गोदावरीचा जन्मोत्सव!
गोदावरी पृथ्वीवर प्रगटली तो दिवस गोदावरीचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. यंदा गोदा जन्मोत्सव २७ जानेवारीला आहे. त्यापूर्वी दहा दिवस अगोदरपासून गोदादशहरा साजरा केला जातो. मात्र, गोदेची सध्याची स्थिती लक्षात घेऊन गोदावरी जन्मोत्सव लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.
रमेश पडवळ
8380098107
8380098107
गोदावरी ही देशातील एक ज्येष्ठ नदी आहे. ‘नदीचं मूळ अन् साधूचं कूळ शोधू नये,’ असं म्हंटलं जातं. मात्र, आपल्या जगण्यातील अविभाज्य भाग असलेली नदी नेमकी कधी जन्माला आली याबाबत प्रत्येकाला जिज्ञासा असतेच असते. लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीच्या निर्मितीप्रक्रियेतील एक घटक असलेल्या या नदीने जन्म घेतला अन् तिने मानवसंस्कृतीला आपल्या काठावर जीवन दिलं. म्हणूनच गोदावरीला जीवनदायिनी म्हटलं जातं. काठावरील लक्षावधी हेक्टर जमीन सुजल-सुफल करीत ती बंगालच्या उपसागराकडे झेपावते. तिच्या या सर्वसमावेशक गुणामुळेच तिच्या अवतीभवती प्राचीनकाळापासून मानवी संस्कृती विसावली अन् विकसित झाली. उपलब्ध साधनांनुसार, गोदावरीचं गारूड अगदी दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहनांवरही पहायला मिळतं. सातवाहन राजा हाल याने सप्तशतीमध्ये गोदावरीवर लिहिलेल्या कवनांमुळे ही नदी किती रम्य होती हेही लक्षात येते. सातवाहनांनी गोदेचं केलेलं वर्णन उगाच नव्हतं. गोदावरी हीच आपली पोषणकर्ती आहे हे त्यांनी ओळखलं होतं. सातवाहनांनंतर लिहिली गेलेली विविध पुराणही हेच सांगतात. इ.स.पूर्व ३०० च्या दरम्यान म्हणजे आजपासून २३०० वर्षांपूर्वी गोदावरीचा उल्लेख बौद्ध धर्मग्रंथ त्रिपीटकामध्येही मिळतो. यावरून या प्राचीन संस्कृतीने गोदावरी काठावर, तिच्या आधारावर स्वत:ला विकसित केल्याचं स्पष्ट होतं.
धार्मिक ग्रंथ, पुराणं अन् अख्यायिकांतून गोदावरीच्या प्रगट कथा आपण ऐकतो. गौतम ऋषींनी पापातून मुक्त होण्यासाठी शिवाकडे केलेला धावा अन् गोदावरीने पृथ्वीवर येण्यास दिलेल्या नकारानंतर शिवाने ब्रह्मगिरीवर जटा आपटून केलेले गोदाअवतरण ही पुराणातील कथा लोकप्रिय आहेच. गोदावरी नेमकी कधी पृथ्वीवर आली हे पुराण तिथीच्या आधाराने नेमकी माहिती देताना दिसतात. गोदावरी पृथ्वीवर आली तो दिवस माघ शुद्ध दशमी होती, असे पुराण सांगते. या तिथीनुसार यंदा गोदावरीचा प्रगट दिन म्हणजेच जन्मोत्सव २७ जानेवारी रोजी आहे. काही नोंदीनुसार गोदावरीचा जन्मोत्सव साजरा करण्याची खूप जुनी परंपरा आहे. गोदेच्या जन्मोत्सवापूर्वी प्रतिपदेला म्हणजेच दहा दिवस आधी गोदादशहरा हा दहा दिवसांचा विविध उपक्रमांनी भरलेला महोत्सव त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये पूर्वी जल्लोषात साजरा व्हायचा. आताही तो प्रथेप्रमाणे काही उपक्रमांसह साजरा केला जातो. मात्र हा