नाशिककरांचा रद्द झालेला पुष्प महोत्सव.. ऐ शायर इस शहरको महकने दो…

नाशिककरांचा रद्द झालेला पुष्प महोत्सव
ऐ शायर इस शहरको महकने दो…
‘ऐ शायर इस शहरको जरा महकने दो.. खिलते है फुल यहा जरा उन्हे चहकने दो..’ या ओळींमधील शायर म्हणजे नाशिकचे महापालिका अन् ही ओळ गाणारे (त्यांच्याकडे आशेने पाहणारे) नाशिककर. हे आतापर्यंत आपल्याला समजले असावेच. अचानक शायर अन् शाहिरी कोठून आली तर ती आली २३ फेब्रुवारी रोजी होणारा नाशिकचा पुष्पत्सोव रद्द होणार या बातमीतून. अरे.. नाशिक महापालिका कधी तरी काही नाशिककरांसाठी चांगला कार्यक्रम आयोजित करत असताना अचानक पुष्प महोत्सव रद्द करण्याचा निर्णय जरा कठोरच नाही का? आयुPUSHP-PRADARSHANI-4क्तांनी महापालिकेच्या आर्थिक स्थितीकडे पाहून रद्द केला एखादा कार्यक्रम तर काय बिघडलं. बिघडत काहीच नाही पण, तुम्ही नाशिककरांसाठी नेमकं चांगलं काय करणार हे तरी सांगा असेही सर्वसामान्य म्हणतील. अर्थात, पुष्प महोत्सव आयुक्तांनी रद्द केला म्हणून आपण निवडून दिलेला कोणताही पक्ष सर्वसामान्य नाशिककरांची बाजू घेऊन आयुक्तांकडे गेला नसेलच याची आम्हाला खात्रीच आहे. कारण, रद्द केला तर रद्द केला. काय फरक पडतो. नाशिककरांसाठी काहीही घ्या त्यांना कमीच पडणार, नाहीतर फुकट्या नाशिककरांना काय कसलाही महोत्सव ठेवला तरी येतातच की, टार्इमपास म्हणून. पर ऐ शायर.. इस शहर को कम मत समज…! कारण, आर्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेला पुष्पमहोत्सव आर्थिक उत्पन्नाच साधन का वाटलं नाही कोणास ठाऊक? म्हणजे या पुष्पमहोत्सवातून महापालिकेला पैसे मिळाले असते? असा प्रश्न सर्वसामान्य नाशिककरांना नक्कीच पडला असणार. नाही का? आहो.. महापालिकेने पुष्प महोत्सवावर खर्च करण्यापेक्षा शहरातील सगळ्या नर्सरी अन् अँग्री कंपन्यांना फक्त जागा उपलब्ध करून देण्याच्या अटीवर हा पुष्पमहोत्सव भरविण्यास सांगितले असते तरी महाराष्ट्रात इतरत्र झाला नसता असा पुष्पमहोत्सव नाशिकला झाला असता. इतक्या आर्थिकदृष्ट्या बलाढ्या संस्था नाशिकमध्ये आहेत. हे ठिक आहे पण, महापालिकेला पैसे कसे मिळाले असते, असाच प्रश्न पडला आहे ना तुम्हाला.. सांगतो… या पुष्प महोत्सवाला दहा रूपये प्रत्येकी तिकिट लावलं तरी महापालिकेला पाच दिवसात पाच लाख रूपये मिळाले असते. इतर स्टॉलचे भाडे वेगळेच. पण, मराठी माणसाला धंदा कुठे करता येतो. तो नेहमी एकाच म्हणीमध्ये गुंतलेला असतो.. ‘चादर पाहून पाय पसरायचे!’ त्यांची चादर कधी वाढत नाही अन् पाय वाकडे व्हायची वेळ येते. झालं तर चादरीला आणखीनच भोकं पडतात.
