सोलापूरी शिलालेखांना आकार देणारा ‘कुंभार’

शहरांच्या समृद्ध पाऊलखुणा

सोलापूरी शिलालेखांना आकार देणारा ‘कुंभार’

नावात काय असतं, असं आपण नेहमीच म्हणतो. माणसाचं नाव आंधळे असलं म्हणजे तो व्यक्ती अंध असेलच असे नाही अन् एखाद्याचे नाव डोळस असले म्हणजे त्याला सर्व पाहता येईलच असेही नाही. पण एखाद्याच्या नावात आनंद आणि कुंभार या दोन्ही गोष्टी असतील अन् त्या तंतोतंत व्यक्तीमत्त्वाला लाभलेल्या असतील तर? या पेक्षा अधिक काय हवं, नाही का? प्रत्येक शहराला आनंदीपण देणारी अनेक व्यक्तिमत्त्वे असतात. त्यातील काही ज्ञात तर काही अज्ञात असतात. व्यक्तीच नव्हे, तर वास्तू, खाद्यपदार्थदेखील एखाद्या शहाची वेगळी ओळख निर्माण करताना दिसतात. असचं आनंदीपण सोलापूरलाही लाभले आहे. विशेष म्हणजे ते चालतं बोलतं आहे. मनापासून आनंदी असलेले आणि शिलालेखांचे डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे आनंद कुंभार मनाला भावतात… ठाव घेतात... अन् आपल्यातील ऊर्जेला, अभिमानाला जागे करतात. पण त्यांच्यातील ऊर्जा फक्त आपल्याला चार्जच करत नाही, तर आपल्यात दडलेला अहंम भाव झटकून कामाला लागा असे सांगतात. म्हणूनच नावाप्रमाणे ते कुंभाराचे कामही अगदी सहजपणे करतात. इतिहास संशोधन करण्याचे इच्छा बाळगणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांना आनंद देणाऱ्या या माणसापर्यंत पोहचण्याचा माझा प्रवासही वेगळाच होता. शिलालेखांसाठी झटणारे त्यांचा अर्थ शोधून त्यांना खऱ्या अर्थाने आकार देणाऱ्या आनंद कुंभार सरांच्या प्रवासाविषयी…
रमेश पडवळ
Mob. 8380098107
सोलापूर कसं आहे? … या प्रश्नाचं उत्तर माझ्यासाठी साधं सोप होतं.. ते म्हणजे चंदेरी प्रकाशाचं शहर. रात्री आठ वाजता नाशिकमधील मुंबई नाक्यावरून गाडी पकडायची अन् सोलापूर गाठायचं. दिवसभर काम उरकून पुन्हा रात्री आठची गाडी पकडायला सोलापूरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील ट्रॅव्हल कंपनीच्या दुकानांसमोर उभं रहायचं. हाच काय तो निवांत वेळ मनाला वेगळ्या दुनियेत घेऊन जातो. महाराजांच्या पुतळ्या अवतीभवती चंदेरी प्रकाशाचे लख्ख दिवे लागलेले असतात. त्यामुळे हा गजबजलेला चौक मला चंदेरी प्रकाशाने सजलेला वाटू लागायचा. म्हणून मी सोलापूरला चंदेरी प्रकाशाचं शहर असं नाव दिलं आहे. हा प्रकाश मला खुणावतं होता.. हे खुणावणं मी पुण्यात असताना नाशिक जसं खुणावतं होतं तसंच होतं…
नाशिकमधील एक शिलालेख मला खूप त्रास देत होता. त्याचं गुपित काही मला उलगडत नव्हतं. भल्ल्याभल्यांना विचारून झालं पण लालफितीचा कारभाराचा अनुभव आला. एकदा सोलापूरच्या इतिहासवेड्या नितीन अणवेकर या तरुणाचा मला फोन आला. तोही झपाटलेला होता हे त्यांच्या आवाजाच्या पक्क्या सोलापूरीशैलीतून जाणवत होतं. मग आमची फेसबुकवर मैत्री झाली. अणवेकर माझ्या शिलालेखाची चावी ठरला. शिलालेखांवर अभ्यास करणारे एक अनोखे व्यक्ती सोलापूरात असल्याचे त्यांनी सांगितले अन् हे त्यांनी मला का सांगितलं असावं असं काही वेळ वाटून गेलं. तो दुवा होता. ‘त्यांच्याशी बोलता येईल का?’ असं म्हटल्यावर ‘हो.. पण त्याचं वय अधिक आहे. मी त्यांच्या घरी जाऊन फोन लावून देतो’ असं नितीन म्हणाल्यावर दुसऱ्या दिवशी आनंद कुंभार यांच्याशी थोडं बोलणं झालं. माझ्या अडचणीवर त्यांनी एका झटक्यात उत्तर दिलं अन् तेथचं ते उत्तर मिळालं हा झाला त्यांच्या अनेक वर्ष काम करत राहण्यातील अनुभवाचा दाखला. ते कोण आहेत, शिलालेखांबद्दल ते इतकं कसं काय जाणतात? असे अनेक प्रश्न त्यानंतर मनात पिंगा घालत राहिले. नुकत्याच सोलापूरच्या भेटीत त्यांना भेटायचं ठरवलं अन् पुन्हा नितीन अणवेकर यांच्या मदतीने आनंद कुंभार सरांची भेट ठरली.
