वेशीवरच्या पाऊलखुणा : निंबाईत : रमेश पडवळ

वेशीवरच्या पाऊलखुणा : निंबाईत : रमेश पडवळ

नारोशंकरांचे निंबाईत

वेशीवरच्या पाऊलखुणांनी गेली दोन वर्षे नाशिकच्या ज्ञान-अज्ञात इतिहासावर प्रकाश टाकला. हा धांडोळा आपल्याला इतिहासाच्या पानांमध्ये घेऊन जातो. इतिहास नेहमी आपल्याला पुढे जायला शिकवितो हेच ध्येय ठेऊन पाऊलखुणांचा प्रवास सुरू राहिला. शूर सरदार राजेबहाद्दर नारोशंकर यांचे ‘निंबाईत’ हे गाव या वेशीवरच्या पाऊलखुणांच्या प्रवासातील शेवटचे पुष्प…
रमेश पडवळ

ramesh.padwal@gmail.com
8380098107
इतिहासाच्या पानांमध्ये जयपराजयाच्या अनेक कथा वाचायला मिळतात. खरेतर इतिहासातील हा प्रवास आपल्याला खूप काही शिकवितो. त्यातून पुढे पुढे जात राहण्याची अन्‌ समृद्ध होण्याची उर्मीही मिळते. नाशिकचा इतिहास अशाच रोमांचकारी व्यक्ती, घटनांनी अन्‌ अजबगजब किश्श्यांनी ओतप्रोत भरलेला आहे. त्यांच्या पाऊलखुणा आपण अनुभवतो आहोतच. नाशिकला लाभलेल्या पेशव्यांच्या अनेक सरदारांपैकी सरदार नारोशंकर राजेबहाद्दर ऊर्फ दाणी हे नाव नाशिकला नारोशंकरांच्या मंदिरामुळे म्हणजेच रामेश्वर मंदिरामुळे अधिकच परिचित आहे. चिमाजी आप्पांनी पोर्तुगीजांकडून वसईचा किल्ला जिंकून घेतला. या लढाईत राजेबहाद्दर नारोशंकरांनी या विजयाचे प्रतीक म्हणून पोर्तुगीजांची काशाची घंटा रामेश्वर मंदिराच्या समोर लावली. या घंटेला नाशिककर नारोशंकराची घंटा म्हणूनच ओळखतात. ही घंटा म्हणजे नाशिकच्या इतिहासाचे एक सुवर्णपानच ठरली आहे. नारोशंकरांनी मालेगावात बांधलेल्या भुईकोट किल्ल्याने तर इंग्रजांशी लढताना इतिहासच घडविला. मात्र, दिल्ली गाजवून नाशिकमध्ये आलेले सरदार नारोशंकर आधी कुठे स्थिरावले असतील तर याचे उत्तर आपल्याला मिळते ते निंबाईत (निंबायत) या गावात. या गावाने नारोशंकरांचा इतिहास अनुभवला आहे. हे गाव निंबाईत ते मालेगाव किल्ला असा एक प्रवास उलगडते.
मुंबई-आग्रा महामार्गावर मालेगावपासून दक्षिणेला १२ किलोमीटरवर निंबायत गाव आहे. हे ठिकाण मोगल आणि मराठ्यांच्या कारकिर्दीत फार महत्त्वाचे होते. याचे जुने नाव नेअमताबाद असे होते. निंबायतला
निंबाईत असेही म्हटले जाते. निंबाईतला न्यायताबाद असेही म्हटले गेले आहे. येथे न्याय देण्याचे काम चालत असावे म्हणून गावाला न्यायताबाद असे नाव पडले व पुढे मुस्लिम राजवटीत नेअमताबाद असे म्हटले जाऊ लागले. पेशवाईत खान्देश सुभ्या अंतर्गत ६ सरकार व त्यांतर्गत १२० परगणे होते. यातील सरकार गाळणा अंतर्गत निंबाईत हा एक परगणा होता. निंबायत परगण्यात अंतर्गत वीसएक गावे होती. निंबाईत हा परगणा नारोशंकराच्या जहागिरीपैकीच एक. मालेगाव किल्ला बांधण्यापूर्वी त्यांनी येथे एक गढी (वाडा) बांधून वास्तव्य केले होते. या वाड्याची लांबी रुंदी अडीचशे फूट होती. भिंती मातीच्या अन्‌ दहा फूट रुंद आणि वीस फूट उंच होत्या. भिंती व वाड्याच्या दरवाजाचे काही अवशेष आजही गावात पहायला मिळतात. हा वाडा नंतर १९५९ दरम्यान राजेबहाद्दर घराण्याने एका शेतकऱ्याला विकला, अशी नोंद डॉ. इलियास सिद्दीकी यांनी आपल्या पुस्तकात केली आहे. निंबाईतीत एक लहानसा मातीचा किल्लाही (गढी) होता. सरदार महजदार खान तेथे राहत असे. किल्ल्याचे अवशेष आजही गावात आपल्याला पहायला मिळतात. त्याला काळाकोट म्हटले जायचे. पूर्वी वेसकोटात वसलेले एक समृद्ध गाव होते. एकदा नारोशंकरांच्या घराचे पावसामुळे अथवा आगीमुळे नुकसान झाले असावे म्हणून त्यांनी पेशव्यांकडे मालेगावात वाडा बांधण्याची परवानगी घेतली व सध्याचा किल्ला बांधून काढला. त्यानंतर नारोशंकर कायमचे मालेगावात स्थलांतरीत झाले. तोपर्यंत ते नेअमताआबाद (निंबाईत) मध्येच रहायला होते. त्यांच्या वाड्यातील भुयार, विहीर व अनेक अख्यायिका आजही हा वाडा डोळ्यापुढे उभा करतात, असे महावीर आहिरे, समाधान आहिरे, भरोसा आहिरे सांगतात.
गावात प्रवेश करताना चाँदशाह वलींचा छिल्ला, पीर व जामा मशीद पहायला मिळते. पेशवाई अगोदर हा प्रदेश निजामाच्या अधिपत्यात १७६० पर्यंत असल्याची नोंदही मिळते. १६३२ मध्ये शहाजी राजे भोसले यांनी हा प्रदेश आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी निंबाईतीला निजामशहाचा अधिकारी महजदार खान हा प्रमुख होता, अशी नोंद डॉ. जी. बी. शहा यांच्या मध्ययुगीन खान्देश या पुस्तकात मिळते. पुढे महजदार खान याने शहाजी महाराजांच्या सैन्याच्या तळावर छापा घातला. हा छापा वैजापूर येथे घालण्यात आला. तेथेच शहाजीराजांची पत्नी तुकाबाई (शिवाजी महाराजांची सावत्र आई) आणि मुलगी पकडली गेली व त्यांना निंबायती व पुढे गाळण्याच्या किल्ल्यावर ठेवण्यात आले. गाळण्याच्या जफरबेगबलुच नावाच्या किल्लेदाराच्या हवाली त्यांना करण्यता आले. तेथे त्यांना सहा महिने ठेवले होते. पुढे इ. स.१६३३ मध्ये तुकाबाईच्या भावांनी (मोहित्यांनी) खंडणी दिली आणि त्यांची सुटका केली, असा संदर्भही इतिहासाच्या पानांमध्ये मिळतो.
पेशव्यांच्या सरकारी फौजेने निंबाईत गाव लुटले तेव्हा येथील कमाविसदार नरसिंग विठ्ठल याने पेशव्यांकडे तक्रार केली की, फौजेच्या लुटीमुळे रयतेचे नुकसान झाले आहे. तेव्हा ते भरून काढण्यासाठी त्यांना तगाई दिली पाहिजे. पेशव्यांनी नरसिंह विठ्ठल याला १० हजार रुपये तगाई तूर्त आपल्याजवळील शेतकऱ्यांना द्यावी व नंतर ती त्यांच्याकडून वसूल करून घ्यावी म्हणून आज्ञा केल्याचे दिसते. पेशव्यांनी गिरणा नदीवर बांध बांधला व पाटाने निंबाईत व परिसरातील गावांना पाणी दिले. गावाला पाटाचे पाणी आल्याने येथे १७८४-८५ मध्ये मोठ्या क्षेत्रात उसाची लागवड केली होती. यावरून निंबायतीचे महत्त्व अधोरेखित होते. मात्र सध्या निंबायती पाण्यासाठी आसूसले आहे, असे ग्रामस्थ सांगतात.
निंबायतीचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे हनुमान मंदिरामागील पायऱ्यांची यादवकालीन बारव व नष्ट झालेल्या मंदिराचे अवशेष व मूर्ती. हे पाहताना मन हरवून जायला होते. हा वारसा जपण्याची गरज आहे. हनुमान मंदिरापासून घोडेपीराकडे जाताना पीराच्या डाव्या हाताला एक दगडी शिळा आहे. ही शिळा पांढऱ्या चुन्याने रंगविण्यात आली आहे. त्यामुळे त्यावरील अक्षरे वाचता येत नाहीत. मात्र हा दगड दिशा दाखविण्यासाठी बसविण्यात आलेला होता, असे दिसते. गाळणा, दौलताबाद याकडे जाण्याचे मार्ग यावर निर्देशित होते. ही सोय निजामशहाच्या काळात केली गेली होती. गावात घोडेपीर व खंडोबा या दोन यात्रा उत्साहात होतात. विशेष म्हणजे हिंद-मुस्लिम बांधव एकत्र येऊन यात्रा करतात, असे मौलवी निहाल अहमद सांगतात. बोहाडे ही परंपरा गावाने अजूनही कायम ठेवली आहे. विशेष म्हणजे अक्षयतृतीयेला व खंडोबा यात्रेत बोहाडे नाचविले जातात, असे ज्येष्ठ ग्रामस्थ समाधान आहिरे सांगतात.
महजदार खानाची गढी, नारोशंकरांचा वाडा, यादवकालीन मंदिर व बारव यांचे आज फक्त अवशेषच निंबाईतीत पहायला मिळतात. मात्र वेशीवरच्या पाऊलखुणा घेऊन पुढे जात असलेल्या इतिहासाच्या आठवणी मात्र अजूनही ग्रामस्थांच्या मनात ताज्या आहेत.
(समाप्त)

ramesh.padwal@gmail.com
8380098107

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकमध्येही हवं ‘मूर्तीचं वरकुटे’!

महापालिकेची नको; माणुसकीची भिंत उभारा

काळाराम मंदिर सत्याग्रह : २ मार्च, काळाराम अन् रमेशायण!