गोदादशहरा काही लोकांपुरताच मर्यादित असून, त्याला लोकाभिमुख रूप मिळायला हवे. गोदावरीची सध्याची स्थिती पाहता जनजागृतीसाठी या सोहळ्याचा उपयोग योग्य पद्धतीने केला जाऊ शकतो. याला नाशिकच्या उत्सव संस्कृतीचा भाग करण्याची गरज आहे. उत्तर भारतात गंगेकाठी जेष्ठ महिन्यात गंगादशहरा आजही जल्लोषात साजरा होतो. गंगेला मानणाऱ्या लोकांनी तो सांभाळला अन् वाढविला म्हणून तो टिकलेला अनुभवायला मिळतो. आजही या दहा दिवसांच्या काळात धार्मिक लोक आंघोळीच्या पाण्यात चमचाभर गंगाजल टाकून आंघोळ करून गंगास्नान केल्याचे समाधान मानतात. जे गोदेकाठी अथवा अन्य कुठल्याही नदीकाठी राहणारे लोक ते त्या दहा दिवसात गंगेचे नाव घेऊन स्थानिक नदीत आंघोळ करतात. अशाप्रकारे गंगा जनमानसात गंगादशहरा रुजलेला दिसतो. दुर्दैवाने या सोहळ्याकडे फक्त धार्मिक अंगाने पाहिले गेल्याने एखाद्या नदीच्या जन्मोत्सवानिमित्त पूर्वी आदर, सन्मान अन् तिची निगा राखण्यासाठी किती विचार केला जायचा या साजऱ्या होणाऱ्या सोहळ्यापासून दिसते. त्यामुळेच गोदादशहरा तसेच जन्मोत्सवाची संकल्पना साधारण दोन हजार वर्षांपूर्वीपासून रूजल्याचे दिसते. नदीला धार्मिक महत्त्व देण्याचे कारण म्हणजे तिच्यावर मानवी जीवन अवलंबून आहे. आपण तिच्याकडून समृद्धी घेतो पण, तिला आपण काय देतो याचा कधीतरी विचार करायला हवा. अशा निमित्ताला तिला काही द्यायला (कचरा, निर्माल्य, सांडपाणी नव्हे!) हवं. यासाठी काही निमित्त योजले गेले अन् दहशरा हे देखील असचं एक निमित्त आहे. या दहा दिवसात लोकांनी गोदेच्या दर्शनासाठी नदीकाठावर नदीला भेटायला यावं, तिच्याशी संवाद साधावा अन् तिला दीर्घायुष्य लाभेल यासाठी विचारमंथनाने जगण्यातील बदल स्वीकारावेत हा याचा उद्देश असतो. मात्र या सोहळ्यांबाबत फारसे कोणाला माहित नाही अन् या हेतूने कोणी यात सहभागी होताना दिसत नाही.
ज्येष्ठ गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरीच्या जन्मोत्सवाची तारीख ही तिथी प्रमाणे काढली जाते. ती निश्चित स्वरूपात नसते. गोदा पृथ्वीवर आली त्या माघ शुद्ध दशमी दिवसांत कोणताही पाऊस पडत नाही. तरीही या नदीचा जन्मोत्सव कसा साजरा करावयाचा? यामागे एक शास्त्रीय कारणही आहे. आपल्याकडे वैशाख किंवा जेष्ठ या महिन्यांत पावसाला सुरूवात होते. त्यावेळेस जे खराब पाणी येते, त्यांस नदी ‘रजस्वाला’ झाली, असे मानले जाते व ते पाणी पिण्यास अयोग्य मानतात. तेव्हापासून बरोबर नऊ महिने नऊ दिवसांनी माघ महिन्यांत नदीचा जन्मोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. म्हणून या थंडीच्या दिवसांत पाऊस नसताना जन्मोत्सव साजरा केला जातो. हे शास्त्रीय कारण समजून घेतल्यावर आपण मानवाप्रमाणेच जीवन जगणाऱ्या गोदावरीला मानवाचा दर्जा तिला द्यायला नको का? नदीच्या हक्कांबाबत माणसामध्ये जनजागृती करून द्यायला नको का? यासाठीच पुराणांमध्ये