शायरजी.. नाशिक खूप सुंदर आहे. त्याच्या सौंदर्यात फक्त एलर्इडीचा झगमगाटच नको आहे तर पुष्प प्रदर्शनासारख्या सर्वसामान्य नाशिककरांच्या मनाला सुंगध अन् रंगतदार अशी मेजवानीचीही गरजेची असते हो.. तेही तो दहा रूपयांचे तिकिट विकत घेऊन यायला तयार असतो.. ती तरी संधी उपलब्ध करून द्या त्यांना! एलर्इडीबाबत अन् त्यांच्या प्रकाशाबाबत तुम्ही चांगलेच जाणता.. त्या लाभधारकांसाठी खूप काही सुरू आहे त्यांना मते देणार् या सर्वसामान्य नाशिककरांसाठी तुम्ही तरी असं करणार नाही ही अपेक्षा होती पण.. घडलं उलटचं. त्यामुळे आम्ही नाशिककर आजिबात निराश होणार नाही. महापालिकेला दुसणेही देणार नाही. घरातील गॅलरीत कुंडीत एखादं गुलाबाच झाडं लावू अन् उमललंच (खत प्रकल्पातील खत तयार झालं अन् ते नाशिकरांना मिळालं तर) एखादं फुल तर पुष्पोत्सव साजरा करू. वाटलं तर रस्त्यावरच्या एलर्इडीच्या प्रकाशात एक फेरफटका मारून येऊ. आजकाल रस्त्यावर वाढत्या गुन्हेगारीमुळे अन् अतिक्रमणांमुळे हा फेरफटका मारायलाही थोडी भीती वाटते म्हणा.. थोड म्हणजे आता नाशिककरांनी अंगावर सोनं वापरायचं बंद करायचं ठरवलं आहे. घातलं की, लुटण्याची भीती! रस्त्यावरील फूटपाथवर आलेली दुकानं पाहणंच आजकाल नाशिककर धन्य समजू लागला आहे. धन्य म्हणजे? महापालिका या धनाड्य व्यवसायिकांसाठी कोट्यवधी रूपये खर्च करून फूटपाथ बांधते, असे एका नाशिककरांनी विचार तेव्हा अजब वाटलं.. फूटपाथ कसं काय महापालिका त्यांच्यासाठी बांधेल. ती तर सर्वसामान्य नाशिककरांसाठी आहेत ना? पण हा प्रश्न मला काही सुटला नाही. तसचं ते कचरा गाड्यांचही आहे. मध्ये एकलं होतं कचरा ठेकेदाराला काहीतरी लाखो रूपयांचा दंड झाला. त्यानं तो भरला की नाही हे  नाशिककरांना काही समजलं नाही. आहो.. पण दंड झाला तर तो भरण्यासाठी असतो अन् भरला असणारच ना! पण हे नाशिककरांना कोण सांगणार. असो या उधळपट्टीचा अन् नाशिककरांच्या जिव्हाळ्यांच्या पुष्प महोत्सवाचा काडी मात्र संबंध नाही हो.. रमेशायण उगाच काही तरी जोडू नका.
अरे, कसं जोडू नको.. ‘धनाकडे जातं धन.. सर्वसामान्य नाशिककर गातो विकासा भजन’ आता हे काय? अरे म्हणजे फूटपाथ व्यावसायिकांसाठीच बांधायचे असतील, कचरा गाडी वेळेत येत नसेल अन् अख्ख्या शहरात कुत्र्यांचा सुळसुळाट सुरू असेल तर महापालिका नेमकं काय करते, असा प्रश्न सर्वसामान्य नाशिककरांना पडणं आलचं ना? त्यात महापालिकेच्या त्या तक्रारी घेणारा तो app काही तक्रारी सोडवतच नाही. विशेष म्हणजे अनावश्यक खर्च करीत शहरात उठ-सुठ कमानी बांधणं सुरू राहिलं तर महापालिकेचा खर्च वाढणार नाही तर काय होणार? शहरात पुढे जाऊन धोकादायक होणार् या कमानी हव्यातच कशाला.. नंतर अडथळा ठरल्या म्हणून पाडाव्याच लागणार.. त्या एबीबी सर्कलवर महापालिकेने चौकात उभ्या केलेल्या योगमुद्रेच्या शिल्पाचं काय झालं बघितलं नाही का?  ते शिल्प इतरत्र लावता आलं असतं पण तोडलं. अन् कमानी बांधून काय होत? हा खर्च शाळांमध्ये सुविधा देण्यापेक्षा महत्त्वाचा कसा वाटतो महापालिकेला. अपंगांवर आवश्यक असणार खर्च आता कुठे होताना दिसतो आहे. पण तोही फक्त खेळापुरता मर्यादित नसावा.. त्यांचं शिक्षण, रोजगार यासाठीही केला गेला तर कार्य घडेल. नाहीतर पुन्हा कोणीतरी दबाव आणला म्हणून खर्च केला असं म्हणण्यापुरतचं रहातं. पुढच्यावर्षी तीच संघटना पुन्हा समोर उभी राहते, वाद होतात अन् नंतर खर्च होतो, असंही व्हायला नको.
नाशिककरांना काय हवं आहे हे समजून घेत शहराचा विकास झाला तरच तो विकास म्हणवेल नाही तर महापालिकेची कंपनी होर्इल. नाशिककरांना कंपनी नको आहे. नाशिककरांना स्वराज्य संस्था हवी आहे तीही लोकाभिमुख. जेथे कठोर व्हायचं तेथे झालचं पाहिजे, यात आपका अंदाज हमें पसंद है.. पण, नाशिककरांना ‘कधी नव्हे’ ते चांगला सुगंध मिळण्याची वेळ आली अन् आपण थेट पुष्प महोत्सव रद्द केलात हे जरा खटकलचं. असो, आपल्या शिस्तीसाठी हेही सहन करू.. पण, ओघाने आलेले विषयही त्याच शिस्तीने पार पडले तर आपलं कौतुक नाशिककर करतीलच. गोदावरीचा मुद्दा हाती घेऊन आपण काही भूमिका घेतलीत याबद्दल नाशिककरांनी आपलं कौतुकच केलं. आपल्याला कोणी सांगितलं की नाही माहित नाही.. पण, गोदा स्वप्नात येऊन म्हणाली, संत माणसाकडून खूप अपेक्षा आहेत.
संत तुकाराम महाराजांनीच म्हटले आहे…
ले तरी देवू कासेची लंगोटी। नाठाळाच्या माथी हाणू काठी
त्यामुळे गोदावरीचे प्रदुषण करणार्यांवर कठोर कारवार्इ आपण करालं, अशी अपेक्षा आपल्याकडून वाढली आहे. असं झालं तर असे हजार पुष्प महोत्सव रद्द झाले तरी बेहत्तर. गोदावरी काठावर कोण प्रदूषण करतं, का करतं, आतापर्यंत यांच्यावर कारवार्इ का झाली नाही, या प्रश्नांची उत्तरही शोधली तर खूप काही उलगडेल अन् नाशिक नेमकं कसं आहे हेही आपल्या लक्षात येर्इल.
