शिस्त, मुंढे अन रमेशायण : एक विवेचन


शिस्त, मुंढे अन रमेशायण : एक विवेचन

शिस्त हा शब्द सध्या जरा जास्तच चर्चेत आहे. पण, शिस्त म्हणजे नेमकं काय? हे यानिमित्तानं पुन्हा विचार करायला लावणार आहे. कारण जर तुमच्यातील शिस्त समोरच्याला समजली नाही तर तुम्ही बेशिस्त होता. त्या बेशिस्तीला संतापी, प्रकोपी, रागीट या शब्दांमध्ये तुम्हाला बांधलं जातं अन् तुमच्या शिस्तीचं खोबर होतं. म्हणूनच आपली शिस्त म्हणजे नेमकं काय म्हणायचंय हे इतरांना समजून सांगणं गरजेच पडतं. अर्थात, जमजून सांगितलं म्हणजे पटतं असंही नाही पण, किमान आपली शिस्त बरोबर आहे हे आपल्याशी पक्क होतं. अनेकदा कामाच्या ठिकाणी, व्यवस्थापनांमध्ये, जगाच्या काळजीत अथवा आपल्या लहान मुलांना हाताळताना शिस्त हा विषय येतो. सध्या नाशिकमध्ये महापलिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यामुळे शिस्त हा शब्द अधिक चर्चेत आला आहे. खरं तर शिस्त इतरवेळी फारसी चर्चेत पहायलाही मिळत नाही. पण, अशा काही अधिकाऱ्यांमुळे ती पहायला मिळते किंवा आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात प्रसंगानरूप अनुभवत असतो. पुण्यात असताना अरुण भाटिया या आयएएस अधिकाऱ्याची शिस्त खूप जवळून पाहिली होती. त्यामुळे आपली शिस्त आपल्याशी किती पक्की असते, याचं गणितही उलगडताना मी पाहिलं आहे. उगाच अरुण भाटीयांना पुणेकरांनी निवडणून देण्यासाठी झटापट केली नव्हती अन् तेथील राजकारण्यांनी अमाप पैसे खर्च केले नव्हते. असो. भाटीया तेव्हा हरले का असेना पण, त्यांची शिस्तशीरपणा अजूनही माझ्या चांगलाच लक्षात आहे. यश अपयशही आपल्याला खूप काही शिकवत कारण आपल्यातील शिस्तीमुळेच शिकण्याची प्रक्रिया सतत सुरू असते. या शिस्तीचं हे शिस्तायण.. रमेशायणातून!    

शिस्त या शब्दाला इंग्रजीत discipline म्हटलं जातं. हिंदीमध्ये शिस्तीला तालीम तर उर्दूमध्ये तेहजीब (Tehzeeb تہذیب) असं म्हटलं जातं. या discipline ची व्याख्या ऑक्सफर्डवाल्यांनी अशी केली आहे. The practice of training people to obey rules or a code of behaviour, using punishment to correct disobedience. लोकांना शिकविताना आवश्कय गोष्टीमध्ये शिस्त असली तरी तीची सुरूवात आपल्यापासून झाली तरच ती पुढे देता येते. नाहीतर शिस्त फक्त हुकुमशाही होते अन् ती शिस्त नसतेच. सोईन खेळलेला खेळ असतो. ऑक्सफर्डच्या या व्याख्येला काही पुरक व्याख्याही आहेत. त्याही पाहू : Definition of discipline : 1 a : control gained by enforcing obedience or order; b : orderly or prescribed conduct or pattern of behavior; c : self-control; 2 : punishment; 3 : training that corrects, molds, or perfects the mental faculties or moral character; 4 : a field of study; 5 : a rule or system of rules governing conduct or activity; 6 obsolete : instruction यातील self-control ही व्याख्या मला भावते. कारण यातच तुमच्याच शिस्त मुरली आहे की नाही हे समजतं. जे इतरांना रूचत नाही. हा self-control म्हणजेच स्वत:वर मानसिक, अध्यात्मिक, आर्थिक, भौतिक, ऐहिक अन् देहिकदृष्ट्या नियंत्रण असेल तर तुमच्यात शिस्त आहे, असं म्हणायला हरकत नाही. यात आणखी एक गोष्ट जोडेल ती म्हणजे तुमचं समजून-उमजून बोलणं. त्यातील स्पोष्टोक्तेपणा अन् इतरांवर नियंत्रण मिळवून शिस्तीत काम करून घेण्याची हतोटी असेल तर शिस्त अधिक सुशिस्त होते. कोणत्याही भाषेचा अथवा संस्कृतीचा विचार केला तरी शिस्तीचा अर्थ अन् मर्म तेच राहतं. फक्त ती पाळायची कि, नाही या आपापल्या शिस्तीचा भाग असतो.

शिस्त आणि शिक्षा (punishment) यामध्ये सुतराम संबंध असू नये, असही म्हटलं जातं. हे अगदी खरं असलं तरी punishment हा शिस्तीच्या व्याख्येतील self-control सारखाच एक महत्त्वाचा घटक आहे. महत्त्वाचा यासाठी की, कृष्णलिला करणारा श्रीकृष्णालाही शिक्षा या प्रक्रियेतून जावे लागले आहे. तेथे आपण कोणं.. शिक्षा म्हणूनच श्रीरामाला वनवास भोगावा लागला आहे. सीतेला शिक्षा म्हणूनच दूरावा सहन करावा लागला आहे. सीतेने आत्मसर्मपण केल्यानंतर रामालाही दूराव्याची शिक्षा भोगावीच लागली आहे. शृर्पनिखेलाही तिच्या वागण्याची शिक्षा लक्ष्मणाने तिचे नाक कापून केली आहे. सीतेला पळवून देणाऱ्या रावणालाही रामाने शिक्षा केली आहे. आता येथे शिस्त अन् शिक्षा यांचा विचार केला तर थोडं उलट जावे लागेल. रामानं लोकांचं ऐकून सीतेच्या चारित्र्यावर संशय घेतला नसता तर सीता रामापासून दुरावली नसती. मात्र राम राजा असल्याने त्याने आपल्या पदाची शिस्त पाळली. सीतेनं आपल्या आत्म्याच्या हाकेची शिस्त पाळली अन् आत्मसर्मपण केलं. रावणाने बहिणीच्या अपमानाचा बदला या एकांगी विचारापोटी शिस्त पाळली, दशरथाने पत्नीच्या सांगण्यावरून मुलाला वनवासाला पाठविण्याची शिस्त पाळली, असं म्हटलं तर? मात्र कुठेतरी चुकतयं, असं वाटायला लागतं. सगळेच सगळ्याठिकाणी योग्य होते म्हणून रामायण घडलं असं म्हटलं जात असलं तरी कुठेतरी राजकारभार अन् शिस्त याच्यात फारकत निर्माण झाली म्हणून रामायण घडलं असं म्हणावं लागेल. म्हणजे राजा दशरथाने पत्नी कैकईचे भावनेच्या भरात जाऊन ऐकले नसते अन् राजकारभारातील शिस्त पाळली असती तर रामाला वनवासाला जावे लागले नसतं अन् लक्ष्मणाकडून शृर्प नखेचे नाक कापले गेले नसतं. बहिणीच्या चुकीच्या वागण्याला रावणाने भरीस घातले नसतं व एका राजाप्रमाणे निर्णय घेतला असता तर पुढे जे घडले ते घडले नसतं. रामाने सीतेवर संशय घेतला नसता तर जे पुढे घडले तेही घडले नसतं. म्हणजेच भावनेच्या भरात शिस्तीचा विचारजरी झाला तर गडबड होऊ शकते. त्यामुळे भावना अन् शिस्त एक करू नये, अन् त्यापोटी निर्णयही घेऊन नये हे रामायण अन् महाभारत यातून शिकण्यासारखं आहे. शिस्त आणि शिक्षा यामध्ये सुतराम संबंध असू नये, असे जरी असले तरी शिस्त पाळली गेली नाही की, तिचे परिणाम शिक्षेपर्यंत कसे जातात याला रामायण अन् महाभारत ही मोठी उदाहरणे आपल्यासमोर आहेत. महाभारतातील श्रीकृष्णच एकमेवपात्र शिस्त अन् राजधर्म पाळताना दिसतो, असे म्हणायला लागेल. शिस्त मोडणारा कालियामर्दनाच उदाहरणच पहा ना! शिक्षाही केली अन् शिस्तही लावली. तसेच रामायणातील सीता, हनुमान, लक्ष्मण अन् भरत (इतरही काही पात्रे असावीत याचे विवेचन मी येथे केलेले नाही.) ही पात्रही आपली भूमिका शिस्त अन् राजधर्म म्हणून पाळताना दिसतात. शिस्त आणि शिक्षा हे जरी एका परिभाषेतील नसतील तरी ते एकमेकांवर परिणाम करणारी आहेत, असे म्हणायला जागा आहे. असो. धर्मग्रंथांमध्ये ‘शिस्त’ हा शब्द फक्त शिक्षेच्या संदर्भात नव्हे, तर प्रामुख्याने मार्गदर्शन, शिक्षण आणि सुधारणूक यांच्या संदर्भात वापरण्यात आला आहे. दुर्व्यवहार किंवा क्रूरता यांच्याशी त्याचा मुळीच संबंध जोडलेला नाही, असं बायबलमधील नीतिसूत्रेही सांगतं.

तरीही शिस्त म्हणजे काय? हे समजून घेणे गरजेचं आहे. नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुण्यात असताना पुणे परिवहन मंडळाला लावलेली शिस्त ही ‘शिस्त’ या संकल्पनेत मोडते. आर्थिक उलाढालीच्या गोष्टी शिस्तीत झाल्या नाहीत की, तेथे भ्रष्टाचार होणे निश्चित समजले जाव. हेच ओळखून मुंढे यांनी तेथे लावली शिस्त योग्य, समर्थनीय अन् विश्वासार्यही होती. याचा पुणेकरांना फायदाच झाला; मात्र पुणेकर नेतेमंडळींना ना त्यांची शिस्त पचली ना कारभार. कारभार चांगला चालू लागला की नेते मंडळींचे महत्त्व कमी होणार यातून सर्वकाही फिसकटलं अन् पुणेकरांना मुंढेसारखा चांगला अधिकारी गमावण्याची मोठी किंमत मोजावी लागली. मात्र याचा एक चांगलाही परिणाम झाला. तो म्हणजे नाशिककरांचा त्यांच्या येण्याने फायदा होईल, अशी शक्यता निर्माण झाल्याचे दिसते आहे. तर आपण बघतो की लहानपणापासून आपल्याला शिस्त शिकवली जाते. म्हणजेच आपल्याला काही नियम सांगितले जातात आणि त्या नियमांचे पालन करणे म्हणजे शिस्त असे आपल्यात रूजवलं जातं. अनेकदा नियम परिस्थितीनुसार बदलत असल्याने परिस्थितीनुसार वागणे गरजेचे आहे अन् त्यानुसार आपल्यातील शिस्त या प्रक्रियेला पुढे घेऊन जाणे गरजेचे ठरते तेव्हाच शिस्तही प्रक्रिया शिस्तीत पार पडते. म्हणजेच शिस्त लावण्याची तुलना बागेत काम करणाऱ्या माळ्याशी केली तर तो रोपाची लागवड मुरमाड जागेत करत नाही. तो रोपाला वाढीला सोप जाईल अशी भुसभुसीत जमीन निवडतो. अनेकदा चांगली जागा मिळतेच असेही नाही. तरीही तो मुरमाड जागेत मोठा खड्डा घेऊन त्याच भुसभुशीत काळी माती भरून रोप लावतो. रोपाची मूळ परिस्थितीप्रमाणे मुरमाड जागेतही चांगली वाढतात. यासाठी माळी रोपाला नियमित खत घालतो. रोपाची त्याला न दुखावता छाटणी करतो. कमी वयात फळ येऊ नये म्हणून पहिल्यांदा येणाऱ्या फुलांनाही छाटून टाकतो. समंजस पालकही तेच करतात मुलांची काळजी घेणं, परिस्थितीप्रमाणे त्यांना उभं रहायला शिकवणं, पण काही वेळा त्यांना शिस्त लावताना चुकीच्या वागण्याकडे दुर्लक्ष न करता शिक्षा या माध्यमाचा वारप करून काय बरोबर काय चुकं हेही शिकवितात. त्यामुळे शिस्तसुद्धा प्रेमळपणे लावली जाते अथवा लावली जावू शकते. मात्र वर्षानुवर्षे महापालिका आस्थापनेत काम करताना अधिकाऱ्यांना ड्रेसकोड माहीत नसेल तर आयुक्त मुंढेंनी जे काही दाखवलं तेही शिस्तीच! आयुक्त मुंढे महापालिकेत ही शिस्त पाळली जाईल अन् ते गेल्यानंतर कालांतराने या शिस्तीला सुरूंग लागेल. मग ही शिस्त आयुक्त मुंढेंनी कायम रहावी, यादृष्टीने काही केलं असतं तर त्यांनी लावलेला शिस्तीला शिस्त म्हणता आले असतं. पण, त्यांनी काय करायला हवं हेही सांगायला हवं नाही का? शिस्त लावण्याच्या बाबतीत यहोवा देवाने (महापालिकेत देव चालत नाहीत हे मला माहीत आहे, पण विचार अन् त्यांच्या नावाने आलेला निधी चालतो.) उत्कृष्ट उदाहरण मांडलं आहे ते म्हणजे ‘त्याची शिस्त इतकी प्रभावशाली व उत्तम आहे, की पृथ्वीवरील त्याच्या आज्ञाधारक उपासकांना ती “प्रिय” वाटू लागते. (नीतिसूत्रे १२:१) त्याचे उपासक त्याची शिस्त सोडून देत नाहीत, तर ती “दृढ धरून” ठेवतात. (नीतिसूत्रे ४:१३) शिस्त लावण्याच्या देवाच्या पद्धतीची तीन प्रमुख वैशिष्ट आहेत. तो (१) प्रेमळपणे, (२) योग्य प्रमाणात व (३) स्तर न बदलता शिस्त लावतो. त्यांचे अनुसरण केल्यास शिस्त स्वीकारली जावू शकते. ड्रेसकोडमध्ये यापुढे न येणाऱ्यांचा त्या दिवसाचा पगार कामला जाईल, अशी प्रशासकीय तरतूदच त्यांनी करून ठेवायला हवी होती. म्हणून ते नसतानाही ही शिस्त मोडण्याचा प्रयत्न कोणी केला नसता. आता येथे शिक्षेचा धाक आला. अशी तरतुद असेलही मात्र ज्याच्या हाती शेती तोच खातो माती! त्यामुळेच काही गोष्टी पाठीत धपाटा टाकल्याशिवाय होतच नाहीत. अहिराणीत अशांसाठी एक सर्मपक म्हण आहे,‘माले नाही आब्रू, मी कसाले घाबरू! खरेतर आपल्या आजूबाजूच्या असलेल्या लोकांवर प्रेम केलं की, आपल्याकडून अपेक्षित शिस्तही समोरचे स्वीकारतात, अशा पद्धतीनेही अनेक आयएएस अधिकाऱ्यांनी शिस्त लावून त्या शहराचं भलं करण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात शिस्त त्या शहराला किती पोषक आहे अन् त्या शहराच्या विकासासाठी किती गरजेची आहे हे समजून महापालिका निर्णय घ्यावा असे वाटते. येथे मुद्दाम मी सर्व जबाबदारी आयुक्त मुंढे यांच्यावर टाकलेली नाही. कारण ते कितीही कठोर निर्णय घेवोत त्यांच्या शिस्तीला पुढाऱ्यांनी अन् त्यांच्याच अधिकाऱ्यांनी सकारात्मकदृष्टीने पाहिले नाही तर नाशिक शहराच्या विकासाचा गोंधळ पहायला मिळेल. आर्थिकशिस्त महापालिकेत गरजेचीच आहे; पण नाशिककरांना नेमकं काय हवं हेही महापालिकेनं समजून घ्यायला हवं, नाही का? शिस्त या विवेचनात महापालिकेची उदाहरणे मुद्दामच घेतो आहे कारण सध्या त्यांच्यामुळेच शिस्त हा मुद्दा चर्चेत आला आहे.

भावनांवर नियंत्रण ठेवून प्रेमळपणे लावलेल्या शिस्तीमुळे सहसा चांगले परिणाम घडून येतात. मुलांना शिस्त लावताना त्याला काय चांगलं आणि काय वाईट हे माहित नसतं. त्यामुळे अगदी चांगलं म्हणजे काय वाईट म्हणजे काय हे शिकविल्यानंतरच तु केलेली गोष्ट चांगली वाईट सांग आता? असं आपण त्याला विचारतो अन् ते निरागस मुल ‘बरोबर’ उत्तर देतं. याचा अर्थ ते पुन्हा चुकत नाही, असही नाही. चुकणं अन् पुन्हा बरोबर शिकण ही त्याची प्रक्रिया बराच काळ म्हणजे त्याच्या शेवटपर्यंत सुरू असते. पण बालपणी त्याचा हात हात घेऊन त्याच्यात रूजविलेली गोष्ट फक्त त्याला शिस्तच शिकवत नाही तर झालीच चुक तर ती चुक दुरूस्त करायचा मार्ग काढायला एक समंजसपणाही शिकवितं आणि समंजसपणा म्हणजेच एक सशक्त शिस्त होय. पण शिस्त नाकारण्यामागे जेव्हा आर्थिक स्वार्थ असतात तेव्हा ‘मोठा घरना पोकळ वासा, एक मासा अन् हंडाभर रसा’ असं म्हणण्याची वेळ येते. त्यामुळेच शिस्तीचा हा उहापोह अनेक स्थरावर आपल्याला घेऊन जाते. शिस्तीत वागणारे अनेकांना माथेफिरू, तापट, रागीट, संतापी वगैरे वगैर वाटत असले तरी समाजात शिस्त पाळणारे काही लोक आहेत त्यामुळे हा संसार सुरू आहे. सगळेच बेशिस्त झाले तर संसाराचा गाडा कधी सुरळीत चालणार नाही, हे समजून घ्यायला बुद्धी लागत नाही. लागते ती फक्त शिस्तच!

- rameshaayan
8380098107

टिप्पण्या

  1. कोणत्याही ऑर्गनायझेशन मध्ये जेव्हा स्वयंप्रेरीत कर्मचारी वर्ग असतो तेव्हाच उत्कृष्ट काम होते. शिस्त ही स्वयंशिस्थ असावी, दुसर्याने लादलेली नव्हे. स्वयंशिस्थ ही स्वयंप्रेरीत कर्मचाऱ्यात आपोआप येते. नुसती कडक नियम करून अथवा जागेवर नोटोसाकाढुन, धारेवर धरून शिस्त लावण्याचा प्रयत्न केल्यास कर्मचारी प्रेरित होत नाहीत तर भीतीखाली दाबले जातात ज्याचा परिणीती उद्रेकात अथवा बंडात होते. जर आपल्याला कर्मचाऱ्यानी चांगले काम करावे असे अपेक्षित असेल तर त्यांना सहकारी समजून त्यांच्यात स्वयंप्रेरणा जागवली पाहिजे. स्वयंप्रेरीत माणसाला शिस्तिचा बडगा लागत नाही. हाच नियम कुटुंबा साठी सुद्धा लागू आहे. आपल घर असो की शाळा परिसर स्वछ ठेवणे हे स्वयंप्रेरनेणे झाले पाहिजे, तर ती प्रत्येक मुलाला जबाबदारी वाटते नाही तर सफाई करणे शिक्षा वाटते. तसेच कर्मचाऱ्याचे सुद्धा आहे. स्वयंप्रेरित कर्मचारी वर्ग निर्माण करण्यासाठी आधुनिक व्यवस्थापन मध्ये अनेक मार्ग आहेत त्याचा अवलंब करता येईल, नुसता सरसकट अधिकार आणि शिष्त गाजवून फक्त विरोध आणि बदली होईल. शेवटी नुकसान शहराचे, नागरिकांचे होणार नसून आपल्या कर्तव्याचे सुद्धा होणार आहे हे जेव्हा वाटेल तेव्हा स्वतः मुंढे साहेब स्वयंप्रेरित होऊन कामाला लागले असे म्हणता येईल.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकमध्येही हवं ‘मूर्तीचं वरकुटे’!

लकडी की काठी, काठी का घोडा!

काळाराम मंदिर सत्याग्रह : २ मार्च, काळाराम अन् रमेशायण!