जन्मोत्सवाची परंपरा आखली गेली असेल, असे वाटते. माणसाचा जसा जन्म होतो तसाच नदीचाही होतो अन् तिच्याकडे दुर्लक्ष झाले, तिच्या संवर्धनासाठी पुरेशी काळजी घेतली गेली नाही तर नैसर्गिक प्रकोप म्हणा अथवा मानवाच्या चुकीच्या जगण्यामुळे नदीलाही मृत्यूच्या क्षणांचा सामना करावा लागतो अथवा त्यांना गटारींचं स्वरूप येते. हे सर्व आपली नदी कशी आहे हे पाहिल्याशिवाय, तिचे महत्त्व जाणल्याशिवाय अन् गोदावरीवर जगणाऱ्या माणसाने तिच्या काठी येऊन तिच्याबद्दल प्रेम व्यक्त केल्याशिवाय तिची आयुष्यवृद्धी कशी होर्इल? नदी ही जननी, माता असेल तर तिच्या सेवेसाठी थोडावेळ काढायला नको का? तिच्या सध्याच्या अवस्थेकडे स्वार्थी झालेला माणूस आत्मियतेने पाहत नसल्याने मरणोप्रायतेकडे प्रवास करत असलेल्या नदीला तिच्या जन्मोत्सवानिमित्त वाचविण्यासाठी तिच्याशी पुन्हा नाते जोडायला नको का? असे अनेक प्रश्न गोदावरीच्या जन्मोत्सवानिमित्त पुढे येतात अन् यायला हवेत. याची उत्तरे फक्त गोदावरीच्या जन्मोत्सवात रामकुंडावर अथवा त्र्यंबकेश्वरमध्ये महापूजा, अभिषेक, गोदेचे माहात्म्य गावून मिळणार नाहीत. तर याबरोबरच हा जन्मोत्सव शाळा-शाळांमध्ये पोहचवून गोदावरीनदीबाबत जनजागृती करण्याची वेळ आली आहे.
पुन्हा एक मोठा प्रश्न उभा राहतो की, नदी काही एका धर्माची नाही अथवा तिनं कधी काळा-गोरा, लहान-मोठा अथवा गरीब-श्रीमंत असा भेदभाव केलेला नाही. प्रत्येक धर्मात नदीला पुज्यच मानले गेले आहे. म्हणूनच ती कोणताही भेद न ठेवता सर्वांना मुक्तहस्ते देत असते. घेणाराही घेत असतो. त्यामुळे गोदावरीचा जन्मोत्सव म्हटलं की, फक्त एका विशिष्ट धर्मानं अथवा जातीनचं तो साजरा करावा, असंही काही नाही. त्यामुळे गोदेच्या या जन्मोत्सवाला ‘गोदावरी डे’ म्हणून मान्यता मिळाली पाहिजे. तेव्हाच हा दिवस साजरा करण्यामागील हेतू इतर धर्मियांमध्येही रूजविता येर्इल. भारतातील ज्येष्ठ नदी अन् दक्षिणेतील गंगा असल्याने गोदावरीच्या जन्मोत्सवाला ‘गोदावरी डे’ म्हणून मान्यतेसाठी प्रयत्न व्हायला हवेत. याशिवाय शाळा, कॉलेजसमध्ये जन्मोत्सवानिमित्त ‘गोदावरी डे’ साजरा व्हायला हवा. मुलांना आपली नदी कशी आहे. तिचे माहात्म्य काय, ती संपली तर आपले काय होर्इल अन् तिला समृद्ध केलं तर आपण समृद्ध कसे होऊ, हे सांगण्याची त्याची जाणीव करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र मुळात २७ जानेवारीला गोदावरीचा जन्मोत्सव आहे हेच नाशिककरांपर्यंत माहीत नसल्याचे दिसते. प्रशासनही त्यासाठी काही करताना दिसत नाही. हा सोहळा विस्मरणात जाण्यापूर्वी त्या सोहळ्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्यावर अॅक्शन प्लॅन आखण्याची गरज आहे. तरच गोदाजन्मोत्सवाचा आनंद अन् नदी जगविण्यासाठीच्या चळवळीला बळ मिळेल. हर हर गोदे!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा