कृतीतील एक पैलू आहेत. सिन्नर शहरातील चौदाचौकांचा यादव घराण्यातील राजे फत्तेसिंह यांचा वाडाही आताआतापर्यंत वैभवाची साक्ष देत होता; मात्र त्यानेही देह ठेवला आहे. दिंडोरीतील आंबे गावातील तलवार बहाद्दर म्हणून ओळखले गेलेले राजेबहाद्दरांच्या खाणाखुणाही वाड्याच्या रूपाने पहायला मिळतात.
जुन्या नाशिक भागातील वाडे हे नवीन पिढीसाठी कुतूहलाचा विषय आहेत. मेनरोड परिसर ते गोदाघाट, पंचवटी-काळाराम मंदिर परिसर, गंगापूर, गोवर्धन, भद्रकाली, जुने नाशिक अन् जिल्ह्यातील अनेक भागातील वाडे नाशिकच्या वाडा संस्कृती कशी बहरली याची साक्ष देताना दिसतात. जुन्या नाशिकमधील नावदरवाजा भागातील अरुंद गल्ल्यांमधून हिंडताना लाकडाचे सुबककोरीव काम असलेला एक वाडा लक्ष वेधून घेतो. हा वाडा म्हणजेच पवार बंधूंचा वाडा. याचबरोबर पंचवटी, सोमवार पेठ, काझीपुरा, पगडबंद लेन, चौकमंडई, चांडवडकर लेन परिसरातील वाड्यांनी स्वातंत्रचळवळींमध्ये महत्त्वाची भूमिका पारपाडली आहे. अठराव्या शतकाच्या अखेरीस बडोदा (गुजरात) येथील राज घराण्यास येथील बारावर्षीय युवक दत्तक गेला होता. गुराखी ‘राजा’ झाल्याने कौळाणे गावाला राजाचे कौळाणे म्हटले जाते. कौळाणे गावात महाराजा सयाजीराव गायकवाडांचा मोठा राजवाडा आजही त्या घडामोडींची साक्ष देतो. असेच अनेक वाडे नाशिकसह सिन्नर, येवला, निफाड, पेठ, त्र्यंबकेश्वर, चांदवड, बागलाण परिसरात उभे राहीले अन्‌ कालांतराने अनेक वाड्यांनी आपला देहही ठेवला. त्यामुळेच येत्या काळात नाशिकची वाडा संस्कृती कायम आठवणींत जाण्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. या शहराच्या संस्कृतीच्या अनेक पदरांपैकीचा एक दुवा निसटणार हे एखादे नाते तुटण्यासारखेच आहे. शहरातील अनेक वाडे अजूनही तग धरून आहेत. त्यांचा हा श्वास अजून एखादे तपापर्यंत त्यांना साथ देईल; मात्र त्यानंतर तेही धारातीर्थी पडतील. या अनोख्या इतिहासाचाही प्रवास अज्ञाताकडे सुरू झालाय की काय असे वाटायला लागते. तर अज्ञातवासात गेलेले अनेक वाडे शहराच्या आजूबाजूला आजही त्यांच्या पाऊलखुणांच्या रूपाने अजूनही पहायला मिळतात.
नाशिकच्या गड-किल्ल्यांवरील वाडे तर केव्हाच हरवले आहेत. हतगड, वाघेरा किल्ल्यावरील वाडा, गाळणा किल्ल्यासह जिल्ह्यातील ५२ किल्ल्यावर ही स्थिती आहे. पेठ संस्थानचे दोन वाडेपूर्णपणे कोसळले असून, त्या जागेवर आता फक्त चौकोनी पाया पहायला मिळतो. पेठ रस्त्यावरील अंबेगण या गावातील वाड्याचीही अशीच स्थिती आहे. तर इंदोरेतील नामशेष झालेला झुल्फीकार अली भुत्तो यांचा वाडा, निफाडमधील करंजगावातील डांगेचा वाडा, ब्राह्मणवाड्याचा इतिहासही कोणाला माहिती नाही. अशीच स्थिती भेंडाळीतील मूळच्या महाजनपूरच्या महाजन वाड्याची आहे. हरणगावातील वाडा, तळेगाव दिंडोरीतील वाडे, मोहाडीतील सोमवंशी वाडा, सरदार रंगराव ओढेकरांचा ओढा गावातील राजमहाल, नस्तनपूरमधील गढी, चांदोरीतील टर्ले-जगताप व हिंगमिरे यांचे वाडे, सायखेड्यातील व्यापाऱ्यांचे वाडे कोणी बांधले, कधी बांधले, त्यांचा पराक्रम, इतिहास अन्‌ ही माणसे गेली कुठे असे अनेक प्रश्न एका अज्ञात काळोखात घेऊन जातात. हा अज्ञात इतिहास अजूनही लख्ख प्रकाशासारखा इतरांसमोर यायला उत्सुक असल्याची साद घालताना दिसतो. तर लाखलगावातील सरदार अमृतराव वैद्यांचा वाडा, दिंडोरीतील देशमुख वाडा, कोठूरेतील मल्हारराव बरवे यांचा बरवे वाडा आजही त्यांचे वंशज हा वारसा ह्दयाशी कवटाळून आहेत. डुबेरेचा वाडा बाजीराव पेशव्यांचे जन्मस्थळ असल्याने आपले वैभव घेऊन उभा आहे. तर निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथील बरवे वाडा, लाखलगावातील वैद्यवाडा अन् निफाडच्या होळकर वाडा, स्वातंत्र्यवीर वी. दा. सावकरकरांची सासूरवाडी म्हणजे सिन्नरमधील नायगाव येथील चिपळूणकर वाडा, राजे क्षीरसागरांच्या वाड्याने आता देह ठेवला असून, थोडा चेहरा अन्‌ बुरज रूपातील गुडघा तेवढा उभा आहे. भगूरचा सावरकर वाडा व अभिनव भारत मंदिराची वाडारूपी इमारत आजही सशस्त्र क्रांतीची आठवण करून देताना दिसतात. महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मघर कष्ट करून जपल्याने ही वास्तू आजही वाडा संस्कृतीच्या विविध अंगांचे दर्शन घडविते. तर सरकार धोपावकरांचा व सरदार बलकवडे यांचा वाडा भगूरची शान होते. तर दोन हजार वर्षांपूर्वींची लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा घेऊन आजही पुढे जात असलेले गोवर्धन आपल्या अंगाखांद्यावर वाडासंस्कृती जोपसताना दिसते. तर पहिल्या महिला चरित्रकार लक्ष्मीबाई टिळकांचा जलालपूरमधील वाडा आता हरवला आहे. नाशिकमधील अनेक दिग्गजांचे ऐतिहासिक वाडे इतिहासाचे पान होऊ लागले आहेत. त्र्यंबकेश्वरमधील अनेक वाडे आजही आवर्जून पाहण्यासारखे आहेत. तर त्र्यंबकेश्वरमधून ब्रह्मगिरीवर जाताना वाटेत उजव्या हाताला लागणारा वाड्यासारखी दिसणारी दगडी वास्तू हाही विश्रांतीसाठी पेशवाईत साकारलेला वास्तुशास्त्राचा एक अनोखा नमुना आहे. अशा वास्तुंच्या संवर्धनाकडे आपले दुर्लक्ष झाल्याने हाती आहे पण किंमत नाही, अशीही अवस्था काही वाड्यांची झाली आहे.   
नाशिकच्या इतिहासाला लाभलेले यादवकालपासून पेशवेकाळापर्यंतही वाडा संस्कृतीचे अनोखे कोंदण आजही इतिहास अभ्यासकांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच भुरळ पाडते. वाड्यांचे बांधकाम, त्यातील कोरीव लाकूड काम, दुर्मीळ नक्षी, चित्रे, मंदिरे अन्‌ वाड्याचा साज दुर्मीळ होऊ लागला आहे. सुमारे चारशे-पाचशे वर्षांपासून नाशिकच्या वैभवातील संस्कृतीरूपी हा गारवा अज्ञात होईल की, काय अशी भीती कायम मनखिन्न करते अन्‌ आपण यासाठी काही करणार आहोत की नाही, असे स्वत:शीच विचारायला भाग पाडते. वाडे नाहीशे होतीलही पण, मनामनातूनही ‘ते’ अज्ञात होऊ नये म्हणून का होईना हा वैभव वारसा नव्या पिढीसाठी जोपासला गेला पाहिजे. तर नव्या पिढीनेही यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

-         रमेशायण / ८३८००९८१०७ 
https://rameshaayannashik.blogspot.com/

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकमध्येही हवं ‘मूर्तीचं वरकुटे’!

लकडी की काठी, काठी का घोडा!

काळाराम मंदिर सत्याग्रह : २ मार्च, काळाराम अन् रमेशायण!