संत गाडगेबाबा हे नाशिकला लाभलेलं वैभव आहे. त्यांनी नाशिकला अर्पण केलेली एक सुंदर वास्तू गोदाघाटावर आहे. कधीतरी ती नक्की पहायला जा. स्वच्छतेसाठी आयुष्य वाहिलेल्या संत गाडगेबाबांच्या वास्तूसमोर घाणीचं साम्राज पहाताना डोळ्यात पाणी उभं रहातं. महापालिका स्वच्छतेसाठी एवढे काही करत असताना असं का व्हावं, याचं उत्तरही आपल्याला मिळेल. म्हणजे आम्ही नाशिककरच यासाठी दोषी आहोत हे आम्हाला मान्यच. पण, आम्हाला शिस्त लावायला आपल्या सारखा अधिकारी मिळालाच नाही. तर आम्हीही काय करणार? हातात छडी घेऊन ‘छडी लागे छम छम विद्या येर्इ घम घम’ याची नाशिककरांना गरज आहे हेही आम्ही मानतो. असं घडलं तर पुष्प महोत्सव कितीही वेळा रद्द होवो.. फिकीर नाही. गोदाघाटाच्या पुलांखाली जमणारे दारूचे अड्डे हा महापालिकेचा विषय नाही पण, त्यांना ती जागा फुकट का वापरू द्यायची.. त्याचे भाडे त्यांच्याकडून घेतले तर महापालिकेला किती उत्पन्न मिळेल. त्यातून वर्षात दोन पुष्प महोत्सव होतील, असंही कोणीतरी आज म्हटलं मला. मला थोड हसू आलं पण, हरकत नाही.. नाशिकमध्ये ज्या प्रमाणात अतिक्रमण फोफावली आहेत ती महापालिकेच्या डोळ्यात धूळ कशी टाकू शकतात, याचा विचार महापालिकेनेच करायला हवा कारण कोट्यवधी रूपयांचे महापालिकेचे नुकसान ही धनाड्य मंडळी करत आहेत अन् काही लाखांसाठी सर्वसामान्य टॅक्सपेअर नाशिककरांचा पुष्प महोत्सव रद्द होतो हा विनोद नाही का? महापालिकच्या शहरातील मोकळ्या जागांवर काय सुरू आहे हे पाहिलं तरी काही कोटी रूपये भाडं गोळा होऊ शकतं. पण हे फक्त सर्वसामान्य नाशिककर पाहणार की, महापालिकेने पहायला हवं हा प्रश्न सुटत नाही, असंही कोणीतरी मला म्हटलं.
महापालिकेतून देव प्रतिमा हद्दपार झाल्या. नियमात असेल तर हे बरोबरच आहे. याबाबतही आपल्या नाशिककरांचा पाठींबाच. पण, कुंभमेळ्यात ज्या देवांच्या नावावर आपण निधी घेतो त्या निधीचं वास्तवही पहायला हवं. तपोवनात या कुंभमेळ्यात अम्फी थिएटर बांधल म्हणे.. कोणासाठी आणि कशासाठी बांधला याचं उत्तरच मिळत नाही. शहरातील असंख्य उद्यान ओस पडली आहेत. असंख्य प्रतीक्षेत आहेत. रार्इट टू पी याची तर अंमलबजावणीच होत नाही. पुष्प महोत्सवाचा खर्च रार्इट टू पी या महिलांच्या अत्यावश्यक स्वच्छतागृहांसाठी झाला ना तरी, असे अनेक महोत्सव रद्द केले तरी चालतील. आता आपण म्हणालं रमेशायणला नक्की काय हवं आहे. काहीच नको.. नियमानुसार अन् शहराची गरज ओळखून नेहमीच सर्वकाही होत असेल तर नको हा पुष्प महोत्सव. पण, शहराची गरज ओळखून अन् नियमानुसार होणार नसेल तर किमान पुष्प महोत्सव महापालिकेला उत्पन्न मिळवून देऊ शकतो या भावनेतून तरी करा. असा करा की, नाशिककर कायम आपल्याला लक्षात ठेवतील. शहर या गजबजाटातही आपलेपणा शोधतो आहे.. त्यांच्या मनाची शांतता फक्त अव्यवहारीकतेपायी चीरडली जाऊ नये म्हणून हा खटाटोप!
  • रमेशायण
८३८००९८१०७.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकमध्येही हवं ‘मूर्तीचं वरकुटे’!

महापालिकेची नको; माणुसकीची भिंत उभारा

काळाराम मंदिर सत्याग्रह : २ मार्च, काळाराम अन् रमेशायण!