सोलापूरच्या किल्ल्यासमोरून नितीन अन् मी ठरलेल्या वेळी त्यांच्या घरी निघालो. नितीन त्यांच्याबद्दल भरभरून सांगत होता. सोलापूर पूर्व भागातील बोल्ली मंगल कार्यालयजवळील अशोक चौक परिसरातील एक गल्लीत आनंद कुंभार सरांचं घर आहे. छोट्या चाळीवजा घरातील समोरच्या एका खोलीत आम्ही शिरलो अन् नजर हटणार नाही, अशी माझी अवस्था झाली. पुस्तकांच्या स्वर्गात येण्याचा नितीनचा नेहमीचा अनुभव असल्याने त्याच्या चेहऱ्यावर सोलापूर शहराचा वारसा दाखवित असल्याचा आनंद होता तर मी मंदिरावरील पुस्तकरूपी शिल्पांनीच मोहरलो होतो. खोली पुस्तक अन् त्या पुस्तकांच्या सावलीत बुडालेली होती. हे तर मंदिराचं बाह्यरूप होतं. मुखमंडप, सभामंडप, त्यातील देव्हारे, वाद्य घेऊन शिखर मंत्रमुग्ध करणारे मासिकांचे अन् पुस्तकांचे गठ्ठे, अंतराळ अन् गर्भगृह असा त्या दहाबाय वीसची खोली अंगावर शहारे आणत होती. वय पंचाहत्तरीच्या जवळपास.. मन मात्र अजूनही पंचवीशीतील. भिंतीवरील दोन शर्ट टांगण्याची जागा फक्त रिकामी असावी. किती पुस्तकं आहेत? असं मी धाडसानं विचारलं. ‘असतील सात-आठ हजार’ या उत्तराने माझ्या बुकसेल्फमध्ये शंभरीचा आकडा अजुन पार झालेला नसल्याची आठवण झाली. ‘बापरे इतकी?’ असं म्हणाल्यावर कुंभार सर म्हणाले, ‘कुठं कुठं ठेवणार त्यामुळे १८५० पूर्वी प्रसिद्ध झालेली १००० दुर्मिळ पुस्तकं पुणे विद्यापीठाला भेट म्हणून दिली,’ इतकं सहज बोलल्यावर आपल्याकडे असूनही दुसऱ्याला पुस्तक वाचायला न देणाऱ्यांची मला प्रचंड कीव वाटली. हा खुजेपणा आपल्या मनातून कधी जाणार? असं सहज वाटून गेलं. आपल्याकडील ज्ञान वाटल्याने आपले ज्ञान आपोआप वाढतं हे त्यांच्या पुस्तकावरून दिसत होतच.
कुंभार सरांशी लय जुळली अन् ते हळूहळू ते उलगडू लागले. मधमाशी जशी फुलांच्या कळीभोवती ती उमलण्याची प्रतीक्षा करीत मधासाठी पिंगा घालते तसा मी पुस्तकांवरून नजर फिरवू लागलो. ‘बसा’ म्हटल्यावर मी त्यांच्या पुड्यात समोर विसावलो. नजर मात्र विसावत नव्हती. खोली लहान असूनही तीन-चार कपाटं खोलीत होती. ‘यात काय आहे?’ असं विचारल्यावर ते हसून म्हणाले, ‘ पुस्तकं..’ कपाटांच्या बाहेरही पुस्तकं आतही पुस्तक! सर, मी आणि नितीन बसलो होतो तेवढी जागा सोडली तर अवतीभवती जमिनीवरही पुस्तकचं पुस्तकं. नजरेला हवी ती अलगद टिपत होतो. तेव्हढ्यात त्यांनी नजर हेरली अन् कुंभार सर म्हणाले,‘माझ्या पुस्तकांवर अनेकांचा डोळा आहे.’ मी ही न लाजता म्हणालो, ‘आणखी एक दरोडेखोराचे नाव यादीत सामावून घ्या’ यावर तेही मनमोकळेपणाने हसले. लहानपणी (अजूनही) मला पुस्तकं चोरण्याचा छंद होता. त्या परिस्थितीच्या झळा असव्यात… ही सवय इतकी सफाईदार होती की, पुस्तक चोरीला गेलं आहे, अशी तक्रार कधी कोणी केली नाही. मात्र मला हवं ते पुस्तक वाचायला मिळायचं अन् ते पुन्हा जागेवरही जायचं. बहुतेक आणखी एक खजिना माझ्या पुड्यात आला होता, या आनंदाने मी भारावून गेलो होतो.
हा माणूस पैशांची संपत्ती जमवू शकला नसेल हे दिसतच होतं मात्र माणसांची, ज्ञानाची अन् पुस्तकांची संपत्ती मात्र अमाप कमविली होती अन् त्याच संपत्तीचा एक भाग आज मी झालो होतो. गप्पांची फड रंगू लागला. ते माझ्याशी किती बोलतील याची मला शंका होती. मात्र माझ्या नातवंडासारख्या उत्सुकतेने त्यांना अगदी आजोबाच्या रूपात आणलं. वेगवेगळे अनुभव अन् उत्तर सोलापूरातील (सोलापूर शहरातून साधारण ३० किलोमीटर अंतरावरील) हत्तरसंकुडल येथे त्यांनी शोधलेला 1000 वर्षांपूर्वीचा मराठी शिलालेख असो व्वा त्यांच्या शिलालेखाच्या पुस्तकाला छपाई अयोग्य असा शिक्का मारून साहित्य संस्कृती मंडळाने केलेली फरफट असो. व्वा… त्याचे महाराष्ट्र सरकारच्या साहित्य संस्कृती मंडळाने त्याच पुस्तकासाठी दिलेला पुरस्कार असो… असा प्रवास सुरू झाला होता. मात्र मला अजून मागे जायचं होतं आणि तोच प्रवास सुरू झाला. पुढील प्रवास त्यांच्या शब्दात ऐकूयात….
कुंभार सरांचा जन्म सर्वसामान्य कन्नड कुटूंबात झाला. घरातील बोलण्याची भाषा कन्नड असल्याने कन्नड चांगले बोलता येते. दहावीपर्यंत शिक्षण. १९६० ते ६५ दरम्यान भारतीय लष्कारात वायरलेस ऑपरेटर म्हणून त्यांनी सेवा दिली. वाचनाची आवड असल्याने त्यामुळे सोलापूरात आल्यावर ग्रंथालयाचा सदस्य झालो अन् मिळतील ती सर्व पुस्तके वाचायला सुरूवात केली. एकदा विदर्भ संशोधन मंडळाचा एक अंक होती लागला. त्यातील मिराशीचा कोरीव लेख ताम्रपट या विषयावरील एक लेख वाचला अन् मी प्रचंड प्रभावीत झाला. हा विषय झपाटून टाकणारा होता. याच लोकांना इतकं कसं काय सापडतं हे गूढ काही उलगडत नव्हतं. मग लक्षात आलं की, भटकंतीशिवाय हे शक्य नाही. माझ्याकडे सायकल होती. १९७० ते आजपर्यंत मी सोलापूरातील ११ तालुक्यातील ६०० हून अधिक गावांची भटकंती सायकलवर केली आहे. सोबत घरातून शिदा बांधून घ्यायची अन् तेथे शक्य होईल तेथे खायची. सुरूवातीला अनेक गावात माहितीच मिळत नसे.. हाती काहीच येत नव्हते. भटकंती मात्र सुरूच होती. पण काही न मिळणे हे सुद्धा संशोधन आहे ना! एखाद्या गावात काही न मिळणे म्हणजे पुढील संशोधकांनी आधीच्या संशोधकाने वापरलेली पद्धतीचा वापर न करता एकतर इतर पद्धतीने त्या गावात शोध घेणे हे त्याचे कष्ट वाचविणारेच होते. मात्र निराश झालो नाही. कुंभारी गावात पहिला शिलालेख १९७० ला हाती लागला. सोलापूर शहरातील दिसणारे शिलालेख तर सहज मिळाले त्यांतील काहीचे वाचन झाले होते. काहींचे होणे बाकी होते. गेल्या चाळीसपन्नास वर्षात सव्वाशे शिलालेख शोधले. सुरूवातीला शिलालेख मिळू लागले मात्र अडचण होती ती म्हणजे ते कसे वाचायचे याची. शिलालेखातील अ,ब,क,ड ही मला कळत नव्हते. मात्र शिलालेख शोधण्याचा उत्साह नियतीन माझ्यासमोर जबाबदारी म्हणून दिल्याने मी आता माघार घ्यायची नाही, असं ठरवून टाकलं. (सरांच्या बोलण्यातील उत्साहाने अंगावर काटा येत होता.) कारण गावागावांमधील शिलालेखांची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. अनेक ठिकाणी शेतात फेकून दिलेले शिलालेखही मिळाले. मी हे शोधले नसते तर ते पुन्हा कोणी शोधले असते की नाही हे माहीत नाही. मात्र ते मी करायलाच हवे, ही भावना प्रबळ झाली होती. आपला इतिहास या शिलालेखांमधून दडलेला आहे. हा वारसा आपण जपायचा नाही तर कोणी जपायचा, या विचारानं मला झपाटलं होतं.
शिलालेखांबद्दल काही माहित नसल्याने मिराशींना पत्र लिहिलं. त्यांनी तातडीनं उत्तर दिलं अन् पुण्यात ग. ह. खरे यांना भेटण्यास सांगितलं. पत्रात त्यांनी माझ्याबद्दलही विशेष चौकशी केली होती. ‘तुम्ही कसे काय याकडे वळालात. आमच्यातील माणसंही हे काम करायला धजत नाहीत’, असं त्यांनी विचारलं होतं. मिराशींना मी जेवढी काही पत्रे लिहिली त्या सर्व पत्रांची उत्तरे त्यांनी तातडीने दिली. इतक्या वेगवेगळ्या संशोधन कामात व्यस्त असलेला माणूस सर्वसामान्य माणसाच्या पत्रांना काळजीपूर्वक व तातडीने उत्तर देतो यावरून मिराशींची प्रतिभा किती ज्ञानप्रबोधनकारी होती हे दिसतं.. तो माणूस ग्रेटच होता..! मी तातडीने भारत इतिहास संशोधन मंडळात खरे सरांना भेटलो. मी करत असलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केलं. माझ्याकडे शिलालेखाबाबत ना साहित्य होतं नाही शिलालेखांचे ठसे घेण्यासाठी साहित्य होतं. शिलालेखांचे ठसे कसे घ्यायचे हे मला समजत नव्हतं.. मी खरे सरांना विंनती केली की, मला ठसे घेणे शिकवाल का? असं म्हटल्यावर खरे मला चला म्हणाले. रात्रीची वेळ होती. रात्री भारतीय इतिहास संशोधन मंडळाचे संग्रहालय त्यांनी उगडलं. पाणी, डॅबर, ब्रश सर्वकाही ते घेऊन आले अन् तेथील शिलालेखाचा ठसा मला काढून दाखविला. शिलालेखांवर ठसे घेताना खरे सर फक्त शिलालेखांवरील ठसे घेत नव्हते तर माझ्यातील अज्ञानाला ज्ञानाच्या रूपात ठश्यांमधून प्रतिबिंबीत करीत होते, असा अनुभवला मला येत होता. खरे सरांसारखा मोठा माणूस माझ्यासाठी रात्री अपरात्री संग्रहाय उघडतो काय अन् ठसे घेण्याची पद्धती मला शिकवितो काय? हे सर्व काही अजब होतं. मी सरांना विचारलं, ‘सर मी तर कोणीच नाही. आपण मला कसं काय हे शिकवलं.’ यावर त्या विद्वान माणसाचं उत्तर खूप बोलकं होतं. खरे म्हणाले,‘मी जेव्हा होतकरू होतो. तेव्हा मलाही हे शिकायचं होतं पण अनेकांनी शिकवायला काचकूच केली. ते खूप अवडघ असतं वगैरे वगैरे कारणे सांगितली. त्यातून मी मार्ग काढला मात्र तो वेळ तुझा खर्च होऊ नये म्हणून आणि ठसे घेणे अजिबात अवघड नसतं हे दाखविण्यासाठी मी हे केलं. ज्ञान दिल्यान वाढतं.’ त्यांनी ठसे घेण्याचं साहित्य माझ्या हातात देऊन आता तू ठसे घेण्याची चांगली प्रॅक्टीस कर असं ही ते म्हणाले. आपल्याकडंच सहजासहजी न देणाऱ्या बुद्धिवंताना ही चपराक होती. खरे सरांचं सूत्र मी पुढे पाळलं.. मला ज्यांनी ज्यांनी ठसे शिकायचे आहेत असं विचारलं त्यांना मी शिकवलं.
ठसे घेण्याची समस्या तर सुटली होती. १९७५ उजाडलं होतं. आता पुन्हा शिलालेख शोधलेल्या गावी सायकलवर जाण सुरू झालं. तेथील ठसे घेतले अन् कर्नाटक विद्यापीठात गेलो. तेथील शिलालेख विभागाचे प्रमुख श्रीनिवासन् रित्ती यांना भेटलो. मी घेतलेले ठसे पाहून ते आश्चर्यचकित झाले होते. मी ठसे घेतले असले तरी त्यावर काय लिहिलं आहे हे मला वाचता येत नव्हते. मात्र रित्ती ते सहज वाचू शकत होते. रित्तीने मला या शिलालेखांचे पुस्तक काढावे, असा सल्ला दिला. पण मला ते शक्य नव्हतं. माझी आर्थिक परिस्थती नव्हती. मी म्हटलं, ‘मी माझं काम केलं आहे.’ अखेर रित्तींनी ठसे ठेऊन घेत मी काही तरी करतो म्हणून सांगितले. त्यांनी त्या ठशांवर प्रचंड कष्ट घेतले अन् १९८८ मध्ये म्हणजे दहा वर्षांनी सोलापूर जिल्ह्यातील शिलालेख या विषयाचे इंग्रजीतून पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकामुळे इतिहास व पुरातत्त्व क्षेत्रातील हजारो विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा उपयोग झाला. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यावर आधारित या पुस्तकावर कर्नाटक विद्यापीठाने काम केले. त्याही एक कारण होते ते म्हणजे सोलापूर परिसरात कन्नड शिलालेखांची संख्या अधिक आहे. याच वर्षी साहित्य तरंग नावाचे शिलालेखांवरील माझे पुस्तक महाराष्ट्र सरकारच्या साहित्य संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केले. विशेष म्हणजे मंडळाने हे पुस्तक छपाई अयोग्य असल्याचा शेरा मारला होता व पुस्तक छपाईला नकार दिला. सोलापूरचे एक विद्वान सरदेशमुख यांनी माझे काम पाहिले होते. त्यांनी मंडळाच्या अध्यक्षांपर्यंत हा विषय नेला. तेव्हा कळाले की हे पुस्तकाचे बाड अध्यक्षांपर्यंत कधी आलाच नाही त्यामुळे नाकारण्याचा प्रश्नच नाही, असे अध्यक्षांनी उत्तर दिले व माझे बाड मागवून घेतले. त्यांना माझे कष्ट व पुस्तकाचे महत्त्व लक्षात आले अन् त्यानी संशोधन तरंग या नावाने पुस्तक प्रकाशित केले. गंमत म्हणजे लायक नसलेल्या व नाकारलेल्या त्या पुस्तकाला शासनाचा पुरस्कारही मिळाला. केवळ व्यासंग, मिराशी सर, खरे सर यांच्या मार्गदर्शनामुळे हे करू शकलो.
इतिहासाला माहीत नसलेल्या गोष्टी समोर आल्याच एक वेगळं सुख मला मिळालं. खूप खूप भटकंती सायकलवर केली. देवळं, वीरगळ, विहीरी, वाडे, किल्ले अशा अनेक घटकांच्या नोंदीवरही भर दिला. मात्र सोलापूर परिसरातील इतिहास माहित नसेल तर जे काही करतो आहे त्याचे नाते जोडणे शक्य नसल्याने इतिहास, पुरातत्त्व शाखेतील पुस्तके विकत घ्यायला सुरूवात केली. अगदी वृत्तपत्रातील कात्रणांपासून ते संदर्भ ग्रंथापर्यंत सर्वकाही संशोधन कामात आवश्यक असल्याने जमा करणे सुरू केले. पोटापाण्याचा प्रश्न सांभाळत व आर्थिक परिस्थिती संशोधनाच्या आड येणार नाही याची काळजी घेत सर्वकाही सुरू होते. यातून घरातील सात-आठ हजार पुस्तकातून घराच्या भिंती उभ्या राहिल्या. पुस्तकांबरोबरच मला संगीताची आवड असल्याने संगीताच्या असंख्या कॅसेट जमविल्या. याची संख्याही ४००० आहे.
हा छंद होता की ध्यास हे महत्त्वाचं नाही तर आपल्या कामाचा आपल्या शहराला, जिल्ह्याला उपयोग होत आहे होणार आहे. हे माझ्यासाठी महत्त्वाच होतं. मला अनेक संस्था, संघटनांकडून पुरस्कार मिळाले. मी दहावी झालेलो आहे. डॉक्टर वगैरे नाही मात्र माझ्या नावापुढे डॉक्टर लावले जाते. मी डॉक्टर लावू नका म्हणून विनंती करतो पण कोणी ऐकत नाही. ‘तुम्ही गप्प बसा हो.. तुमच्या नावावर किती लोक डॉक्टर झालेत तुम्हाला काय माहिती’ असे मला सांगितलं जातं. दक्षिणेत ज्या पद्धतीने इतिहास संशोधनाला जेवढे महत्त्व दिले जाते तेवढे आपल्याकडे दिले जात नाही. याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे. आपल्याकडे गावागावांमध्ये इतिहास पसरलेला आहे. त्यांचे संकलन होणे गरजेचे आहे. गावापासून ते इतिहास संशोधन करणाऱ्या संस्थांमध्या नाळ जोडण्याची गरज आहे. आपल्याकडे श्रीमंतांचे अभिनंदन अंक काढले जातात. मात्र संशोधकांचे काढले जातात का? त्या व्यक्तीच्या आयुष्यभराची दखल अभिनंदन ग्रंथातून घेतली जाते ही पद्धत दक्षिणेकडे आहे. आपल्याकडेही ही पद्धत सुरू झाली तर इतिहास संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांची दखल घेतली जाईल, असे मला वाटते.
इतिहास संशोधक व विद्वान रा. चिं. ढेरे यांनीही माझ्या कामाचे कौतुक केले आहे. ढेरे सरांनी त्यांचे एक पुस्तक मला अर्पण केले आहे. मी अगदी सर्वसामान्य माणूस असूनही माझ्या खारीचा वाटा असलेल्या कामाची दखल त्यांनी घेतली हा माझ्यासाठी मोठा पुरस्कार होता.
हे सांगताना डॉक्टरांचे डॉक्टर आनंद कुंभार यांच्या डोळ्यात तारा चमकला. हे स्वाभाविक होते. चांगल्या कामाचे कौतुक व्हायलाच हवे. ते झालेही. हा सोलापूरचा रत्न या शहराचा या मातीचा एक अनमोल वारसा आहे… अन् आपली जबाबदारी म्हणून त्यांनी गावागावांतील वारसा अगदी एक वारसदार म्हणून पुढे आणला आहे. हे काम प्रत्येक जिल्ह्यात व्हायला हवं, अशी अपेक्षा व्यक्त करताना माझा कंठ दाटला होता. आपल्या पाऊलखुणा योग्य वाटेवर उमटतायेत याचं कौतुक सर करत आहेत हे भासत होतं. सोलापूरने मला आनंद कुंभारांसारखा वेगळा माणूस दाखवला आपल्यापर्यंत हा माणूस पोहचविण्याच काम नियतिनं माझ्यार सोपलं. सोलापूरला आलातर या हेरिटेजलाही नक्की भेट द्या. या चंदेरी प्रकाशाच्या शहरात एक आनंद देणारा व इतिहासाला योग्य आकार देणारा कुंभार आहे. याचा अभिमान या शहराने बाळगला आहे याचं करावं तितकं कौतुकच आहे.
सोलापूरची ही सफर येथेच संपलेली नाही.. अनेकांना भेटलो आहे त्यामुळे अनेक सोलापूरकरांवर भरभरून लिहायचं आहे. पुढच्या शहराच्या समृद्धीच्या पाऊलखुणांसह लवकरच भेटू. धन्यवाद!
आपल्या प्रतिक्रिया मला आणि आनंद कुंभार सरांना नक्की कळवा!
शिलालेखांचे डॉक्टर आनंद कुंभार : 9420806485
रमेश पडवळ
Mob. 8380098107
rameshpadwal@gmail.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकमध्येही हवं ‘मूर्तीचं वरकुटे’!

महापालिकेची नको; माणुसकीची भिंत उभारा

काळाराम मंदिर सत्याग्रह : २ मार्च, काळाराम अन् रमेशायण!